राजकीय
भाजपाचे मिलन कल्याणशेट्टी आणि शिवसेनेचे प्रथमेश म्हेत्रे यांच्या विजयाने युवकात उत्साहाचे वातावरण !

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट नगरीच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मिलन कल्याणशेट्टी तसेच दुधनी नगरीच्या नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते प्रथमेश म्हेत्रे यांच्या विजयाने शहर तालुक्यातील युवकात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.अक्कलकोट आणि दुधनी नगराध्यक्षपदी युवा नेतृत्व निवडून आल्याने या शहरात शहरांच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. अक्कलकोट नगरीच्या नगराध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू युवकांची मोठी फळी निर्माण करणारे भाजपाचे युवा नेते मिलन कल्याणशेट्टी यांना मतदारांनी मोठे मताधिक्य देत तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीच्या विकासाची संधी दिली आहे. मिलन कल्याणशेट्टी यांना एकूण मते १४ हजार ८६१ इतकी पडली आहेत. नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांना ८ हजार ५५३ मताचे मताधिक्य मिळाले आहे. इतके मताधिक्य आजपर्यंत कोणत्याच थेट नगराध्यक्षला मिळाले नाही.मिलन कल्याणशेट्टी यांचा नम्र स्वभाव , मृदूभाषा , सर्वांशी हसत खेळत राहण्याची खिलाडू वृत्ती , हजारो तरुण कार्यकर्त्यांचे जाळे , थेट जनसंपर्क यामुळे नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांना मतदारानी भरभरून मतदान केले. नगराध्यक्षपद निवडणुकीच्या काळात हजारो कार्यकर्त्यांची सोबत मिलन कल्याणशेट्टी यांना मिळाली. तसेच विकासप्रिया आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे मोठे राजकीय पाठबळ मिलन कल्याणशेट्टी यांना मिळाल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला. तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीच्या नगराध्यक्षपदी हे तरुण तडफदार नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांची निवड झाल्याने युवा वर्गासह नागरिकात समाधानाचे वातावरण पसरले आहे. नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्याकडून अक्कलकोट शहर विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
दुधनी शहराच्या नगराध्यक्षपदी म्हेत्रे घराण्यातील तिसऱ्या पिढीने बाजी मारली आहे. दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती , शिवसेना शिंदे गटाचे शिवसेना युवा आघाडी जिल्हाप्रमुख , युवानेते प्रथमेश म्हेत्रे यांनी दुधनीच्या नगराध्यक्षपदी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला आहे. नूतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांना एकूण ५ हजार १५७ मते मिळाली. यामध्ये २ हजार ८६८ मताधिक्य प्रथमेश म्हेत्रे यांना मिळाले. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे तसेच शिवसेना नेते शंकर म्हेत्रे यांच्या प्रचंड अशा पाठबळामुळे प्रथमेश म्हेत्रे यांचा विजयाचा मार्ग सुकार झाला. ज्येष्ठ नेते स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे पुण्याईमुळे नूतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांचा विजय होण्यास मदत झाली आहे. युवानेते प्रथमेश म्हेत्रे यांची तालुक्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. युवा नेते प्रथमेश म्हेत्रे यांचे पिताश्री ज्येष्ठ नेते शंकर म्हेत्रे यांचा असणारा मोठा जनसंपर्क , थेट जनतेची संवाद , युवा वर्गाची फळी , मतदारांना आपलेसे करणारा स्वभाव यामुळे प्रथमेश म्हेत्रे यांचा प्रचंड असा विजय झाला. वास्तविक पाहता दुधनीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजपा उमेदवारांसाठी मोठी ताकद लावली होती. पण मतदाराने म्हेत्रे घराण्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. दुधनीत शिवसेना शिंदे गटाची संपूर्ण सत्ता आली आहे. थेट नगराध्यक्ष सह वीस नगरसेवक विजय झाले आहेत. या पुढील काळात दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांच्याकडून विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे हे नक्कीच विकास कामांसाठी झटतील अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.




