Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

साहित्यिक दगडू मारुती पवार उर्फ दया पवार

Admin by Admin
December 21, 2025
in सामाजिक
0
साहित्यिक दगडू मारुती पवार उर्फ दया पवार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिळेखाली हात होता, तरी नाही फोडला हंबरडा
किती जन्माची कैद, कुणी निर्मिला हा कोंडवाडा
अशा संयमित पण प्रभावी शब्दांत दलितांवर वर्षानुवर्षे होणारा अन्याय, त्यांचे शोषण याला वाचा फोडणारे, भयंकर असे सामाजिक वास्तव अभिव्यक्त करणारे व तथाकथित सवर्णांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे साहित्यिक दगडू मारुती पवार उर्फ दया पवार यांचा आज स्मृतिदिन.
अहमदनगर जिल्ह्यातल्या धमनगाव नावाच्या खेड्यात जन्मलेलं एक पोर. त्याचं नाव दगडू. दगडू मारुती पवार. त्याच्या लहानपणीच वडिलांचं निधन झालेलं. गरिबी प्रचंड. त्यातच मागासवर्गीय. त्यामुळं समाजात घोर उपेक्षा; अवहेलना. संगमनेरच्या बोर्डिंगात राहून शिकत होता तो. दुर्दैवानं मॅट्रिकच्या परीक्षेत तो नापास झाला. बाकी सगळ्या विषयात त्याला उत्तम मार्क्स मिळाले होते; पण इंग्रजीत २८ गुण. आणखी सातच गुण मिळाले असते तर दगडू फर्स्ट क्लासमध्ये मॅट्रिक झाला असता. पण आता मात्र दगडूला शिकायची उभारीच नव्हती राहिली. इंग्रजीची भीती मनातून जात नव्हती. त्यातच नापास झाल्यानं बोर्डिंगमधून त्याची हकालपट्टी होणार हे उघडंच होतं. तसं झालं तर दगडू कुणं जाणार होता? कुठं शिकणार होता? तो बोर्डिंगच्या अधिकार्‍यांना भेटला. हातापाया पडला. कळवळून विनंती केली. ‘यावेळी नक्की पास होईन’ म्हणून खात्री दिली. दगडूला पालापाचोळ्यागत भरकटत जायचं नव्हतं. सुदैवानं बोर्डिंगमध्ये राहायची परवानगी मिळाली. पण बरोबरीची पोरे ‘नापास गाडगं’ म्हणून कुचेष्टा करीत होती. शेवटी दगडूनं पोरांच्यात मिसळणंच बंद केलं. बोर्डिंगजवळच कोंबड्यांचं एक रिकामं खुराडं होतं, तो तिथं बसून एकटाच अभ्यास करू लागला. गोळाभर अन्नासाठी करावी लागणारी लाचारी आणि गिळावा लागणारा अपमान त्याला सहन होत नव्हता. त्यानं ठरवलं होतं; ‘‘जिवाचं रान करेन, पण इंग्रजीत पास होईन.’’ तो इंग्रजीच्या पुस्तकावर तुटून पडला. वाचन; लेखन; पाठांतर! पानंच्या पानं त्यानं पाठ केली पुस्तकाची. देहभान विसरून त्यानं आभाळाएवढा अभ्यास केला. इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकाचं अक्षरशः पीठ पाडलं. परीक्षा झाली. रिझल्ट लागला. दगडू पास झाला. नुसता पास नाही, ६३ गुण मिळवून तो फर्स्टक्लासमध्ये पास झाला. मग मात्र; त्यानंतर दगडूनं कधीच मागं वळून पाहिलं नाही. पुढे दगडू पवारचा ‘दया’ पवार झाला. ‘दया पवार’ मराठी भाषेतला उत्तम लेखक झाला. ‘बलुतं’ या त्याच्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचं सर्वोत्कृष्ट वाङ्‌मयाचं पारितोषिक मिळालं. दया पवारांना ‘पद्मश्री’ ऍवॉर्डनं भारत सरकारनं गौरवलं!
घरच्या दारिद्रयामुळे व जातिव्यवस्थेतून निर्माण झालेल्या जाचक व प्रतिकूल परिस्थितीमुळे सतत संघर्ष करतच त्यांना आपल्या आयुष्याचा मार्ग चोखाळावा लागला. महाराष्ट्र बौद्ध साहित्य सभा, प्रगत साहित्यसभा या संस्थांशी संबंध आल्याने १९६८ पासून दलित साहित्य चळवळीत ते सक्रिय सहभागी होते. मुंबईत परळ येथे एका पशुवैद्यक महाविद्यालयात प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून काम करत त्यांनी शिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांनी ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकात लेखन केले.
