भारताचे माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग

कामाप्रती असलेला व्यासंगी व शैक्षणिक दृष्टीकोन व विनम्र आचरणामुळे आदराने बघितले जाणारे विचारवंत, अभ्यासक व भारताचे १३ वे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची आज दि. २६ सप्टेंबर जन्मदिवस.
मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील गाह बेगल या खेड्यात झाला. आई अमृत कौर आणि वडील गुरुमुख सिंह यांच्यासह फाळणी झाल्यानंतर सिंह परिवार भारतात आला. लहानपणी त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. बालपणीच आईचं छत्र हरपलं, शिक्षण घेतांनाही असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले. रॉकेलच्या दिव्याच्या उजेडात अभ्यास केला. पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या जगातील सर्व नेत्यांपेक्षा डॉ.मनमोहन सिंग हे सर्वाधिक शिक्षीत पंतप्रधान होते. त्यांच्या मूळ गावी ज्या शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले, त्या शाळेचे नाव देखील डॉ.मनमोहन सिंग गर्व्हनमेंट बॉईज प्रायमरी स्कूल असे करण्यात आले. विशेष म्हणजे ही शाळा आता पाकिस्तानात आहे. त्यांचे शिक्षण चंडीगड सेंट जॉन्स कॉलेज येथे झाले, डॉ. सिंग यांनी 1948 साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून इंग्लंड मधील केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत विस्तारलेले आहे. 1957 साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली . त्यानंतर 1962 साली डॉ. सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील संपादन केली. त्यांचे ‘इंडियाज एक्स्पोर्ट ट्रेंड्स अन्ड प्रोस्पेक्ट्स फोर सेल्फ ससटेन्ड ग्रोथ’ हे पुस्तक भारताच्या अंतस्थ व्यापारी धोरणाची समीक्षा करणारे आहे.
पंजाब विद्यापीठ व प्रथितयश दिल्ली स्कूल ऑफ इकोनोमिक्स मध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना डॉ सिंग यांची शैक्षणिक ओळख अधिक समृद्ध झाली. या काळात युएनसीटीएडी सचिवालयात त्यांनी काही काळ काम पहिले होते. त्यातूनच त्यांची 1987 आणि 1990 या काळात जीनिव्हा येथील साउथ कमिशनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. डॉ. सिंग यांनी 1971 साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली व त्यांचा सरकारमध्ये प्रवेश झाला. त्यातूनच 1972 साली त्यांची अर्थमंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. डॉ. सिंग यांनी अर्थमंत्रालयात भूषविलेल्या अनेक महत्वाच्या पदांमध्ये अर्थ मंत्रालयाचे सचिवपद , नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, रिझर्व बँकेचे गव्हर्नरपद,पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद आदी पदांचा समावेश होतो.
स्वतंत्र भारतच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या 1991-1996 या पाच वर्षांच्या काळात डॉ. सिंग यांनी भारताचे अर्थ मंत्रिपद भूषविले. भारताच्या आर्थिक सुधारणा अमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वंकष धोरण तयार करण्यात सिंग यांची भूमिका जगभरात नावाजली जाते. हा काळ डॉ. सिंग यांच्या नावाशी घट्ट जोडला गेला आहे. त्यांच्या कारकीर्दीत त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अनेक महत्वाच्या पुरस्कारांपैकी भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार(1987), भारतीय विज्ञान कॉंग्रेस मध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जन्म शताब्दी सन्मान(1995), अर्थ मंत्र्यांसाठी दिला जाणारा आशिया मनी अवार्ड (1993 व 1994), केम्ब्रिज विद्यापीठाचा अॅडम स्मिथ पुरस्कार (1956), केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार असे काही विशेष पुरस्कार आहेत. याशिवाय जपान निहोन कायझाई शिम्बून सारख्या अनेक संस्थांनी डॉ. सिंग यांना सन्मानित केले आहे. केम्ब्रिज व ऑक्सफोर्ड सारख्या अनेक विद्यापीठांकडूनही डॉ सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे . डॉ. सिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी 1993 मध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथे मानवाधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले.
डॉ. सिंग यांनी 1991 पासून राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात खासदारपद भूषविले आहे 1998-2004 च्या दरम्यान त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्ष नेत्याची भूमिकाही पार पडली आहे. 22 मे 2004 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली व 22 मे 2009 रोजी त्यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
10 वर्षांच्या पंतप्रधानपदावरून डॉ.मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचे जगभरातून कौतुक झाले. मात्र अनेक निर्णयांबाबत त्यांच्यावर वेळोवेळी टीकाही झाली. आपल्या कार्याप्रती निष्ठावान असणाऱ्या मनमोहनसिंग यांनी ‘हजारो जबावों से अच्छी मेरी खामोशी, ना जाने कितने सवालों की आबरु रखी’ असे म्हणत अनेकदा आपल्या कामातूनच बोलणं पसंत केले. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आरुढ झाले. आपला कार्यकाळ संपल्यानंतर डॉ.मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठात शिकविण्यास सुरुवात केली.
त्यांच्या जीवनावर आधारित ‘द अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती, यात मनमोहनसिंग यांची भूमिका अष्टपैलू अभिनेते अनुपम खेर तर पत्नी गुरुशरण कौर यांची भूमिका दिव्या सेठ शाह यांनी केली होती. या चित्रपटातील इतर कलावंत रामअवतार भारद्वाज (अटलबिहारी वाजपेयी), अहाना कुमार (प्रियंका गांधी), अर्जुन माथूर (राहुल गांधी). या चित्रपटाचे कथानक हंसल मेहता यांनी लिहले आहे. हा चित्रपट २१ डिसेंबर २०१८ ला प्रदर्शित झाला. एप्रिल २०२४ साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली. प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे अखेरच्या काळात राजकारणापासून दूर होते. भारताच्या उदारीकरणाचे जनक म्हटले जाणारे अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचे दि. २६ डिसेंबर २०२४ वयाच्या ९२ वर्षी निधन झाले.



