टॉप न्यूज

चैतन्यमय भारत निर्माण करणारी धम्मक्रांती

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्मात धर्मांतर केले. यानंतर महाराष्ट्रात व देशात अनेक ठिकाणी अस्पृश्य वर्गातील लाखों लोकांनी हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात धर्मांतर केले. ही घटना म्हणजे आधुनिक भारतातील सर्वात मोठे सांस्कृतिक स्थित्यंतर आहे. हे सांस्कृतिक स्थित्यंतर आधुनिक भारताच्या जडणघडणीवर दूरगामी परिणाम करणारे ठरले आहे. धर्मांतरानंतर अवघ्या दोन महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. यामुळे धर्मांतरानंतर या समुहांमध्ये कोणत्या प्रकारचा सांस्कृतिक बदल व्हायला पाहिजे याचे मार्गदर्शन करणारा कोणताही विद्वान मार्गदर्शक मिळाला नाही. बुद्ध धम्माचे सखोल ज्ञान असलेले डॉ. भदंत आनंद कौशल्यायन हे एकमेव भिख्खू त्यावेळी महाराष्ट्रात होते. परंतु त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेता येऊ शकेल अशी धार्मिक यंत्रणा त्यावेळी धर्मांतरीत बौद्ध समूहांकडे नव्हती. गावोगावी फिरून धम्माची ओळख करून देणारा भिख्खू वर्ग निर्माण झालेला नव्हता. यामुळे बाबासाहेबांची पूर्वीची काही भाषणे, बाबासाहेबांनी प्रकाशित केलेली बौद्ध पूजा पाठ ही पुस्तिका, प्रबुद्ध भारत व इतर नियतकालिकातून प्रकाशित होणारे धम्म विषयक लेख आणि रिपब्लिकन पुढाऱ्यांची भाषणे यातून लोकांना बौद्ध धम्माची थोडी-थोडी ओळख होऊ लागली. बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म हा इंग्रजी ग्रंथ १९५७ साली प्रकाशित झाला. त्यानंतर या ग्रंथाची मराठी आवृत्ती १९६१ साली प्रकाशित झाली. या ग्रंथामुळे बौद्ध धम्माचा तात्त्विक भाग हळूहळू गावागावात पोहोचू लागला. मात्र बौद्ध धम्माची सांस्कृतिक बाजू आणि सांस्कृतिक दिशा नेमकी कोणती असावी याचे मार्गदर्शन राजकीय पुढारी अथवा अन्य मार्गदर्शकाकडून होऊ शकले नाही. याचा परिणाम म्हणुन धम्मक्रांतीच्या पहिल्या दोन दशकात या क्रांतीने अपेक्षित वेग घेतला नाही.

