राजकीय

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही; सुप्रिया सुळे यांची दिल्लीतून मोठी घोषणा

 

नवी दिल्ली – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. कालच केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, २३ एप्रिलला मतदान तर ४ मे रोजी निकाल घोषित केला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, जर निवडणूक झालीच तर सुनेत्रा पवार याच बारामतीमधून रणांगणात उतरू शकतात. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. तसेच, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ज्यांच्याकडून घोषणा होण्याची चर्चा होती, त्याच खासदार सुप्रिया सुळे यांनी हे चित्र स्पष्ट केले आहे.

या सर्व घडामोडींवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली. आमच्याकडून सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देण्याचा विषयच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ती पोटनिवडणूक आम्ही लढणार नसून महाविकास आघाडीचा विचार देखील तसाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कधीच उमेदवार देणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

याच वेळी त्यांनी राहुरीच्या पोटनिवडणुकीबाबतही भाष्य केले. राहुरीच्या जागेबाबत जयंत पाटील हे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा करतील व आज किंवा उद्या याबाबत महाविकास आघाडी निर्णय घेईल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मात्र, बारामतीत आम्ही उमेदवार देणार नाही यावर त्यांनी पुन्हा भर दिला. आता खरोखरच सुनेत्रा पवार रिंगणात उतरतात की दुसऱ्या कोणाच्या नावाची घोषणा होते, याकडे लक्ष असेल; कारण यावरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पुढची रणनीती ठरणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button