सामाजिक
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांचा अक्कलकोट तालुक्यातील काझी कणबस व सुलतानपूर येथे गावभेट दौरा

नागरिक व शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद
अक्कलकोट : ( प्रतिनिधी ) दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील काझी कणबस व सुलतानपूर या गावांना भेट देऊन गावभेट दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी गावातील वीज, रस्ते, पाणी यांसह विविध पायाभूत सुविधांबाबतच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या तातडीने सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. मतदारसंघातील अनेक गावांना सध्या भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत असून पाणीटंचाई, शेतीचे प्रश्न, सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला.
यावेळी शेतकऱ्यांच्या ऊस दराच्या प्रश्नावर बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आज ऊस दरासाठी शेतकरी मायबाप रस्त्यावर उतरला आहे. एका बाजूला खतांच्या किमती वाढल्या आहेत, सिंचनासाठी पाणी सोडण्याबाबत अनिश्चितता आहे, पीक विम्याचा लाभ वेळेत मिळत नाही आणि दुसरीकडे काही साखर कारखान्यांकडून अद्याप शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले अदा करण्यात आलेली नाहीत. आधीच दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असताना या समस्यांमुळे त्यांच्यावर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती ओढवली आहे.
शेतकरी संकटात असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही माझी जबाबदारी आहे. थकीत ऊस बिले मिळवून देण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांची ही लढाई माझीही लढाई असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करेन. आम्ही तुमच्यासोबत आहोत. शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आवाज उठविणार, अशी ग्वाही खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिली.
प्रत्येक गावात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देणे, शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे तसेच ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापुढील काळात पाणी, शेती आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देऊन लोकहिताची आणि शाश्वत विकासाची कामे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, राहुलजी गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील तरुणांनी सुरू केलेल्या आंदोलनांमुळे मोदी सरकार घाबरले आहे. देशातील तरुणांचे प्रश्न, लोकशाहीचे संरक्षण आणि जनतेच्या हक्कांसाठी राहुलजी गांधी सातत्याने संघर्ष करत असून काँग्रेस पक्षही जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे लढत राहील.
या गावभेट दौऱ्यामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांना आपल्या समस्या थेट खासदारांसमोर मांडण्याची संधी मिळाली. नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांना दिला.
यगावभेट दौऱ्यात अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, युवक अध्यक्ष गजानन जकीकोरे, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, माजी सरपंच रावसाहेब धर्मसाले, हर्षदीप गायकवाड, तानाजी धर्मसाले, राजू मोरे, धनंजय चौगुले, मधुकर पाटील, निरंजन मावरकर, गणेश शिंदे , अवधूत धर्मसाले, मल्लिनाथ बंडगर, संजय प्रचंडे, बसवराज प्रचंडे, गणेश जाधव, लाडलेसाहेब घाटे, शिवराज ब्याले, गुड्डू मुल्ला यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



