सामाजिक

तयास मानव म्हणावे का..?

तयास मानव म्हणावे का..? 

ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेचि गोडी नाही
बुद्धी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का ? !! १ !!

दे रे हरी पलंगी काही
पशुही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार नाही
तयास मानव म्हणावे का ? !! २ !!

पोरे घरात कमी नाहीत
तयांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का ? !! ३ !!

सहानुभूती मिळत नाही
मदत न मिळे कोणाचीही
पर्वा न करी कशाचीही
तयास मानव म्हणावे का ? !! ४ !!

जोतिष रम सामुद्रिक हो
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का ? !! ५ !!

बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राही
पशू पक्षात ऐसे नाही
तयास मानव म्हणावे का ? !! ६ !!

संसारी दारिद्र्य राही
पांघरून तयावर नाही
निंदिती सगळे लोकही
तयास मानव म्हणावे का ? !! ७ !!

लिहिणे वाचणेही नाही
उपदेश पटायचा माही
पशूंना कळे ते न कळेही
तयास मानव म्हणावे का ? !! ८ !!

पशुत्वाची लज्जा नाही
त्यालाच मानीतो सुखही
पशुजीवाची लक्षणे ही
तयास मानव म्हणावे का ? !! ९ !!

दुसऱ्यास मदत नाही
सेवा त्याग दया माया ही
जयापाशी सदगुण नाही
तयास मानव म्हणावे का ? !! १० !!

गुलामगिरीचे दुःख नाही
जराही त्यास जाणवत नाही
माणुसकीही समजत नाही
तयास मानव म्हणावे का ? !! ११ !!

पशूपक्षी माकड माणूसही
जन्ममृत्यू सर्वांनाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव म्हणावे का ? !! १२ !!
– सावित्रीमाई फुले

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button