सामाजिक
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाकाय टॉवर क्रेनची उभारणी , महाप्रसादालयाच्या बांधकामास गती मिळणार

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास हे अध्यात्मिक केंद्र तर आहेच, यास अत्याधुनिकतेची जोड मिळत असल्याने आज मंडळाचा परिसर विविध विकास कामाने उजळून निघत आहे. तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीच्या विकासात देखील भर पडत आहे. अन्नछत्र मंडळाने भक्त सेवेत सुसज्ज महाप्रसादालय उभारत असून, याकामासाठी मेट्रो सिटीत बहुमजल्या इमारती उभ्या करताना त्याकरीता लागणारे महाकाय टॉवर क्रेनची उभारणी अन्नछत्र मंडळात करण्यात आली आहे. अशा पद्धतीने इमारत बांधणी श्री क्षेत्र अक्कलकोटमध्ये प्रथमच होत आहे.
सदर महाप्रसादालय इमारतीचे बांधकाम कमी मनुष्यबळ आणि जलद गतीने होण्याकामी ठेकेदार साईसुश्रुत, पुणे या कंपनीकडून टॉवर क्रेन बसविण्यात आलेले आहे. या क्रेनची क्षमता ५ टन असून १६५ फुट उंचीपर्यंत या क्रेनद्वारे बांधकामासाठी लागणारे सिमेंटचा लगदा वाहून नेऊ शकते. अशा अत्याधुनिक पद्धतीचा वापर या बांधकामासाठी होत आहे. याची पाहणी नुकतीच कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या टीमने केली आहे.*
अन्नछत्र मंडळाकडून स्वामी भक्तांकरिता सतत विविध विधायक कार्याच्या माध्यमातून सेवा समर्पित कार्याने पुढे जात आहे. भक्त केंद्रस्थानी म्हणूनच न्यासाचे प्रत्येक कार्य यशस्वी रित्या पूर्ण होत आहे, स्वामी भक्तांच्या श्रद्धेचा धार्मिक उत्सव अन्नछत्र मंडळाच्या परिसरात पहायला मिळतो. सत्य, न्याय, सेवा, समता आणि बंधुतेचा संदेश मंडळाचा आहे. व्यापक उद्धीष्टांसाठी कार्यक्षम निर्णय न्यासाकडून घेतले जात असल्याने श्री क्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर पडणाऱ्या न्यासाच्या आवारात नवीन भव्य महाप्रसादालय उभारत आहे. दरम्यान पहिल्या मजल्याचे ५० टक्के काम पूर्ण झालेले आहे. दुसऱ्या मजल्याच्या कॉलमचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाकरिता एम-३५ श्रेणीचे कॉक्रीटचा वापर केला जात आहे.
सदर होणारी नवीन महाप्रसाद गृहाची इमारत भव्य आणि मंदिर सदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकुलित असून, या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरस फुट असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर, रेखीव आणि भव्य मुर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून, एकूण ५ हजार भाविकांसाठी बसून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा प्रतिक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स, आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ही सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत, स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होणार असून, या बांधकामाचा सर्वसाधारण अंदाजे खर्च रुपये ६० कोटी, इतका अपेक्षित आहे. गेल्या नोव्हेंबर-२०२४ पासून सदरचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या २ वर्षात हे महाप्रसादगृह भक्तांच्या सेवेत असणार आहे.
हे काम पूर्ण होण्याकामी साई सुश्रृत डेव्हलपर्स एल.एल.पी. पुणे चे मुख्य- निहार आडकर, मुख्य अभियंता- रामदास तांबे, मुख्य अधिकारी- प्रशांत काळे, प्रकल्प व्यवस्थापक- राजेंद्र पाटील, कनिष्ठ अभियंता- ऋषिकेश शिंदे हे कार्यरत आहेत.




