राज्यात मान्सूनची गती मंदावली; कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आवाहन
मुंबई – राज्यात यंदा मान्सून १२ दिवस आधीच दाखल झाला आहे. सर्वसाधारण मान्सून महाराष्ट्रात सात जून रोजी प्रवेश करतो, मात्र यंदा २५ मे रोजीच त्याचे आगमन झाले आहे. या मान्सूनने महाराष्ट्राचा काही भाग व्यापला आहे. परंतु, आता राज्यात पावसाची गती मंदावली असून, पुढील १२ जूनपर्यंत पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मान्सूनचे प्रवाह कमकुवत झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच बहुतांश भागात कोरडे हवामान अपेक्षित असून, कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भात ४० अंशापर्यंत तर मराठवाडा व खानदेशात ३५ ते ४० अंशामध्ये कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे. या कोरड्या हवामानाचा परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे.



