क्राईम
मैंदर्गी शहरात पोलिसांकडून पायी पेट्रोलिंग; वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १६ वाहनचालकांवर १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या वतीने आज दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी मैंदर्गी शहरात पायी पेट्रोलिंग करण्यात आले. या पेट्रोलिंगमध्ये २ पोलीस अधिकारी, २० पोलीस अंमलदार व २० होमगार्ड सहभागी झाले होते. या पायी पेट्रोलिंगमध्ये पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी सहभाग घेतला.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या पेट्रोलिंगदरम्यान वाहनचालक, दुकानदार व फेरीवाल्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
रिक्षा, टमटम, पिकअप व इतर वाहनचालकांना आपली वाहने निर्धारित पार्किंगच्या ठिकाणीच उभी करावीत, वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे व वाहनांची आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावीत, असे निर्देश देण्यात आले.
तसेच दुकानदारांना दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर साहित्य ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये व दुकानांमध्ये तसेच दुकानासमोरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.
फेरीवाल्यांनी नगरपालिकेने निर्धारित केलेल्या जागेतच आपले हातगाडे उभे करावेत व वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
सदर पेट्रोलिंगदरम्यान वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६ वाहनचालकांविरुद्ध एकूण १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी, सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या वतीने अशा प्रकारची प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.



