भारताचे स्वातंत्र्यवीर शहीद भगतसिंग

आज 27 सप्टेंबर शहीद भगतसिंग यांची जयंती.(जन्म : सप्टेंबर २७, १९०७)
भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अनेक वीर शहीद झाले. त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे. पण त्या सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. मार्च २३, १९३१) लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. म्हणूनच त्यांनी ’शहीद-ए-आलम’ असा किताब दिला जातो. त्यांच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळला जातो.
सरदार भगतसिंगाचा जन्म पंजाबातील बंग या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. वडील किशनसिंग यांना क्रांतिकारी वाड्मयाचा प्रसार केल्या बद्दल मंडालेच्या तुरुंगात त्यांना सजा भोगावी लागली होती. भगतसिंग पाच-सहा वर्षाचा असताना त्याच्या काका सोबत शेतावर गेला होता काका शेतात गव्हाची पेरणी करीत असता तेहीत्यांना मदत करू लागले. तेव्हा त्यांच्या काकाने त्यांना विचारले ” भगत, कसली पेरणी करतोय ?” यावे तो म्हणाला, मी बंदुकीच्या बिया परत आहे ”, का? असा प्रश्न काकांनी विचारला असता भगतसिंग म्हणाले ”कां म्हणजे काय?’ या बंदुकीच्या बियांची झाडे झाली म्हणजे त्यांच्या वर बंदुका येतील आणि मग त्या बंदुकातून गोळ्या झाडून मी इंग्रजांना मारीन व माझा देश स्वतंत्र करीन”.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बंग येथे झाल्यावर भगतसिंग लाहोरच्या डी. ए. व्ही. व पुढे न्यशनल कॉलेज मध्ये १९२३ साली बी. ए. झाले. कॉलेज शिक्षण चालू असतानाच त्यांनी आजन्म अविवाहित राहून देश्याच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करण्याची शपथ घेतली.
भगतसिंगांचा व्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे ‘बंदी जीवन’ हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे. ऑस्कर वाइल्डचे ‘वीरा-दी निहिलिस्ट’, क्रोपोटकिनचे ‘मेमॉयर्स’, मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची ‘ला मिझरेबल’, हॉलकेनचे ‘इटर्नल सिटी’, अप्टन सिंक्लेअरची ‘क्राय फॉर जस्टिस’, रॉस्पिनची ‘व्हॉट नेव्हर हॅपन्ड’, गॉर्कीची ‘मदर’ ह्या कादंबर्याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्य समर हा सरकारने प्रकाशनाआधीच बंदी आणून जप्त केलेला ग्रंथ त्यांना शिरोधार्थ होता. युरोपातील मुद्रित आवृत्ती धडपडीने प्राप्त करून घेऊन त्यांनी त्याचे इथे प्रकाशन व वितरण केले. जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी सावरकरलिखित मॅझिनीचे चरित्र वाचले होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.
भगतसिंग हे उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या कॊंग्रेस अधिवेशनास ते ‘अकाली’ या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी ‘वीर अर्जुन’, ‘प्रताप’,इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे ‘कीर्ती’, कानपूरचे ‘प्रभा’, दिल्लीचे ‘महारथी’ नि अलाहाबादचे ‘चॊंद’ या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद ‘मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम’ बलवंतसिंग या नावाने केला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ‘चॊंद’ च्या फाशी विशेषांकात ‘निर्भय’, ‘बलवंत’, व ‘ब्रिजेश’ या नावे अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधात ‘नॅशनल कॉलेज’ तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी ‘राणा प्रताप’, ‘दुर्दशा’,’ सम्राट चंद्रगुप्त’ या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली.
बी.ए. होताच त्यांनी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामुग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर ‘आर्मी’ हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे ‘मुख्य सेनापती’ तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना. खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, जतींद्रनाथ दास आदी कट्टर क्रांतीकारकांच्या साहायाने त्यांनी ‘नव जवान भारत सभा’ हि संघटना सुरु केली. दिनांक ९ फेब्रुवारी १९२५ च्या रात्री लखनौ जवळच्या काकोरी स्टेशनातून सरकारी खजिना घेऊन निघालेली एक रेल्वे आगगाडी वाटेत अडवून तिच्या तील सर्व खजिना त्या क्रांतीकारकांनी पिस्तुले खरीद्न्यासाठी व बॉंब तयार करण्यासाठी लांबविला.
३० ऑक्टोबर १९२८ रोजी सायमन कमिशन लाहोर शहरात गेले असता तेथे लाला लचपतराय यांच्या नेतृत्वा खाली निदर्शने सुरु झाले. पोलिसांनी केलेल्या बेदम लाठी हल्ल्यात लालाजीन्ना बराच मार बसला.व आजारी पडून त्यातच त्यांचा अंत झाला. याचा सूड घेण्याचे भगतसिंग आदींनी ठरविले व लालाजींच्या मृत्युला कारणीभूत झालेल्या मिस्टर स्कॉटऐवजी गैरसमजुतीने स्यण्डर्स ला मारले. व मारून पळून जात असता त्याचा पाठलाग करणार्या चननसिंग यालाही पिस्तुलाने टिपले. भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी स्वत:च्या स्वार्थाला लाथ मारून भगतसिंगाने आपले घर सोडले आणि तो स्वातंत्र चळवळीत दाखल झाला. याच बगतसिंगाने ९ एप्रिल १९२९ रोजी बटुकेश्वर या साथीदाराच्या मदतीने कायदे मंडळाच्या सभागृहात ‘ इंकलाब जिंदाबाद ‘ च्या घोषणा देत हात बॉम्ब टाकून इंग्रजांना दणाणून सोडले.
पुढे ‘डिस्पूट बिल’ व ‘पब्लिक सेफ्टी बिल ‘ हे दोन अन्यायकारक कायदे ब्रिटीश सरकारने मंजूर करून घेण्यासाठी केंद्रीय विधानसभेपुढे आणले असता पेक्षागृहात कमी शक्तीशाली बॉंब टाकून व ब्रिटीश सरकारच्या धिक्काराची पत्रके भिरकावून, भगतसिंग व त्यांचा सहकार्यांनी ब्रिटीश सरकारला हादरवून सोडले. पण ते पकडले जावून त्यांच्यावर खटले भरले गेले व न्यायालयाच्या निर्णयानुसार भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या तिघांना लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात २३ मार्च १९३१ रोजी फासी देण्यात आले. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फ़ाशी झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सेंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फ़ाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. .
महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकार्यांची फ़ाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फ़ाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फ़ाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फ़ाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले – “कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवले.” भगतसिंगांचा मार्ग जरी गांधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली.
अमृतसर ते चंदीगड महामार्गावर असलेले खटकरकलाँ येथे भगतसिंग यांचे वडिलोपार्जित घर आहे. तिथे हुतात्मा भगतसिंग स्मृति संग्रहालय आहे. संग्रहालय सोमवारी बंद असते. येथे अनेक दुर्मिळ फोटो आहेत. हुतात्मा भगतसिंग यांची स्वाक्षरी असलेली, त्यांना लाहोर तुरुंगात भेट दिली गेलेली भगवद्गीतेची प्रत येथे आहे. भारत – पाकिस्तान फाळणी नंतर भगतसिंगांची दफनभूमी असलेला हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता; पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्या वेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या.
भगतसिंगाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर आपल्या मातेवर, भू – मातेवर – भगिनीवर कोणी अत्याचार करू लागला तर स्वार्थाला बाजूस सारून कर्तव्यासाठी लढा. त्यामुळे जीवनात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल .



