टॉप न्यूज
ओंकार शुगर देणार ३ हजार ४५० रुपये ऊसदर , चेअरमन बाबुराव बोत्रे पाटलांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
अक्कलकोट (प्रतिनिधी ): तालुक्यातील तडवळ येथील ओंकार पॉवर कॉर्पोरेशन प्रा. लि. युनिट क्रमांक ५ या कारखान्याने गाळप हंगाम २०२६-२७ साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसदर जाहीर केला आहे. कारखाना व्यवस्थापनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार गाळपासाठी येणाऱ्या उसाला पहिली उचल प्रतिमेट्रिक टन ३२५० रुपये देण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्याकडून दिलासा मिळणार आहे.
कारखान्याचे जनरल मॅनेजर के. एम. गायकवाड यांनी २४ नोव्हेंबर २०२६ रोजी अपर जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांना पत्राद्वारे ही माहिती कळविली आहे.
कारखाना व्यवस्थापनाने ऊसदर तीन टप्प्यांत देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार पहिली उचल म्हणून गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये कारखान्याकडे गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रतिमेट्रिक टन ३२५० रुपये अदा करण्यात येणार आहेत.
दुसऱ्या हप्त्यापोटी गाळप हंगाम संपल्यानंतर रकमेच्या उपलब्धतेनुसार प्रतिमेट्रिक टन १०० रुपये देण्यात येणार आहेत. तर तिसऱ्या हप्त्यापोटी गाळप हंगामात उत्पादित झालेल्या संपूर्ण साखरेला सरासरी ४५ रुपये प्रतिकिलोपेक्षा जास्त विक्रीदर मिळाल्यास आणि आर.एस.एफ. सूत्रानुसार रक्कम उपलब्ध झाल्यास प्रतिमेट्रिक टन १०० रुपये अदा करण्यात येणार आहेत.
कारखाना व्यवस्थापनाने जाहीर केलेल्या या दरामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यंदाच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याच्या दृष्टीने कारखान्याने हा निर्णय घेतला आहे.