साधारणपणे १९७० च्या नंतर शिक्षित आंबेडकरवादी तरुणांची फळी आंबेडकरवादी राजकारण आणि समाजकारण यात रस घेऊ लागली. या तरूणांपैकी बरेचजन चांगले कवि होते. त्यांना साहित्यिक, वैचारिक दृष्टी होती. त्यापैकी बरेचजन डाव्या मार्क्सवादी प्रबोधन पद्धतीने भारलेले होते. यामुळे त्यांची वैचारिक प्रवृत्ती विद्रोही, प्रस्थापित परंपरेला नकार देणारी,क्रांतिकारी अशी होती. या तरुणांनी पुढे दलित पॅन्थर ही आक्रमक विद्रोही संघटना स्थापन केली. या संघटणेतील तरूणांनी सुरू केलेल्या साहित्यिक चळवळीतून आंबेडकरवाद म्हणजे प्रस्थापित परंपरेला नकार हे चळवळीचे मुख्य सूत्र बनले. धम्मदीक्षेच्या वेळी बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञामधील हिंदू धर्माला नकार देणाऱ्या पहिल्या आठ प्रतिज्ञा व १९ व्या क्रमांकाची प्रतिज्ञा याच आंबेडकरवादी सांस्कृतिक प्रबोधनाचा मुख्य आधार बनल्या. धम्म म्हणजे काय आणि सद्धम्म म्हणजे काय हे सांगणाऱ्या उर्वरित १३ प्रतिज्ञाबद्दलची चर्चा दुय्यम ठरली गेली. अभिजात बौद्ध तत्वज्ञान, इतर देशातील, प्रांतातील समकालीन बौद्ध संस्कृती याबद्दल जाणून घेण्याची कोणालाही गरज वाटली नाही. यामुळे महाराष्ट्रातील धर्मांतरीत बौद्ध समूहाकडे विशिष्ट अशा सांस्कृतिक दृष्टीचा अभाव निर्माण झाला आहे. आजही महाराष्ट्रातील बौद्धांच्या सांस्कृतिक चर्चाविश्वाचा (Discourse) तात्विक केंद्रबिंदू नकार (Negation) हाच आहे. या सर्व कारणांमुळे बौद्धांच्या स्वतंत्र बौद्ध संस्कृतीच्या संदर्भात जी काही चर्चा होते त्यामध्ये बौद्धांनी अमुक या रूढी पाळू नये, अमुक सण साजरे करू नये, लग्नात हळद समारंभ करू नये, मंगळसूत्र घालू नये, हे आपले नाही, हे बाबासाहेबांनी सांगितले नाही, हे बौद्ध धम्मात सांगितले नाही, अशा नकारात्मक मुद्यावरच होते. यातून वैर, द्वेषभाव, दुरावा,संघर्ष,परकेपणा,गोंधळलेपण अशा वर्तनात्मक अपप्रवृत्ती निर्माण झाल्या आहेत. यामुळे बौद्धांच्या सांस्कृतिक विकासाची गती खुंटली आहे. हे टाळून बौद्धांची स्वतंत्र सकारात्मक आणि प्रगतिशील संस्कृती विकसित करायची असेल तर विध्वंसक नकारात्मक प्रवृत्तीचा त्याग करावा लागेल. बुद्ध धम्माचा मूळ तत्वज्ञानात्मक गाभा सकारात्मक विधायक सृजन आणि सांस्कृतिक समन्वय यावर आधारित आहे. विकासशील बौद्ध संस्कृतीसाठी हाच आधार प्रमुख मानून वाटचाल करणे आवश्यक आहे.

संस्कृती कशी विकसित होते ?

कोणत्याही समाजात त्या समाजाची स्थिर आणि कधीही न बदलणारी अशी संस्कृती नसते. संस्कृती ही संबंधित समूह आणि समूहाबाहेरील लोकांमधील परस्परसंवाद, सामाजिक अनुकूलन (Adoption), सामाजिक अभिसरण (Social Endosmosis ) आणि विविध मूल्यांच्या प्रसाराच्या निरंतर प्रक्रियेतून आकार घेते. समाजात पूर्वापार चालत आलेले संकेत ( convention ) यांना समाजातील व्यक्ती आणि गट सामूहिक अनुभवाच्या आधारे प्रचारीत करतात, या संकेतांचा अर्थ विकसित करतात आणि अंतर्गत आणि बाह्य प्रभावांना प्रतिसाद देऊन यात आवश्यक ते बदल करतात तेव्हा संस्कृती विकसित होते. यातून त्या समाजाची काही विशिष्ट अशी सामायिक मूल्ये, श्रद्धा, रीतिरिवाज, रूढी, विधी, परंपरा, सण-उत्सव,पोशाख, खानपान सवयी, भाषा, कला आणि संस्था (कुटुंब संस्था, विवाह संस्था इ.) तयार होतात. विचार करण्याच्या, एकमेकांशी वागण्याच्या व व्यवहार करण्याच्या पद्धती विकसित होतात. यालाच त्या समाजाची संस्कृती असे म्हंटले जाते. उपरोक्त विवेचन लक्षात घेतल्यास संस्कृती विकसित होण्यात धर्माचा आधार महत्वाचा ठरत असला तरी ती पूर्णत: धार्मिक बाब नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

कोणत्याही समाजाला तात्विक,सामाजिक,आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायचे असेल तर केवळ तत्वज्ञानाचा उपदेश करून भागणारे नसते. त्यासाठी तत्त्वज्ञानाधारीत दृश्य स्वरूपातील संस्था, अशा संस्थांचे नियम, संस्थांशी निगडीत सदस्यांचे आचरण निर्धारित करावे लागते. सामान्य लोकांना आकर्षित करतील अशी प्रतीके रुजवावी लागतात. सामान्य लोकांच्या पूर्वापार चालत आलेल्या समजुती, प्रथा-परंपरा, आचार-विचार यांना नवीन रूप द्यावे लागते. यातुन संस्कृतीचा विकास होतो. बौद्ध धम्म संस्कृतीचा विकास अशाच प्रकारे झालेला आहे हे बौद्ध धम्माच्या प्रगती आणि विकासाचा अभ्यास केल्यास दिसून येते.

