अशोक खरात प्रकरणावरून राज ठाकरेंचा संताप

मुंबई – नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या गंभीर कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणात सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत सविस्तर आणि रोखठोक पोस्ट करत राज्य सरकारच्या कार्यप्रणालीवर थेट निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, कोणाच्या तरी राजकीय महत्त्वाकांक्षांचे पंख छाटण्यासाठीच या संपूर्ण प्रकरणाचा सध्या वापर केला जात असल्याची चर्चा माझ्या कानावर येत आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की, जर समोरच्या व्यक्तीने किंवा गटाने शरणागती पत्करली आणि काही काळ एकमेकांवर कुरघोड्या करणे थांबवले, तर हे संपूर्ण प्रकरण आपोआप बासनात गुंडाळले जाईल. राज्याच्या राजकारणात त्यांच्या या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधान केले होते की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढले असून त्याचा तपास आम्हीच सुरू केला आहे. या विधानाचा संदर्भ घेत राज ठाकरे यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, जर तुम्हाला या कारवाईचे श्रेय घ्यायचे असेल, तर एक गोष्ट स्पष्ट करा. जेव्हा हे सर्व गंभीर प्रकार घडत होते आणि तुमच्याच घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत होती, तेव्हा हे सगळे घडत असताना याचा कुठेच सुगावा कसा लागला नाही? आणि यासाठी कुणाला दोषी धरायचे?
अशोक खरात याच्या प्रकरणातील अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक तपशील वाचून आपल्याला शब्दशः गरगरल्यासारखे झाले, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आठवण करून दिली की, अगदी काही दिवसांपूर्वीच १९ मार्च २०२६ रोजी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्राच्या महान परंपरेचे सादरीकरण करण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा ते प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या अद्वितीय महापुरुषांनी मराठी मनाची मशागत कशी केली, हे दाखवण्यात आले होते. मात्र, आज त्याच महाराष्ट्रात जेव्हा अशोक खरात सारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादाने असा धुमाकूळ घालतो, तेव्हा खरंच ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र?’ असा उद्विग्न सवाल त्यांनी विचारला आहे.




