महाराष्ट्र

महाडच्या चवदार तळ्यातील पाणी ‘समतेचे अमृत’; चवदार तळ्याचे पाणी घेऊन जा व गावोगावी समतेचा संदेश पोहोचवा: हर्षवर्धन सपकाळ

 

लोकां-लोकांमध्ये वाद निर्माण करणा-या रा. स्व. संघाच्या विचाराला महाडच्या ऐतिहासिक भूमितच गाडून टाका: तुषार गांधी.

छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंद करू नका: उल्का महाजन

महाड – मनुवादी व्यवस्थेने जसे अनेक घटकांवर नियंत्रण ठेवले होते तसेच पाण्यावरही नियंत्रण ठेवून समाजातील एका घटकाला पाण्यापासून वंचित ठेवल्या गेले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ साली महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून ऐतिहासिक क्रांती केली. या ऐतिहासिक क्रांतीने जातीयवादी, स्पृश्य अस्पृश्य व्यवस्थेला मूठमाती देत समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश दिला. महाडच्या चवदार तळ्यातील पाणी हे ‘समतेचे अमृत’ असून या चवदार तळ्याचे पाणी घेऊन गावा-गावातील तलाव, नदी , धरणात सोडून ‘समतेचा संदेश’ सर्वदूर पोहचवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष . हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केले.

कार्यक्रमानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष . हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सभागृहापासून चवदार तळ्यापर्यंत पदयात्रा करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व चवदार तळ्यातील पाणी कलशात भरून काँग्रेस पदाधिका-यांना दिले. हे पाणी सर्व जिल्ह्यांमध्ये गावागावात जाऊन नदी, तलाव व धरणातही सोडले जाणार आहे.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे यासाठी महाडचा सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक अप्रिय घटनांचा सामना करावा लागला पण त्यांनी कशाचीही पर्वा न करता हा सत्याग्रह केला. नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशावेळीही बाबासाहेब यांना अशाच अप्रिय घटनांचा सामना करावा लागला होता. महाडच्या चवदार तळ्याच्या क्रांतीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी यांचा विचार होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केल्यानंतर मनुवादी प्रवृत्तींनी या चवदार तळ्याचे शुद्धीकरण केले होते, त्याच विचाराचा वारसा महाराष्ट्राचे आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे, आजही या मनुवादी विचाराचा सामना आपल्याला करावा लागत आहे, आजही हा विचार अनेक व्यवस्थेपासून बहुजन समाजाला वंचित ठेवत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

महात्मा गांधी यांचे पणतू  तुषार गांधी यावेळी म्हणाले की, चवदार तळ्याची क्रांती ही लोकशाही व संविधानासाठी अत्यंत महत्वाची घटना आहे. अहिंसेच्या मार्गाने ही ऐतिहासिक क्रांती घडवून आणली. महाड मधील चवदार तळ्याची क्रांती ही स्वातंत्र्य व समतेसाठी होती. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमध्ये पाण्यासाठी सत्याग्रह केला तर त्यानंतर तीन वर्षांनी महात्मा गांधी यांनी मीठासाठी सत्याग्रह केला, या दोन घटनांमध्ये खूप महत्वाचा अर्थ आहे. आजही समाजात समता दिसत नाही. एखादा कार्यक्रम करून हा प्रश्न सुटणार नाही तर गावोगावी हा समतेचा संदेश पोहचला पाहिजे. आजचे सरकार हे काम करणार नाही. महाडच्या घटनेलाही रा. स्व. संघाचे स्वरूप देण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न आहे. समतेची ही लढाई सर्वांनी मिळून लढली पाहिजे. काँग्रेस एक विचार आहे तसाच रा. स्व संघाचा विचार आहे. संघाचा विषारी विचार संपवला पाहिजे. लोकांमध्ये वाद निर्माण करूनच त्यांचा विचार जिवंत राहू शकतो पण लोकांमध्ये वाद निर्माण करणा-या विचाराला महाडच्या ऐतिहासिक भूमितच मध्ये गाडून टाका. असे आवाहन . तुषार गांधी यांनी केले.

कोणताही पक्ष कार्यकर्त्यांमुळे असतो, काँग्रेसचा कार्यकर्ता समाजसेवक, सत्याग्रही, व काँग्रेसच्या विचाराचा असतो, आज मात्र यातील पहिले दोन गुण लुप्त पावले आहेत. दुस-या पक्षातील कार्यकर्ते आदेशावर काम करतात पण काँग्रेसचा कार्यकर्ता आदर्शावर काम करतो, असेही तुषार गांधी म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, गांधीवादी नेते  जयंत दिवाण, काँग्रेसच्या एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष . सिद्धार्थ हत्तीअंबिरे, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष . महेंद्र घरत, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शाह आलम शेख, ॲड. श्रद्धा ठाकूर,  अमर खानापुरे, भाऊसाहेब आजबे, फिशरमन काँग्रेसचे मार्तंड नाखवा, प्रवक्ते  हनुमंत पवार, प्रदेश सचिव श्रुती म्हात्रे, पनवेल युवक काँग्रेसचे अध्यक्ष . हेमराज म्हात्रे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येना उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button