बुद्धाने एकीकडे मानवी उत्कर्षासाठी अनुपयुक्त विचार परंपरा नाकारल्या आणि चार आर्यसत्ये, आर्य अष्टांगिक मार्ग, प्रतीत्य समुत्पाद ( अवलंबित उद्भव ) अनित्यतावाद (आरंभ-विकास-लय) यावर आधारित नवीन धम्म तत्त्वज्ञान उपदेशीत केले. दुसरीकडे समाजात प्रचलित असलेली पूजनीय,महनीय व्यक्तींची पूजा करण्याची परंपरा यास उत्तम मंगल ठरविले. वज्जी लोकांमध्ये पूर्वापार प्रचलित असलेल्या सात अपरिहानिय गणधम्माना समाजाच्या उत्कर्षासाठी उपयुक्त ठरविले. ( प्रचलित सांस्कृतिक परंपरांचे वैधिकरण ) पूर्वजांच्या चैत्याची व पूजास्थानाची नियमित पूजा करणे उत्कर्षकारक ठरविले. ( सांस्कृतिक प्रतिकांची प्रतिष्ठापना ) बुद्धाचे जन्मस्थान, बुद्धाचे ज्ञानप्राप्ती स्थान, बुद्धाने जेथे पहिला उपदेश केला ते स्थान आणि बुद्धाचे परिनिब्बाण स्थान या चार ठिकाणांना पवित्र स्थाने म्हणजेच तीर्थस्थाने ठरवून उपासकांनी या चार स्थळाना आपल्या हयातीत एकदातरी भेट द्यावी असा उपदेश केला.(नवीन तीर्थस्थळांची निर्मिती) बुद्धाने समाजाच्या वर्तणूकीचे कोणतेही सामाजिक नियम, कौटुंबिक बाबीं, वारसाहक्क, विवाह इत्यादीचे नियमन करणारे नियम, तयार केले नाहीत. जे सामाजिक नियम प्रचलित होते त्यांना धम्माचे अधिष्ठान देऊन आदर्श गृहिणी, आदर्श गृहस्थ, आदर्श व्यक्ती यांची वर्तणूक कशी असावी याचा उपदेश केला.(सामाजिक आदर्शांची निर्मिती) अशा प्रकारे बुद्धाने तत्वज्ञान आणि सामाजिक व्यवहार यांची जी गुंफण केली त्यातून बौद्ध संस्कृतिचा विकास झाला आहे हे दिसून येईल.

सम्राट अशोककालीन बौद्ध संस्कृतीचा उत्कर्ष

बुद्धाने उपदेशीत केलेल्या नैतिक मूल्यांवर आधारित समाज आणि संस्कृती यांचा परमोच्च विकास सम्राट अशोकाच्या शासनकाळात झालेला आहे. अशोकाने राज्याच्या नीतिनिर्देशक धोरणाची आधारशीला म्हणून बौद्ध धम्मधोरण राबवले. यामुळे सहिष्णुता आणि शांतता यावर आधारलेली सामाजिक सहजीवनाची एक नवीन संस्कृती भारतात उदयास आली. अशोकाने राबविलेल्या धम्मधोरणामुळे समाजातील नैतिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात एक नवीन प्रवाह निर्माण झाला.अशोकाने समन्वयवादी बौद्ध संस्कृती विकसित केली.

