राजकीय

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत म्हेत्रे परिवाराने ताकत दाखविली – शंकर म्हेत्रे 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील राजकारणात कोणी कितीही म्हेत्रे परिवाराला विरोध केला तरी म्हेत्रे परिवाराची जी क्रेझ जनतेमध्ये आहे ती कमी होणार नाही. पैशाच्या जीवावर जास्त काळ राजकारण करता येणार नाही. जनताही नेत्यांपेक्षा हुशार असून नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत धनशक्तीचा पराभव झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत म्हेत्रे परिवाराने आपली ताकत दाखवून दिली आहे असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे नेते शंकर म्हेत्रे यांनी केले.
 नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने अक्कलकोट तालुक्यात चांगली कामगिरी करत भाजपासमोर आव्हान उभे केले आहे.  शिवसेना शिंदे गटाने केलेल्या राजकीय कामगिरीची माहिती शिवसेना नेते शंकर म्हेत्रे यांनी पत्रकारांना दिली. पुढे बोलताना शंकर म्हेत्रे म्हणाले , शिवसेना हा नवा पक्ष असताना नवे चिन्ह असताना अक्कलकोट तालुक्यात या पक्षाला जनतेने भरभरून मते दिली. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व माझ्यावर प्रेम करणाऱ्या हजारो नागरिकांनी म्हेत्रे म्हणजे पक्ष हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अक्कलकोट तालुक्यात सध्या धनशक्तीचे प्रमाण वाढले असून याच्या विरोधात शिवसेना पुढील काळात संपूर्ण ताकतीने उतरणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी शिवसेनेला भरभरून मते दिली. अक्कलकोट तालुक्यातील सहा पैकी चार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या १२ पैकी आठ जागा शिवसेनेने लढविल्या होत्या. यामध्ये सलगर आणि वागदरी जिल्हा परिषद गटात शिवसेना विजयी झाले आहे. तर नागणसूर जिल्हा परिषद गटात निसटता पराभव झाला आहे. पंचायत समितीच्या चार जागावर  शिवसेनेने विजय मिळविला आहे. अक्कलकोट तालुक्यात जवळपास ४० हजार हून अधिक मतदान शिवसेनेला मिळाले आहे असे शंकर म्हेत्रे यांनी यावेळी सांगितले. नगर परिषद निवडणूकीत दुधनी येथे शिवसेनेने विरोधकांना खाते ही उघडू दिले नाही. अक्कलकोट नगर परिषद निवडणूकीतही शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असे शंकर म्हेत्रे यांनी सांगितले.
अक्कलकोट शहर तालुक्यात जी विकास कामे सुरू आहेत ती उपमुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मंजूर केलेल्या निधीमुळे सुरू आहेत. अक्कलकोट शहरातील बस स्थानक , श्री मल्लिकार्जुन मंदिर यांचे बांधकाम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या निधीद्वारे सुरू आहेत. अक्कलकोट शहरातील विकास हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या विकास निधीमुळे सुरू आहे. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ही संपूर्ण ताकतीने अक्कलकोटच्या मतदारसंघात उतरणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजपा सोडून अपक्ष निवडणूक लढवून दाखवावी अथवा इतर पक्षातून निवडणुकीत विजय होऊन दाखवावे असे आव्हान शिवसेना नेते शंकर म्हेत्रे यांनी  दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button