कुणबी प्रमाणपत्र मिळवून द्या, नाहीतर २०२९ च्या निवडणुकीत थेट पाडणार!

मनोज जरांगे पाटलांचा मराठवाड्यातील आमदारांना सज्जड दम
लातूर – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने मराठवाड्यासाठी नुकताच एक महत्त्वाचा जीआर प्रसिद्ध केला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकार आणि विशेषतः लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला आहे. लातूर जिल्ह्यातील माकणी थोर या गावी पार पडलेल्या श्री हनुमान आराधना कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा गंभीर इशारा दिला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्याची आता सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकार आणि स्थानिक आमदारांची आहे. जर लोकप्रतिनिधींनी हे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला नाही, तर २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत या आमदारांना मराठा समाज नक्कीच पराभवाची धूळ चारेल, असा सज्जड दम त्यांनी भरला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील सकल मराठा समाजाला एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. जर स्थानिक पातळीवर समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असतील, तर उद्यापासूनच प्रत्येक गावाने आणि भागाने आपापल्या आमदारांना जाब विचारण्यास सुरुवात करावी. समाजाकडून आपल्याला एक वर्षाचा वेळ हवा होता, अशी मागणी आपण फेब्रुवारीतच केली होती. आपल्याला कोणतीही संघटना उभी करायची नसून, तळागाळातील आणि अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी एक भक्कम मदत यंत्रणा तयार करायची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. समाजाचा आपल्यावर आणि आपला समाजावर दृढ विश्वास असल्यानेच हे सर्व कार्य सुरळीत सुरू आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, त्यांच्या जिवाला असलेल्या धोक्याबाबत आणि दिलेल्या सुपारीच्या चर्चेबाबत विचारले असता, त्यांनी एक मोठा खुलासा केला. या प्रकरणात पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे लागले असून लवकरच एक मोठा ट्विस्ट आणि भांडाफोड होणार आहे. त्यामुळेच आपण सध्या जाणीवपूर्वक शांतता बाळगली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महादेव मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले की, हा गंभीर विषय थेट गृह मंत्रालयाच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला असून, संबंधित पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. आगामी एका वर्षाच्या कालावधीत संपूर्ण मराठा समाज हळूहळू आरक्षणाच्या कक्षेत येईल, असा ठाम विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.