सम्राट अशोकाने वैरभावास थारा न देणारी समन्वयवादी बौद्ध संस्कृती निर्माण करण्यावर आत्यंतिक भर दिला होता असे त्यानी कोरलेल्या शिलालेखातून स्पष्ट होते. गिरणार येथील बाराव्या शिलालेखात सम्राट अशोक लिहितो, “ देवांना प्रिय असलेला प्रियदर्शी राजा सर्व पंथांच्या लोकांचा, गृहत्याग करणाऱ्यांचा, सर्व गृहस्थांचा आदर करतो, (तो) त्यांना दान देतो. विविध प्रकारच्या पूजा करून त्यांना सन्मानित करतो. “ यावरून सर्व धर्मपंथाच्या लोकांना समतेने वागविले पाहिजे हे बौद्ध धम्मीय मूल्य समाजात रुजविण्याचा अशोकाने प्रचार केला. याच शिलालेखात पुढे लिहिले आहे की, “ स्वतःच्या धर्माची किंवा पंथाची अकारण स्तुती करू नये. विशिष्ट संदर्भात दुसऱ्या धर्मातील एखाद्या बाबीची चर्चा करायची झाल्यास ती कोणाला दुखावणारी नसावी. जो कोणी स्वतःच्या धर्म/संप्रदायाप्रति आसक्ती बाळगून स्वतःच्या धर्म/संप्रदायाची स्तुती करू लागतो आणि इतर धर्म/संप्रदायावर टीका करू लागतो, तो प्रत्यक्षात स्वतःच्या धर्म/संप्रदायाचे मोठे नुकसान करतो. म्हणून, एकमेकांशी सुसंवाद साधणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे. यामुळे लोक एकमेकांच्या धर्मातील तत्त्वे ऐकतात आणि स्वीकारण्यायोग्य तत्त्वांचे आदानप्रदान करतात. (सम्राट अशोक के शिलालेख, विपश्यना विशोधन विन्यास इगतपुरी प्रकाशन, पृष्ठ १७ ) यावरून सम्राट अशोकाने अन्य धर्म संप्रदायाशी संघर्षाऐवजी समन्वयाचे धोरण अवलंबिले हे स्पष्ट होते.

अशोकाने बौद्ध धर्माचे मूल्य लोकजीवनात रुजवण्यासाठी धम्ममहामात्र , रुव्याध्यक्ष महामात्र, व्रजभूमिक, रज्जुक आणि इतर अधिकारी नेमले होते. या अधिकाऱ्यांनी लोकांमध्ये जाऊन, पालकांचा आदर, सत्यवचन, वृद्ध, श्रमण-ब्राह्मण (भिक्षू, संत, सन्याशी इ. ) इत्यादींचा सन्मान, सर्व प्राणीमात्रांप्रती दया, सर्व धर्म संप्रदायांच्या प्रति आदर, मेत्ता (मित्रत्व ), करुणा भाव इत्यादी नैतिक मूल्यांचा प्रसार करावा याची व्यवस्था केली. अशोकानी केलेल्या धम्मप्रसाराच्या उपाययोजनामुळे समाजात धम्माचे आचरण वाढले आहे असे अशोकाने लिहून ठेवले आहे. (उक्त, पृष्ठ ५ ) अशोकाने श्रीलंका, म्यानमार, अफगाणिस्तान, ग्रीस आणि इजिप्त येथे धम्मदूत पाठवले आणि बुद्धाच्या शिकवणुकीचा सर्वदूर प्रसार व्हावा यासाठी व्यवस्था केली. यामुळे बौद्ध सांस्कृतिक मूल्ये परदेशात पोहोचली आणि बौद्ध संस्कृती जागतिक स्तरावर रूजली.

नवीन सांस्कृतिक प्रतिकांची निर्मिती.

सम्राट अशोकाने बौद्ध संस्कृती रुजविण्यासाठी नैतिक मूल्यांच्या रुजवणुकीसोबतच नवीन प्रतिकांची प्रस्थापना केली. अशोकाने त्यांच्या राज्यात आणि इतरत्र ८४ हजार स्तूप बांधल्याचा उल्लेख काही ग्रंथात आहे. अशोकाने लुंबिनी,सारनाथ, बोधगया, कुशीनारा या बुद्धाच्या जीवनाशी समबंधीत पवित्र ठिकाणी दगडी स्तंभ उभारले व भव्य स्तूप बांधले. या ठिकाणांना स्वत: भेट दिली व या स्थळांना पवित्रतेचा दर्जा दिला. त्याचप्रमाणे सांची, भारहुत, लौरिया, वैशाली, रामपुरवा इत्यादी अनेक ठिकाणी मोठमोठे स्तूप बांधले. अनेक ठिकाणी विहार बांधले, लेणी खोदली, पानवठे-विहिरी बांधल्या. या सर्व वास्तू आणि स्थापत्यांमधून विविध बौद्ध प्रतिकांना लोकांच्या मनावर बिंबविले.

