महाराष्ट्र

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप

बोटावरील बँडेज ते अघोरी विद्येचा दावा !

पुणे: ठाकरे गटाच्या धडाडीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे शहरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर अतिशय खळबळजनक आणि गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर या स्वतः यशप्राप्तीसाठी आणि वशीकरणासाठी अघोरी व तंत्र-मंत्र विद्या करत असल्याचा मोठा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर, या अघोरी विद्येसाठी रुपाली चाकणकर यांनी स्वतःच्या हाताची अनामिका कापल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य वाढवताना प्रसारमाध्यमांसमोर काही महत्त्वाचे पुरावे देखील सादर केले आहेत. यात रुपाली चाकणकर यांच्या हातावरील जखमा आणि त्यांच्या बोटावर असलेले भलंमोठं ड्रेसिंग व बँडेज स्पष्टपणे दिसत असल्याचे चार फोटो त्यांनी दाखवले. अंधारे यांच्या म्हणण्यानुसार, नाशिक येथील एका प्रकरणातील पीडित व्यक्तीनेही या धक्कादायक प्रकाराची सविस्तर माहिती दिली होती. या तंत्र-मंत्र विद्येचा थेट संदर्भ देताना सुषमा अंधारे यांनी एका विशिष्ट तारखेचा उल्लेख केला आहे. २ सप्टेंबर २०२४ रोजी असलेल्या सोमवती अमावस्या या दिवशी ही अघोरी विद्या करण्यात आल्याचा दाट संशय त्यांनी व्यक्त केला. या तारखेनंतर रुपाली चाकणकर यांचे जेवढे फोटो सार्वजनिक झाले, त्या सर्व फोटोंमध्ये त्यांच्या बोटावर बँडेज असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे अंधारे यांनी निदर्शनास आणून दिले. मंत्रोच्चाराच्या माध्यमातून इतरांना आकर्षित करून राजकीय व वैयक्तिक यश मिळवणे हा या विद्येमागचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःला आधुनिक आणि सुधारणावादी म्हणवून घेणाऱ्या नेत्या प्रत्यक्षात अशा जुन्या अघोरी प्रथांचे पालन करत आहेत, हा प्रकार थेट जादूटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन असल्याचा थेट प्रहार त्यांनी केला आहे.

केवळ अघोरी विद्येचा आरोप करून न थांबता, सुषमा अंधारे यांनी खरात प्रकरणावरूनही रुपाली चाकणकर यांना चांगलेच धारेवर धरले. खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा रुपाली चाकणकर यांनी पूर्वी वारंवार केला होता. मात्र, खरात यांच्या वडिलांच्या निधनावेळी आणि त्यानंतर त्यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यालाही रुपाली चाकणकर स्वतः जातीने उपस्थित होत्या, असे सुषमा अंधारे यांनी उघड केले. याव्यतिरिक्त खरात यांची भाची चक्क रुपाली चाकणकर यांच्याच घरात वास्तव्यास असल्याचे सांगत त्यांच्यातील निकटच्या संबंधांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या सर्व प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे पुरावे आणि कागदपत्रे येत्या दोन दिवसांत आपण सर्वांसमोर जाहीर करणार असल्याचा सज्जड इशाराही सुषमा अंधारे यांनी यावेळी दिला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button