सामाजिक

ज्येष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ

एकेकाळी महाराष्ट्राच्या समाजकारणात आक्रमक भूमिका घेऊन, खळबळ उडवून देणारे दलित पँथरचे संस्थापक आणि ज्येष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ यांचा दि.15 जानेवारी स्मृतिदिन.
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो
तूमची आय-बहीण
आजही विटंबली जाते
हाटाहाटातून…
मवाल्यासारखे माजलेले
उन्मत्त नीरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात
माणसं
चौकाचौकातून…
कोरभर भाकरी पसाभर पाणी
यांचा अट्टाहास केलाच तर
आजही फीरवला जातो नांगर
घरादारावरून
चिंदकातले हात सळसळलेच तर
छाटले जातात आजही नगरानगरातून
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,
किती दिवस सोसायची ही
घोर नाकेबंदी
मरेपर्यंत राहयचं का असंच युद्धकैदी?
ती पाहा रे ती पाहा
मातीची अस्मिता आभाळभर झालीय
माझ्या यातनेनं आता
झिंदाबादची गर्जना केलीय
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,
आता या शहराशहराला
आग लावत चला …
गोलपीठा आणि नामदेव ढसाळ हे समीकरण अजुनही साहित्य क्षेत्रातच नव्हे तर सर्वसामान्यांमध्ये अबाधित आहे. ‘ गोलपीठा ‘ प्रकाशित होताच साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली होती. विद्रोही साहित्यात आपल्या भाषेसह बंडखोरीने उभ्या राहिलेल्या या ‘निळ्या पँथर’ने मराठी वाङ्मय समृद्ध केले.
केवळ मराठीच नाही तर जागतिक साहित्य विश्वावर आपली शैलीदार मोहोर उठवणार्‍या या कवीचा जन्म 1949 च्या फेब्रुवारीत पुण्याजवळच्या एका खेड्यात झाला. दलित कुटुंबात जन्मलेल्या ढसाळांचं बालपण मुंबईतल्या गोलपिठा या वेश्यावस्तीत गेलं. लुंपेनवर्गाच्या समाजात ढसाळांचं बालपण अत्यंत हालाखीच्या स्थितीत गेलं.
मुंबईतल्या वेश्यावस्तीतलं बकालपण, नाकारलेपण आणि उध्वस्तपणाचा उद्रेक घेऊन नामदेव ढसाळांचा गोलपिठा हा धगधगीत काव्यसंग्रह मराठी साहित्यात अवतरला आणि त्यानं मराठी विश्वाला धक्का दिला. मराठी काव्याचे मापदंड बदलून टाकले. प्रस्थापित साहित्यप्रांतात दलित आणि लुंपेनवर्गाची जळजळीत, बंडखोर भाषा नव्यानं दाखल झाली आणि मराठी साहित्य विश्वाला नाकारलं गेलेल्या जगाचं प्रतिनिधीत्व कऱणारा ढसाळांच्या रुपात बंडखोर कवी मिळाला.
गोलपिठानंतर ढसाळांचे ‘मुर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले’, ‘आंबेडकरी चळवळ’, ‘तुही यंता कंची’, ‘खेळ’, ‘प्रियदर्शिनी’, ‘या सत्तेत जीव रमत नाही’, ‘गांडू बगीचा’, ‘मी मारले सुर्याच्या रथाचे सात घोडे’, ‘तुझे बोट धरून मी चाललो आहे’ असे काव्यसंग्रह येत गेले आणि ढसाळांची असामान्य प्रतिभा जगाला परिचित होऊ लागली. ढसाळांच्या कवितांचं अनेक परदेशी भाषांमध्येही भाषांतर कऱण्यात आलं.
नामदेव ढसाळ यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून ज्या प्रमाणं बंड करायला सुरू केलं, त्याच काळात कविता हे राजकारणच आहे असं म्हणत ढसाळ यांनी 1973 ला अमेरिकेतल्या ब्लॅक पँथरच्या धर्तीवर दलित पँथर ही क्रांतीकारी संघटना स्थापन केली. दलितांवरच्या वाढत्या अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी दलित चळवळ प्रभावी ठरत नाही त्यासाठी क्रांतीकारी चळवळ उभारण्याच्या दृष्टीनं ढसाळांनी हे पाऊल उचललं. ही तरुणांची चळवळ होती. जिथं जिथं दलितांवर अत्याचार होत होता, तिथं तिथं ही संघटना संघर्षासाठी धावून जात होती.
रस्त्यावर उतरून संघर्ष करणं आणि अत्याचाराला विरोध करणं हे दलित पँथरचं वैशिष्ठ्य. 70 आणि 80 च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकाराणात आणि सामाजिक जीवनात मोठी खळबळ उडवून देणार्‍या या चळवळीनं मोठा दबदबा निर्माण केला. पण पुढं या चळवळीत अनेक कारणानं फुट पडली. चळवळीचा नेता म्हणून ढसाळांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. ढसाळांनी सामाजिक, राजकीय जीवनात काहीही निर्णय घेतले असतील पण त्याचं सामाजिक चळवळ आणि साहित्य प्रांतातलं स्थान कायम आबाधित राहिल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button