टॉप न्यूज
अक्कलकोट विधानसभेसाठी बहुजनांची मोट बांधणार – -बाळासाहेब मोरे

अक्कलकोट (प्रतिनिधी)वर्षानुवर्षे प्रस्थापित नेते आणि त्यांचे घराणेशाहीतील वारसदार सत्तेत राहूनही अक्कलकोट तालुक्यातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला नाही आणि तालुक्याच्या विकासाचे चित्र बदलू शकले नाही त्यामुळे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट ला निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यास अक्कलकोट तालुक्यातून बहुजनांची मोट बांधून लढायला सज्ज असल्याची भूमिका पंचायत समिती माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांनी मांडली. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या सदिच्छा भेटीत त्यांनी स्वतःचा बायोडाटा सादर करून विधानसभा निवडणूक लढवण्याची भूमिका मांडली.
यावेळी जरांगे पाटील यांनी बाळासाहेब मोरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरचिटणीस प्रा. प्रकाश सुरवसे, अल्पसंख्यांक नेते फरीद जमादार, ओ. बी. सी. नेते शंकर व्हनमाने, संभाजी ब्रिगेड चे दयानंद काजळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मतदारसंघातील समीकरणे कशी जुळवता येतील याबाबत माहिती घेत 29ऑगस्ट ला लढण्याचा निर्णय झाला तर तयारीत रहा असा सल्ला दिला. यावेळी बाळासाहेब मोरे यांनी त्यांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीचा लेखाजोखा मांडला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा बहुजन आमदार व्हावा यासाठी तालुक्यातील अठरापगड जातींना विश्वासात घेऊन निवडणूक लढवणार असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी तालुक्यातील प्रलंबित विकासाच्या प्रश्नाची देखील चर्चा झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक इच्छुक अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहिले होते. अक्कलकोट तालुक्यातुन बाळासाहेब मोरे यांचे शिष्टमंडळ हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
