५० खोके घेऊन धर्मांतर करण्याला आमचा ठाम विरोध’; गॅस टंचाईवरून उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर टिका

मुंबई – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती व्हावी, याची आठवण करून देण्यासाठी आपण विधानसभा अध्यक्षांची भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर अध्यक्षांनी हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितल्यावर, म्हणूनच मी सालाबादप्रमाणे असा शब्द वापरला, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
सध्या राज्यात गॅस सिलेंडरची कोणतीही टंचाई नाही असा दावा मुख्यमंत्र्यांकडून केला जात आहे, मग सर्वसामान्यांच्या रांगा का दिसत आहेत? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मधील ३० ते ४० टक्के हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स गॅसच्या अभावी बंद पडत आहेत किंवा पडण्याच्या मार्गावर आहेत. जर जनतेच्या या व्यथा राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नसतील, तर त्यांच्या प्रशासकीय यंत्रणेत मोठा दोष असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ज्या मुख्यमंत्र्यांना जनतेचे दुःख समजत नाही, असे नेतृत्व राज्याला लाभले असेल तर राज्याचे भवितव्य कठीण आहे, अशी सडकून टीका त्यांनी केली.
महागाई आणि टंचाई यामधील फरक स्पष्ट करताना त्यांनी पंतप्रधानांवरही निशाणा साधला. पंतप्रधानांनी सांगितलेला गॅस निर्मितीचा प्रयोग अनेकांनी करून पाहिला, मात्र त्याचे पुढे काय झाले हे सर्वांना माहीत आहे असे ते म्हणाले. जिथे निवडणुका अद्याप बाकी आहेत, तिथल्या जनतेने आता जागे होऊन या सरकारला त्यांची खरी जागा दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे आवाहन त्यांनी केले. गॅस टंचाईच्या विरोधात केवळ शिवसेना रस्त्यावर का उतरावी? ज्या जनतेसाठी आम्ही लढतो, त्यांनीही आता आमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले पाहिजे. आम्ही आंदोलनाची भूमिका नक्कीच घेऊ, पण सत्ताधाऱ्यांनी यावर काय उपाययोजना केल्या आहेत आणि युद्धाचे काय परिणाम होत आहेत, याचे उत्तर देण्याची गरज आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
विधानसभेत नुकत्याच मांडण्यात आलेल्या धर्मांतर विरोधी विधेयकावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य असलेच पाहिजे, मात्र कुणीही बळजबरीने, असहायतेचा फायदा घेऊन किंवा आमिष दाखवून धर्मांतर करत असेल, तर त्याला आमचा पूर्ण विरोध राहील. या विधेयकाला आमचा पाठिंबा आहे, परंतु धमक्या देऊन किंवा ‘५० खोके’ देण्याचे आमिष दाखवून जर कुणी धर्मांतर घडवून आणत असेल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही, असा सणसणीत इशारा त्यांनी दिला.



