शैक्षणिक

सी. बी. खेडगी महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून सुवर्ण पदक

अक्कलकोट, ( प्रतिनिधी )अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांमध्ये दहा सुवर्णपदक मिळवून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी ह्या होत्या. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले, पर्यवेक्षक संजय कलशेट्टी, डॉ. अण्णासाहेब साखरे उपस्थित होते.विशेष म्हणजे विद्यापीठाच्या एकूण ५९ सुवर्णपदकापैकी तब्बल दहा सुवर्णपदके मिळवणारे खेडगी महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय ठरले आहे.तसेच महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाची सुवर्ण पदकाची हॅटट्रिक झाली आहे.  गुरुवारी पार पडलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २१ व्या दिक्षांत समारंभामध्ये या सहा विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 
एम. एस्सी. रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागाचे जुवेरीया शेख ( तीन सुवर्ण पदक), एम. काॅम. वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर विभागाचे प्रदीप सुरवसे ,( सुवर्ण पदक), बी. एस्सी. रसायनशास्त्र पदवी विभागाचे श्रुती जकापूरे  ( दोन सुवर्ण पदक ), कन्नड  विभागातील पदव्युत्तर परीक्षेमधून पूजा डबरे व पदवी  परीक्षा मधून सोनाली फुलारी ( सुवर्ण पदक), बी. ए. राज्यशास्त्र विषयातून लक्ष्मी आळगी या विद्यार्थिनींनी दोन सुवर्णपदक
अशा एकुण दहा सुवर्णपदक मिळविल्या बद्दल फेटा बांधून शाल व पुष्पहार घालून  गौरविण्यात आले.माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी, चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, प्राचार्य डॉ. धबाले, पर्यवेक्षक कलशेट्टी यांचे गौरवपर भाषणे झाली. तर
कुमारी शेख, जकापूरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. विकास भारतीय यांनी केले तर डॉ. गुरुसिध्दय्या स्वामी यांनी आभार प्रदर्शन केले.महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच एका शैक्षणिक वर्षात १० सुवर्णपदके मिळवणारे विद्यापीठातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.माजी विद्यार्थ्यांसह पालक वर्गातून सर्वत्र कौतुक होत आहे.
चौकट — या सहा विद्यार्थ्यांनी दहा सुवर्ण पदक मिळवून 
महाविद्यालयाचे नाव
सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. हे सुवर्णपदक विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि कौशल्याचे प्रतीक असून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे आहे.
– बसलिंगप्पा खेडगी, 
चेअरमन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button