सोलापूर

“न्यायदान हे माझे कर्तव्य, तर समाजप्रबोधन ही माझी नैतिक जबाबदारी – डॉ. न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी

 करमाळा (प्रतिनिधी):
वारकरी संप्रदायाचा गौरवशाली वारसा आणि आधुनिक सामाजिक कार्याची सांगड घालत कोर्टी (ता. करमाळा) येथे भक्ती अन् सेवेचा अपूर्व सोहळा संपन्न झाला. थोर गुरुवर्य भजनसम्राट बाबुरावजी धामणिकर गुरुजी यांच्या १७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘त्रिदिनी कीर्तन महोत्सवात’ समाजाच्या विविध स्तरांतून कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी काल्याच्या कीर्तनात आपल्या अमोघ वाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध करतानाच, डॉ. न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी यांनी कायदा, कर्तव्य आणि नैतिक जबाबदारीचा त्रिवेणी संगम मांडला.
या सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामीण भागातील शिक्षण आणि विकासासाठी अहोरात्र झटणारे ‌यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे पाटील‌ यांना त्यांच्या अष्टपैलू योगदानाबद्दल ‘सामाजिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तर, वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार निष्ठेने करणारे ह.भ.प. विनोदाचार्य दयानंद महाराज (कोरेगावकर) यांना ‘आध्यात्मिक पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार म्हणजे केवळ व्यक्तींचा गौरव नसून, समाजहित जपणाऱ्या प्रवृत्तींचे केलेले कौतुक आहे.
डॉ. न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी आपल्या मनोगतात ते म्हणाले की, “न्यायदान हे माझे कर्तव्य, तर समाजप्रबोधन ही माझी नैतिक जबाबदारी आहे याच भावनेतून बाबुरावजी धामणिकर गुरुजींनी आयुष्यभर सात्विकतेची पेरणी केली. आज त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार प्रा. करे पाटील आणि दयानंद महाराजांसारख्या व्यक्तींना मिळणे, हे त्या पुरस्काराची उंची वाढवणारे आहे. सत्तेपेक्षा सेवा आणि संपत्तीपेक्षा माणुसकी मोठी असते, हेच या महोत्सवाचे सार आहे.”
प्रा. गणेश करे पाटील यांनी पुरस्काराला उत्तर देताना नमूद केले की, “हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून ‘यशकल्याणी परिवाराचा’ आहे. संतांच्या विचारांना कृतीची जोड देऊन शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहोचवणे, हेच आमचे अंतिम ध्येय आहे. हा पुरस्कार मला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देतो.”
दयानंद महाराज कोरेगावकर म्हणाले की “अध्यात्म हे समाजाला संस्कार देणारे विद्यापीठ आहे. संस्कारक्षम तरुण पिढी घडवण्यासाठी अशा महोत्सवांची नितांत गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
महोत्सवाच्या सांगता प्रसंगी झालेल्या काल्याच्या कीर्तनाने कोर्टी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
यावेळेस व्यासपीठावर योगिनीताई राजेभोसले, करमाळा पंचायत समितीचे उपसभापती अजित विघ्ने, टायगर ग्रुप चे तानाजी जाधव, निळकंठ अभंग, जालिंदर पानसरे, विष्णु शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
“बाबुरावजी धामणकर गुरुजींचा वारसा आणि संस्कार समाजातील तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे हाच या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे,” अशा भावना आयोजकांनी यावेळी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. मच्छिंद्र आप्पा अभंग,अभंग, ह.भ.प. विजय महाराज अभंग आणि ह.भ.प. माऊली महाराज मेढे यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन नवले यांनी केले तर आभार गीतांजलीताई अभंग यांनी मांडले.
या सोहळ्यामुळे कोर्टी परिसरात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button