सम्राट अशोक व त्यानंतर होऊन गेलेल्या बौद्ध राजांनी बौद्ध स्थापत्य कलेचा विकास अत्युच्च विकास केला. यातून बांधकाम आणि स्थापत्य याची विशिष्ट अशी संस्कृती व प्रतीके प्रस्थापित झाली. स्तूपाचे बांधकाम करताना स्तूपाच्या वरच्या भागातील अर्धगोलाकार घुमट (अंद ), हर्मिका, विशिष्ट प्रकारची छत्रावली (Umbrella / Chatra) हे बुद्धाच्या धम्माशी संबंधीत विविध संकल्पना स्पष्ट करणारी प्रतीके म्हणून रुजविली गेली. धम्ममार्गात प्रवेशाचे आणि चार आर्यसत्यांचे प्रतीक म्हणून स्तूपाच्या चार दिशांना तोरणद्वार ही धम्म प्रतीके स्थापित करण्यात आली.

धम्म चक्र प्रवर्तनाचे चिन्ह म्हणून २४ आऱ्यांचे धम्मचक्र, धम्माचा उद्घोष चारही दिशांना घुमतो आहे याचे प्रतिक म्हणून चौमुखी सिंह, बुद्धाच्या गर्भप्रवेशाचे व धम्माच्या जागृतीचे प्रतीक म्हणून हत्ती, आणि हत्ती अभिषेक घेणारी गजलक्ष्मी महामाया, बुद्धाच्या गृहत्यागाचे प्रतीक म्हणून घोडा, सामर्थ्य, धम्मनिष्ठा व स्थैर्य याचे प्रतिक म्हणून बैल,ज्ञानप्राप्तीचे प्रतीक म्हणून बोधिवृक्ष अशी विविध प्रतीके बौद्ध संस्कृतीची वाहक म्हणून जनतेमध्ये लोकप्रिय झाली. लोकांनी आपल्या सामाजिक आणि धार्मिक जीवनात ती स्वीकारली.

सम्राट अशोकाने त्याच्या राज्यात बौद्ध धम्म हा सामाजिक आणि नैतिक आचारसंहिता म्हणून राबविला. यामुळे तत्कालीन समाजात विद्यमान असलेली सामाजिक आणि धार्मिक विषमता जवळपास नष्ट झाली. अहिंसा, संयम, सत्य, दया, करुणा सामाजिक बंधुभाव आणि आपसी सौहार्द्र या मूल्यांचे नैतिक अधिष्ठान असलेला समाज निर्माण झाला.

डाॅ. आंबेडकरांच्या धम्मक्रांतीनंतरचे सांस्कृतिक परिवर्तन

डाॅ. आंबेडकरांच्या धम्मक्रांतीनंतरच्या बौद्ध समूहाचा विचार केल्यास या समूहात घडून आलेले सांस्कृतिक परिवर्तन अभूतपूर्व असे आहे.
धम्मक्रांतीनंतर महाराष्ट्रातील बौद्ध समाजाच्या वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली. बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञांनी या परिवर्तनाला वैचारिक अधिष्ठान दिले. बुद्ध, धम्म आणि संघ यांचा स्वीकार, प्रज्ञा, शील आणि करुणेवर आधारित जीवन जगण्याची प्रेरणा, अंधश्रद्धेचा त्याग आणि विषमतावादी विचारांना नकार ही या परिवर्तनाची महत्त्वाची सूत्रे बनली आहेत.
या प्रक्रियेतून आंबेडकरोत्तर काळात खालील बौद्ध सांस्कृतिक मूल्ये आकारास आली.

तात्त्विक व वैचारिक मूल्ये: प्रज्ञा, विवेकनिष्ठा, चिकित्सक विचार, सम्यक दृष्टी आणि अंधश्रद्धेचा त्याग.

नैतिक व चारित्र्यविषयक मूल्ये: शील, पंचशील, सत्यवचन, प्रामाणिकपणा, अहिंसा, संयम, मैत्री आणि करुणा.

सामाजिक व समतावादी मूल्ये: समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, जातिभेद व अस्पृश्यतेचा विरोध, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक न्याय.

शैक्षणिक व प्रबोधनात्मक मूल्ये: शिक्षण, वाचन, लेखन, वैचारिक चर्चा, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जागृती आणि संघटन.

