राजकीय
अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती पदी रश्मी हिप्परगी तर उपसभापतीपदी सागर कल्याणशेट्टी यांची बिनविरोध निवड

अक्कलकोट (प्रतिनिधी ) अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपाच्या रश्मी हिप्परगी यांची तर उपसभापतीपदी सागर कल्याणशेट्टी यांची बिनविरोध निवड झाली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नूतन सभापती रश्मी हिप्परगी व उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. तीन वर्षानंतर अक्कलकोट तालुक्यातील मिनी मंत्रालय अक्कलकोट पंचायत समिती कार्यालयात कार्यकर्ते तसेच नेते मंडळी यांची गर्दी झाली होती. पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत शिवसेना सदस्यांनी भाग न घेतल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध घोषित करण्यात आली.
अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पंचायत समिती कार्यालयात गुरुवार दिनांक १२ मार्च रोजी पार पडली. अक्कलकोट पंचायत समितीमध्ये भाजपाचे बहुमत असून भाजपाचे १२ पैकी ८ सदस्य निवडून आले आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाचे चार सदस्य निवडून आले आहेत. अक्कलकोट पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीसाठी पंचायत समिती अक्कलकोट कार्यालयात सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज भरणे , दुपारी २ ते २.१५ वाजेपर्यंत अर्ज छाननी , दुपारी २.३० वाजता अर्ज माघारी घेणे , दुपारी २.३० नंतर निवड जाहीर करणे असा कार्यक्रम घेण्यात आला. सभापती पदासाठी पान मंगरूळ गणातील भाजपाच्या सदस्या रश्मी हिप्परगी तसेच उपसभापती पदासाठी चपळगाव गणातील सदस्य सागर कल्याणशेट्टी यांचा अनुक्रमे एक – एक अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.अक्कलकोटच्या सभापती पदी रश्मी हिपरगी व उपसभापतीपदी सागर कल्याणशेट्टी यांची बिनविरोध निवड झाल्याने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते नूतन सभापती रश्मी हिप्परगी व उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध नेते मंडळी पदाधिकारी व नागरिकांकडून नूतन सभापती रश्मी हिप्परगी व उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पिठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुमित शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी तहसीलदार विनायक मगर गटविकास अधिकारी शंकर कवितके आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी , भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण , नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी ,पंचायत समिती सदस्य विनोद मोरे , आप्पासाहेब किवडे , उत्तम वाघमारे , आशा इंगळे , वैष्णवी सलगरे , विमल गव्हाणे , शिवसेना सदस्य गणेश मोरे , शीतल म्हेत्रे , भिमण्णा सोलापुरे , संगीता पाटील, सागर हिप्परगी ,माजी उपसभापती प्रकाश हिप्परगी , नगरसेवक महेश इंगळे , सिद्धेश्वर कल्याणशेट्टी , मल्लिनाथ कल्याणशेट्टी , शिवशरण जोजन , मल्लिकार्जुन काटगाव , आनंद बुकानुरे , सिद्धाराम टाके , चंद्रकांत दसले , मंडलाध्यक्ष प्रदीप पाटील , मोतीराम राठोड , विलास गव्हाणे , आप्पासाहेब पाटील , नन् कोरबू , नगरसेवक तम्मा शेळके , अविनाश मडिखांबे, उत्तम गायकवाड आदींसह भाजप पदाधिकारी , कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट – नूतन सभापती रश्मी हिप्परगी व उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांच्या निवडीनिमित्त पंचायत समिती परिसर व कार्यालय फुलांनी सजविण्यात आला होता. तसेच गेल्या तीन वर्षाहून अधिक काळापासून बंद असलेले सभापती व उपसभापती कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. सर्वत्र आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आल्याने पंचायत समिती कार्यालय सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.




