देश - विदेश

भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी

इंदिरा प्रियदर्शिनी गांधी ( १९ नोव्हेंबर १९१७ – ३१ऑक्टोबर १९८४) या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. १९६६ मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत. त्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. जानेवारी १९६६ ते मार्च १९७७ पर्यंत आणि पुन्हा जानेवारी १९८० ते ऑक्टोबर १९८४ मध्ये त्यांची हत्या होईपर्यंत त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केले, ज्यामुळे त्या त्यांच्या वडिलांनंतर सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या दुसऱ्या भारतीय पंतप्रधान बनल्या.१९४७ ते १९६४ या काळात नेहरुंच्या पंतप्रधानपदाच्या काळात इंदिरा गांधींना प्रमुख सहाय्यक मानले जात होते आणि त्यांच्या अनेक परदेश दौऱ्यांवर त्या नेहरुंसोबत असायच्या. १९५९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. १९६४ मध्ये त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर गांधींची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती झाली आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळाच्या त्या सदस्या बनल्या. १९६६ च्या सुरुवातीला (शास्त्री यांच्या निधनानंतर) झालेल्या काँग्रेस पक्षाच्या संसदीय नेतृत्वाच्या निवडणुकीत त्यांनी आपले प्रतिस्पर्धी मोरारजी देसाई यांचा पराभव करून इंदिरा गांधी नेत्या बनल्या आणि शास्त्री यांच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांची जागा घेतली.

पंतप्रधान या नात्याने इंदिरा गांधी त्यांच्या राजकीय आडमुठेपणासाठी आणि सत्तेच्या अभूतपूर्व केंद्रीकरणासाठी ओळखल्या जात होत्या. पूर्व पाकिस्तानमधील स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्याच्या लढाईच्या समर्थनार्थ त्यांनी पाकिस्तानशी युद्ध केले, ज्यामुळे भारताचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. तसेच या विजयामुळे दक्षिण आशियामध्ये भारताचा प्रभाव वाढून भारत हा येथील एकमेव प्रादेशिक शक्ती झाला.

अलिप्ततावादी प्रवृत्तींचा हवाला देत आणि क्रांतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून इंदिरा गांधींनी १९७५ ते १९७७ पर्यंत आणीबाणीची घोषणा केली. आणीबाणीच्या काळात मूलभूत नागरी हक्क निलंबित केले गेले आणि प्रसारमाध्यमांवर निर्बंध लावले गेले. या काळात मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले गेले.  १९८० मध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांनंतर इंदिरा गांधी या पुन्हा सत्तेवर आल्या. ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये त्यांनी सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर त्यांच्याच अंगरक्षकांनी आणि शीख राष्ट्रवाद्यांनी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांची हत्या केली.बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. १९९९ मध्ये बीबीसीने आयोजित केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधींना “वुमन ऑफ द मिलेनियम” असा किताब देण्यात आला.  २०२० मध्ये गेल्या शतकाची व्याख्या करणाऱ्या जगातील १०० शक्तिशाली महिलांमध्ये टाइम मासिकाने इंदिरा गांधींचा समावेश केला. १९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच काँग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्रिपद द्यावे लागले. पुढे विविध मुद्द्यांवरून त्यांचे काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी मतभेद झाले. त्यापैकी प्रमुख म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या रिक्त पदासाठी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांना पाठिंबा देण्याऐवजी स्वतंत्र उमेदवार वराहगिरी वेंकट गिरी यांना पाठिंबा देण्याचा त्यांचा निर्णय. दुसरे म्हणजे अर्थमंत्री मोरारजी देसाई यांच्याशी सल्लामसलत न करता पंतप्रधानांनी बँक राष्ट्रीयीकरणाची घोषणा केली. या पावलांमुळे पक्षाध्यक्ष एस. निजलिंगप्पा यांनी अनुशासनहीनतेसाठी त्यांना पक्षातून काढून टाकले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिशनिस्ट) या पक्षाची स्थापना झाली. नंतर सदर पक्ष १९७७ साली काँग्रेस (आय) पक्षात विलीन झाला, पुढे ज्यालाच अधिकृत अ.भा. काँग्रेसचा दर्जा मिळाला.माहिती व नभोवाणी मंत्री : जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यनंतरर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. शासकीय अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्‍न केला. १९६५ चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगरच्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.

पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताश्कंद येथे पाकिस्तानचे अयूबखान आणि लालबहादुर शास्त्री यात शांतिसमझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button