क्राईम

परंडा तालुक्यातील कुंभेजा येथे सशस्त्र दरोडा; माजी सैनिक गंभीर जखमी

दरोडेखोरांचा शेतवस्तीवर थरार; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास, परिसरात भीतीचे वातावरण

परंडा / धाराशिव ( फारूक शेख ) तालुक्यातील कुंभेजा परिसरातील कॅनल पट्टीजवळ असलेल्या एका शेतवस्तीवर मध्यरात्री ५ ते ६ सशस्त्र दरोडेखोरांनी भीषण दरोडा टाकला. या घटनेत घराचे मालक तथा माजी सैनिक विश्वनाथ जगताप (वय ७० वर्षे) दरोडेखोरांशी दोन हात करताना गंभीर जखमी झाले आहेत. दरोडेखोरांनी घरातील लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास अज्ञात ५ ते ६ सशस्त्र दरोडेखोरांनी कॅनल पट्टी लगत असलेल्या जगताप यांच्या वस्तीवर हल्ला केला. दरोडेखोर घरात घुसल्यानंतर जगताप यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात विश्वनाथ जगताप हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जखमी जगताप यांना तात्काळ परंडा व त्यानंतर बार्शी येथील रुग्णालयात हलवले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस प्रशासनाकडून तपासाची चक्रे वेगवान

घटनेचे गांभीर्य ओळखून परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरात सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

महावितरणवर नागरिकांचा संताप

या घटनेमुळे कुंभेजा परिसरात घबराटीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी परिसरात वीज पुरवठा खंडित होता. ‘रात्रीच्या वेळी वीज नसल्याचा फायदा दरोडेखोरांना मिळाला’ असा आरोप करत स्थानिक नागरिकांनी महावितरण कंपनीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळेच अशा घटनांना वाव मिळत असल्याची भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button