टॉप न्यूज

प्रेम नवनाथ पासारे याने ‘ड्रंक अँड ड्राइव्ह अलर्ट सिस्टम’ नावाचं क्रांतिकारी उपकरण केले तयार

सांगली -सांगली जिल्ह्यातील एका लहानशा गावातून आलेला, अवघ्या १०वीत शिकणारा प्रेम नवनाथ पासारे याने ‘ड्रंक अँड ड्राइव्ह अलर्ट सिस्टम’ नावाचं क्रांतिकारी उपकरण तयार करून संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. नशेत वाहन चालवणाऱ्यांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रेमने हे तंत्रज्ञान विकसित केलं असून, यामध्ये एक खास अल्कोहोल सेन्सर गाडीच्या इग्निशनमध्ये बसवला जातो. चालकाने मद्यपान केलं असल्यास गाडी सुरूच होत नाही, आणि त्याचवेळी मालकाला फोन येतो—”आपके कार का चालक नशे में है!” यासोबत गाडीचा क्रमांक, चेसिस नंबर आणि लोकेशनही SMS द्वारे पाठवलं जातं. हे संपूर्ण उपकरण फक्त ₹१५,००० मध्ये तयार केलं असून त्यासाठी खास मोबाइल अ‍ॅपही तयार करण्यात आलं आहे.

प्रेमने या उपकरणाची कल्पना एका अपघाताच्या घटनेनंतर विकसित केली. नशेच्या अवस्थेतील चालकामुळे झालेल्या अपघाताने त्याच्या मनात तीव्र अस्वस्थता निर्माण केली आणि “नशेत वाहन चालवणाऱ्यांना थांबवण्यासाठी काहीच उपाय नाही का?” या प्रश्नातून या संकल्पनेचा जन्म झाला. प्रेमचे वडील चहा टपरी चालवतात; आर्थिकदृष्ट्या साधी परिस्थिती असूनही, त्यांच्या आणि शाळेच्या मुख्याध्यापकांच्या विश्वासामुळे प्रेमला हा प्रकल्प पूर्ण करता आला. विशेष म्हणजे, त्याने या यंत्रासाठी कॉपीराईटसाठीही अर्ज केला आहे.

आज प्रेमचं हे काम देशभरातून कौतुकाचं आणि प्रेरणादायी मानलं जात आहे. लाखो रुपये खर्च करून अपघातांवर उपाय शोधले जात असताना, एका गावातील विद्यार्थ्याने केवळ इच्छाशक्ती, जिद्द आणि कल्पकतेच्या बळावर प्रॅक्टिकल सोल्यूशन तयार केलं आहे. प्रेमने हे सिद्ध केलं की वय, परिस्थिती किंवा सुविधा महत्त्वाच्या नसतात – महत्त्वाचं असतं ते म्हणजे सामाजिक जाणिवा आणि काहीतरी बदल घडवण्याची तीव्र इच्छा. हे उपकरण केवळ एक संशोधन नाही, तर भविष्यात अनेकांचे प्राण वाचवणारी एक यंत्रणा ठरू शकते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button