‘बलुतं’ या आत्मकथनाद्वारे ते प्रसिद्धीस आले असले, तरी त्यांचा मूळ पिंड कवीचाच! आपल्या कवितेतून त्यांनी अस्पृश्य गणल्या गेलेल्या लोकांच्या व्यथा-वेदना बोलक्या केल्या ‘बलुतं’ (१९७८) या आत्मकथनपर पुस्तकामुळे ते साहित्यविश्वात विशेष गाजले. त्यांच्या या पुस्तकाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले. विविध भाषांमधून या पुस्तकाचे अनुवाद झाले. फोर्ड फाउंडेशनचा पुरस्कारही ‘बलुतं’साठी त्यांना मिळाला. त्यांच्या ‘बलुतं’मधून एका आगळ्या वेगळ्या, वाचकांना धक्का देणार्‍या अनुभवविश्र्वाचे दर्शन घडते. सरळ, स्पष्ट व रोखठोक निवेदन आणि आपल्या सभोवतालच्या स्थितीचे केलेले पारदर्शी,वास्तव चित्रण ही बलुतंची बलस्थाने आहेत. दया पवार यांच्या या आत्मकथनामुळे दलित साहित्यात आत्मचरित्रपर पुस्तकांचे एक नवे, वेगळे दालन निर्माण झाले, खुले झाले. दलित समाजाच्या वेदना स्वानुभवातून जाणून, उमजून घेताना आलेले अनुभव चिंतनरूपातून अशा आत्मकथनांमधून प्रकट झाले. त्या काळात ‘बलुतं’ वर, दया पवारांवर बरीच टीकाही झाली. दलित समाजाचे दु:ख, मानसिक अवहेलना, मानवी मूल्यांचे अध:पतन स्वत:च्या लेखनातून मांडत असताना दया पवारांची भाषा केवळ विद्रोहाची नव्हती, तर ती भाषा अंतर्मुख करणार्‍या एका विचारवंत विश्लेषकाची होती, हे त्यांचे सर्वांत मोठे वेगळेपण होय. त्यांचे ‘चावडी’ व ‘दलित जाणिवा’ हे लेखसंग्रह आणि ‘विटाळ’ हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. ‘डॉ. आंबेडकर’ या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटाच्या पटकथेचे त्यांनी लेखन केले. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळावरही नियुक्ती झाली होती.
राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक, सांस्कृतिक, वाङमयीन चळवळींमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग, परभाषिक साहित्याचा व्यासंग, विश्र्लेषक वृत्ती, चिंतनशीलता, परखडपणा, सामाजिक प्रश्नांविषयी गंभीर व सखोल आस्था या वैशिष्ट्यांचा प्रत्यय त्यांच्या समग्र लेखनातून येतो. त्यांचे लेखन परिणामकारक होते. पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांना काही प्रमाणात लौकिक यशही मिळाले. परंतु व्यवस्थेच्या प्रभावामुळे त्यांना वैयक्तिक आयुष्यात कायमच दु:ख, वेदना, अपयश, शारीरिक व मानसिक हालअपेष्टा यांचा सामना करावा लागला. हे कधीही न संपणारं; कमी न होणारं दु:खच त्यांच्या साहित्यातून स्वाभाविकपणे व्यक्त झालं आहे. त्यांच्याच एका कवितेतून या वेदनेची जाणीव आपल्याला होते.
दु:खानं गदगदताना हे झाड मी पाहिलेलं
तशी याची मुळं खोलवर बोधिवृक्षासारखी
बोधिवृक्षाला फुलं तरी आली,
हे झाड सार्‍या ऋतूंत कोळपून गेलेलं.
धमनी धमनीत फुटू पाहणार्‍या यातना
महारोग्याच्या बोटांसारखी झडलेली पानं
हे खोड कसलं? फांदीफांदीला जखडलेली कुबडी
मरण येत नाही म्हणून मरणकळा सोसणारं
दु:खानं गदगदताना हे झाड मी पाहिलेलं…
एका वेगळ्याच अनुभवविश्वाचा वाचकांना परिणामकारकरीत्या परिचय करून देणार्‍या या संवेदनशील साहित्यिकाचे 20 डिसेंबर, १९९६ रोजी दिल्ली येथे निधन झाले
– योगेश शुक्ल

Previous Post

अक्कलकोट , दुधनी आणि मैंदर्गी नगर परिषदेचे कारभारी आज ठरणार ! 

Next Post

दुधनीत शिवसेना शिंदे गटाची सत्ता

Admin

Admin

Next Post
दुधनीत शिवसेना शिंदे गटाची सत्ता

दुधनीत शिवसेना शिंदे गटाची सत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157527
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697