सामाजिक
आंदेवाडी ज येथील पुलावरून वाहून गेलेल्या युवकाचे प्रेत सापडले
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी ज येथील पुलावरून वाहून गेलेल्या युवकाचे प्रेत आज मंगळवारी सकाळी आठ वाजता बबलाद केटीवेअर बंधाऱ्यात मिळाले.
अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील २७ वर्षीय युवक रेवणसिद्ध बिराजदार हा आंदेवाडी ज येथील पुलावरून मोटार सायकल वरून दुधनीकडे रविवारी दि. १० ऑगस्ट सकाळी दहा वाजता निघाला होता. पण आंदेवाडी ज येथील पुलावरून बोरी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने मोटार सायकलसह तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. दोन दिवसांपासून त्या बेपत्ता तरुणाचा शोध महसूल प्रशासन पोलीस प्रशासनाद्वारे सुरू होता. त्या तरुणाच्या शोधासाठी एनडीआरएफ च्या जवानांना बोलावण्यात आले होते. अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर ,आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आंदेवाडी ज येथील पुलाची पाहणी करून बेपत्ता तरुण रेवणसिद्ध बिराजदार यांच्या शोधासाठी प्रशासना सूचना केल्या होत्या. अखेर त्या तरुणाचे प्रेत प्रशासनाच्या सजगतेमुळे व गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे बबलाद केटीव्हीवर येथे मिळाले. बबलाद केटीवेअर येथे बांधलेल्या जाळीमुळे प्रेत त्यात अडकल्याने मंगळवारी सकाळी आठ वाजता मिळाले. दरम्यान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्वतः शोध मोहिमेच्या बोटी मधून पाण्यात जाऊन या शोध कार्यात भाग घेतला होता. तसेच माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनीही आंदेवाडी ज येथील पुलास भेट देऊन या घटनेची माहिती घेतली होती. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माजी जिल्हा परिषद सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनीही आंदेवाडी ज येथील घटनास्थळास भेट देऊन याबाबत गावकऱ्यांशी संवाद साधला होता .गेल्या दोन दिवसापासून आंदेवाडी ज येथील पुलावरून वाहून गेलेल्या युवकास शोधण्यासाठी सर्वांनी जीवाचे रान केले होते. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बेपत्ता तरुण रेवणसिद्ध बिराजदार यांचे प्रेत सापडले आहे. यामुळे प्रशासनासह गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.



