पंढरपूर नगरपरिषदेच्या कारभाराविरोधात युवक काँग्रेसचे हलगीनाद आंदोलन

मुरूम वाहतुकीच्या ई-निविदा प्रक्रियेतील माहिती मिळत नसल्याने संदिप शिंदे आक्रमक; नगरपरिषदेसमोर आंदोलन
पंढरपूर -पंढरपूर नगरपरिषदेच्या सन २०२६-२०२७ मधील मुरूम पुरवठ्याच्या ई-निविदा प्रक्रियेत झालेल्या कामकाजाची सविस्तर माहिती मिळावी ह्या मागणीसाठी युवक काँग्रेस संगठनेचे पंढरपूर शहराध्यक्ष संदिप शिंदे यांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात आज रोजी व्यापक स्वरूपात हलगीनाद आंदोलन सुरू केले आहे.
मुरूम पुरवठ्याच्या निविदेची संपूर्ण प्रक्रिया, निविदेत सहभागी झालेल्या ठेकेदारांची माहिती, निविदा मंजुरीची कागदपत्रे, मुरूम कोणत्या ठिकाणाहून व किती प्रमाणात आणण्यात आला, मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनांचे क्रमांक, वाहननिहाय नोंदी, मोजमाप पुस्तिका, जीपीएस लोकेशनचे फोटो, चलने, बिले व देयकांच्या नोंदी आदी महत्त्वाची माहिती मिळावी यांसाठी संदिप शिंदे यांनी माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत यापूर्वी अर्ज केले होते.
वारंवार अर्ज, स्मरणपत्रे आणि, अपील करूनही नगरपरिषद प्रशासनाकडून अपेक्षित माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, संबंधित माहिती मिळविण्यासाठी त्यांनी चलनाद्वारे ११८६ रुपये भरल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.
सदर पार्श्वभूमीवर दिनांक: १२ नोव्हेंबर, २०२६ रोजी मुख्याधिकारी (पंढरपूर नगरपरिषद) यांना निवेदन देऊन २२ नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण माहिती देण्याची मागणी करण्यात आली होती. अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
त्यानुसार आज सोमवार; दिनांक: २३ नोव्हेंबर, २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून पंढरपूर नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. यापुढे २४ नोव्हेंबर रोजी बोंबाबोंब आंदोलन, २५ नोव्हेंबर रोजी लक्षवेधक आंदोलन व, २६ नोव्हेंबर रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असून २७ नोव्हेंबरपासून सहकाऱ्यांसह आमरण उपोषणास बसण्याचा इशारा संदिप शिंदे, राजेंद्र उराडे, समिर कोळी, राहुल कौलगे-पाटील, सुहास भाळवणकर, प्रा.अशोक डोळ, शिवाजी धोत्रे, देवानंद ईरकल, नागनाथ आधटराव, बाळासाहेब आसबे, महेश आधटराव, आनंद सोमासे, सोमनाथ आरे, संग्राम मुळे, रविंद्र अग्रवाल, अक्षय व्हनसाळे, शुभम शिंदे, सुरज शिंदे, मल्हारी फाळके, आण्णासाहेब पवार, आदी काँग्रेस पक्षाच्या याठिकाणी उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.
नगरपरिषदेच्या कारभारात पारदर्शकता असावी, नागरिकांना माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती मिळावी आणि, मुरूम पुरवठ्याच्या निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
सदरील आंदोलनामुळे पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाच्या संशयास्पद अशा कामकाजाकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.