कौटुंबिक व दैनंदिन जीवनातील मूल्ये: परस्पर आदर, समानता, जबाबदारी, सहकार्य, संवेदनशीलता आणि धम्माशी सुसंगत आचरण.

धार्मिक व सांस्कृतिक मूल्ये: बुद्धवंदना, त्रिशरण-पंचशील, धम्मप्रवचन, बुद्धजयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महापरिनिर्वाण दिन, बुद्धविहार, बौद्ध साहित्य आणि सांस्कृतिक प्रतीके.

समन्वयवादी व मानवतावादी मूल्ये: धर्मनिरपेक्षता, परस्पर संवाद, वैरभावाचा त्याग, सर्व प्राणिमात्रांप्रती दया आणि शांततापूर्ण सहजीवन.

नवीन सांस्कृतिक प्रतीके व श्रद्धास्थानांची निर्मिती

बौद्ध संस्कृतीच्या विकासात सांस्कृतिक प्रतीके आणि तीर्थस्थळांना विशेष महत्त्व आहे. बुद्धाच्या जीवनाशी संबंधित स्थळांना सम्राट अशोकाने दिलेल्या प्रतिष्ठेप्रमाणेच, महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील महत्त्वाच्या घटनांशी संबंधित ठिकाणांना नवीन सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यामध्ये भीमा-कोरेगाव येथील शौर्य स्तंभ, पाणी पिण्याच्या हक्कासाठी सत्याग्रह करण्यात आलेले महाडचे चवदार तळे, काळाराम मंदिर सत्याग्रहाशी संबंधित नाशिक, बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केलेले नाशिक जिल्ह्यातील येवला शहर, धुळे जिल्ह्यातील लळिंग येथील वनखात्याचे विश्रामगृह, औरंगाबाद येथील नागसेन वन व विद्यापीठ परिसर, नागपूर येथील दीक्षाभूमी, चंद्रपूर येथील दीक्षाभूमी आणि मुंबईतील चैत्यभूमी अशी स्थळे बौद्ध व आंबेडकरी समाजाच्या सांस्कृतिक स्मृतीचा महत्त्वपूर्ण भाग बनली आहेत. या स्थळांवर दरवर्षी देश-विदेशातील लाखो आंबेडकरी अनुयायी एकत्र येऊ लागले. या सांस्कृतिक प्रतिकांनी शुद्रातीशुद्रावरील ब्राह्मणी वर्चस्ववादाची, ब्राह्मणी अत्याचारांची पुन्हा-पुन्हा चर्चा घडू लागली. ब्राह्मणी वर्चस्ववादाविरुद्ध लढण्याची प्रेरणा नवीन पिढीकडे हस्तांतरित होऊ लागली. ब्राह्मणी धर्माविरुद्ध बुद्धाने केलेल्या प्रभावी सांस्कृतिक क्रांतीनंतरची ही आंबेडकरवादी सांस्कृतिक क्रांती ब्राह्मणवाद्यांच्या पुढे नव्याने निर्माण झालेले सांस्कृतिक आव्हान आहे. ब्राह्मणवादाच्या सांस्कृतिक वर्चस्वाला आव्हान देणारी, ब्राह्मणवादाच्या विरोधातील एक नवी पर्यायी सांस्कृतिक प्रतीकांची व प्रेरणास्थळांची निर्मिती होणे व त्यास भक्कम सामाजिक आश्रय लाभणे ही प्रक्रिया सांस्कृतिक स्थित्यंतर घट्ट करण्यास मजबूती प्रदान करणारे आहे.
धम्मक्रांतीचा हा संपूर्ण पट पाहिल्यास या क्रांतीने प्रज्ञा, शील, करुणा, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय यांवर आधारित नवीन जीवनपद्धती निर्माण केली आहे. या क्रांतीने बुद्धाचे धम्मतत्त्वज्ञान, अशोकाची सांस्कृतिक विकासप्रक्रिया आणि बाबासाहेबांची सामाजिक पुनर्निर्माण प्रक्रिया यांना एका सलग साखळीत जोडुन चैतन्यमय (vibrant ) भारत निर्माण करण्याची जबाबदारी भारतीय माणसांवर सोपविली आहे.
सुनील खोबरागडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button