भाजपाचे नेते , माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन
‘पेप्सी’ आणि प्रमोद महाजन आपला फॉर्म्युला कधीही कोणाला सांगत नाही, असे सांगणारे भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची आज जयंती.
भाजपाला राजकीय क्षेत्रात यश मिळवून देण्यामध्ये प्रमोद महाजन यांच्या रणनितीचा मोठा हात होता. प्रमोद महाजन यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1949 ला तेलंगानातील महबूब नगर भागातील देशस्थ ब्राह्मण परिवारात झाला. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत होते. महाविद्यालयात मैत्री झाली आणि त्यानंतर विद्यार्थीदशेतच राजकीय क्षेत्रात कार्यरत असणार्या प्रमोद महाजन यांनी गोपीनाथ मुंडे यांनाही राजकीय क्षेत्रात आणले. नंतर पुढे जावून ही मैत्री नातेसंबंधात बदलली. प्रमोद महाजन यांच्या बहीणीचे लग्न गोपीनाथ मुंडे यांच्याशी झाले. प्रमोद महाजन लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ‘तरुण भारत’मध्ये 1970 मध्ये त्यांनी उपसंपादक म्हणून काम केले. या कामातूनच त्यांच्या राजकीय जीवनाला आकार प्राप्त झाला. 1974 मध्ये आपली शिक्षकाची नोकरी सोडून प्रमोद महाजन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही काळातच इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. प्रमोद महाजन यांना नासिक जेलमध्ये पाठविण्यात आले. आणीबाणी संपल्यानंतर 1977 मध्ये त्यांना सोडण्यात आले. जनसंघातून राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे निर्माण झाल्यानंतर आरएसएसतर्फे त्यांना भाजपात पाठविण्यात आले. महाराष्ट्राचे महासचिव या पदावर त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केली. 1983 मध्ये त्यांना भाजपाचे राष्ट्रीय सचिव बनविण्यात आले. 1984 इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रथमतः ते निवडणुक लढले. 1986 मध्ये त्यांच्याकडे बीजेपी युवा फ्रंट भारतीय जनता युवा माोर्चाचे अध्यक्षपद आले. 1992 पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. लालकृष्ण आडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेच्या यशात प्रमोद महाजन यांचा सिंहाचा वाटा होता.
राजकीय जीवनात 1986 मध्ये त्यांनी प्रथमच भारतीय संसदेत पाऊल ठेवले, राज्यसभा सदस्य म्हणून आणि मृत्यूपर्यंत ते राज्यसभा सदस्य होते. लोकसभा निवडणुकीत फक्त एकदाच 1996 साली मुंबई नॉर्थ इस्ट मतदारसंघातून निवडून आले. 1998 मध्ये निवडणुकीत पराभूत झाल्यावर पुन्हा राज्यसभा सदस्य होऊन दिल्लीत आले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या 13 दिवसांच्या सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री होते तर दुसर्या सरकारमध्ये 1998 ला ते पंतप्रधान वाजपेयी यांचे सल्लागार होते. नंतर त्यांनी या पदाचा राजीनामा देत राज्यसभा निवडणुक जिंकली आणि त्यांना मंत्रीमंडळामध्ये सूचना आणि प्रसारण मंत्री म्हणून सामावून घेण्यात आले. एकाच वर्षानंतर त्यांच्याकडे जलसंसाधन आणि संसदीय कार्यमंत्री पद आले.
2001 मध्ये त्यांना संचार मंत्रालयाचे मंत्रीपद मिळाले. जबाबदारी होती 1999 मध्ये तयार करण्यात आलेली टेलिकॉम पॉलिसी लागू करण्याची. या पॉलिसीमुळे भारतात मोबाईल क्रांती झाली.
प्रमोद महाजन यांचे राजनैतिक वाटचालीतील परमोच्च बिंदू म्हणजे डिसेंबर 2003 ला दिल्ली, छत्तीसगढ, मध्यप्रदेश आाणि राजस्थान या चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुका. या निवडणुकांत परंपरागत हिंदुत्वाचा मुद्दा सोडून विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणुक लढवावी. या मुद्द्यावर दिल्ली सोडून इतर राज्यात भाजपाचा जबरदस्त विजय होऊन पक्ष सत्तेत आला. 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकींची रणनिती आखण्याची जबाबदारी प्रमोद महाजनांकडे होती. यावेळेस फील गुड आणि इंडिया शायनिंगच्या घोषणा अस्तित्वात आल्या. पण जोरदार प्रचारानंतरही भाजपाला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाची वैयक्तिक जबाबदारी प्रमोद महाजन यांनी स्वीकारली.
22 एप्रिल 2006 ला प्रमोद महाजन आपल्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये होते. त्याचवेळेस त्यांचे छोटे बंधू प्रवीण महाजन तिथे आले आणि त्यांनी पिस्तुलाने प्रमोद महाजन यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. पहिली गोळी त्यांना लागली नाही मात्र बाकीच्या तीन यकृत आणि किडनीमध्ये लागल्या. त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. 13 दिवसांच्या उपचारानंतर हृदयविकाराचा झटका येवून 3 मे 2006 ला प्रमोद महाजन यांचे निधन झाले. 4 मे 2006 ला दादर येथील शिवाजी पार्कवर राजकीय इतमामात त्यांच्या अंतिम संस्कार करण्यात आले.
प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर प्रवीण महाजन यांनी वरळी पोलीस ठाण्यात समर्पण केले. हत्येचे कारण मोाठा भाऊ मला सतत अपमानित करीत असे, असे सांगितले. प्रवीण यांच्यावर खटला चालून 18 डिसेंबर 2007 ला त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. जेलमध्ये असताना त्यांना ब्रेनस्ट्रोक झाला. उपचाराकरिता त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले. उपचारादरम्यान 3 मार्च 2010 ला प्रवीण यांचेही निधन झाले.



