माढ्यात काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक खासदारांना अटक केल्याचा तीव्र निषेध

लोकशाहीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही; काँग्रेसचा केंद्र सरकारविरोधात संताप
माढा (प्रतिनिधी) -देशाची राजधानी नवी दिल्ली येथे निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जात असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक खासदारांना पोलिसांनी अडवून त्यांना आयोगाच्या कार्यालयाकडे जाण्यापासून रोखल्याच्या आणि अटक केल्याच्या घटनेचा माढा शहर काँग्रेस कमिटी यांच्यावतीने काल रोजी तीव्र शब्दांत व जाहीर निषेध करण्यात आला.
दिनांक: ५ ते ७ ऑक्टोबर असे सलग ३ दिवस घडलेल्या ह्या गंभीर प्रकारामुळे लोकशाही व्यवस्थेची मूल्ये, प्रत्येकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि, विरोधी पक्षांच्या कायदेशीर/घटनात्मक अधिकारांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत अशी भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधी पक्षाला नागरिकांचे प्रश्न मांडण्याचा, निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा आणि, घटनात्मक संस्थांकडे दाद मागण्याचा संपूर्ण अधिकार आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आणि, खासदारांना अडवून त्यांच्यावर अटकेची कारवाई करणे ही बाब निषेधार्ह असल्याचे यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले. लोकशाहीत विविध मतभेदांना उत्तर दडपशाहीने नव्हे तर, संवादाने दिले पाहिजे अशी मागणीही त्यांनी याठिकाणी केली.
लोकशाहीतील विरोधाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये
निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना योग्य उत्तरे मिळणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींना आपली भूमिका मांडण्यापासून रोखण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांवर पारदर्शकपणे चर्चा व्हावी अशी मागणी माढा शहर काँग्रेस कमिटीने केली. लोकशाही आणि, संविधानाने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करणे ही प्रत्येक लोकशाही संस्थेची जबाबदारी असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सदरील घटनेचा तीव्र निषेध नोंदवून संबंधित प्रकरणात लोकप्रतिनिधींना आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी आणि, लोकशाही संकेतांचे पालन केले जावे अशी भूमिका माढा शहर काँग्रेस कमिटी यांच्यावतीने याप्रसंगी मांडण्यात आली.
सदर निषेध आंदोलनात माढा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज साठे, सोशल मीडिया विभागाचे राज्य समन्वयक सचिन खैरे-पाटील, जिल्हा सरचिटणीस मोतिलाल सुतार, युवक काँग्रेस संगठनेचे जमीर सय्यद, बाबासाहेब ओहोळ, पक्षाचे नेते जहीर मणेर, चेतन पवार, अश्पाक मोमीन, आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
“लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही; संविधानिक अधिकारांच्या रक्षणासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील” असा निर्धार यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.



