चार्वाकाच्या प्रश्नांपासून तुकोबांच्या अभंगांपर्यंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या विचारविश्वाचा प्रवास

एखाद्या विद्वानाचा गौरव करताना आपण सहसा त्याच्या पदव्या, पुरस्कार, ग्रंथ आणि सन्मान यांची यादी मांडतो. पण काही व्यक्तिमत्त्वांकडे पाहताना ही यादी अपुरी ठरते. कारण त्यांचे खरे योगदान पुरस्कारांमध्ये नसून त्यांनी समाजासमोर उभे केलेल्या प्रश्नांमध्ये असते. डॉ. आ. ह. साळुंखे हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक. चार्वाकापासून गौतम बुद्धापर्यंत आणि पुढे संत तुकारामांपर्यंतचा त्यांचा वैचारिक प्रवास हा तीन व्यक्तिमत्त्वांच्या पलिकडचा अभ्यास आहे; तो भारतीय समाजाने विचार, श्रद्धा, परंपरा आणि माणूसपणाकडे कसे पाहावे, या मूलभूत प्रश्नांचा शोध आहे. त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक आणि वैचारिक योगदानाचा गौरव म्हणून एमजीएम विद्यापीठाने त्यांना मानद डी.लिट्. पदवी देण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या विचारविश्वाच्या मुळाशी गेलो, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की त्यांना रूढ उत्तरे स्वीकारण्यापेक्षा प्रश्न विचारण्यात अधिक रस आहे. चार्वाकाकडे पाहताना त्यांनी त्याचा केवळ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासातील एक अध्याय म्हणून विचार न करता त्याच्या चिकित्सक अभ्यासाला आपल्या संशोधनाचा विषय बनवले. त्यांच्या पीएच.डी.चा विषयच ‘चार्वाक दर्शनाचा चिकित्सक अभ्यास’ हा होता. चार्वाकाचा अभ्यास त्यांच्या दृष्टीने माणसाला स्वतःच्या बुद्धीचा वापर करण्याची जाणीव करून देणारा एक वैचारिक अनुभव होता. परंपरेने जे सांगितले आहे ते सत्यच असेल का? एखादी गोष्ट केवळ प्राचीन आहे म्हणून ती स्वीकारावी का? श्रद्धा आणि तर्क यांच्यातील नाते काय? अशा प्रश्नांशी झुंजताना त्यांनी चार्वाकाचा पुनर्विचार केला.
यातूनच पुढे आला त्यांचा ग्रंथ ‘आस्तिकशिरोमणी चार्वाक’. हे शीर्षकच वाचकाला थांबवते. ज्याला भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेत अनेकदा ‘नास्तिक’ म्हणून ओळखले गेले, त्याला ‘आस्तिकशिरोमणी’ म्हणण्यामागील वैचारिक धक्का हा केवळ शब्दांचा खेळ नसून रूढ चौकटींना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न आहे. डॉ. साळुंखे यांच्या चार्वाकविषयक लेखनाचा गाभा समजून घेतला, तर एक महत्त्वाची जाणीव होते की विचार म्हणजे केवळ एखादी भूमिका स्वीकारणे नव्हे; तर त्या भूमिकेचीही चिकित्सा करणे होय. पण प्रश्न विचारणे हा त्यांच्या विचारप्रवासाचा शेवट नाही. प्रश्न विचारल्यानंतर पुढचा प्रश्न उभा राहतो की या प्रश्नांमधून माणसाने काय शिकायचे? विवेकाला मानवी मूल्यांची जोड कशी द्यायची? आणि इथे त्यांच्या विचारविश्वात गौतम बुद्ध प्रवेश करतात.
‘सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध’ हा त्यांच्या लेखनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरतो. त्यांच्या उपलब्ध ग्रंथसूचीत या ग्रंथाबरोबरच बुद्धस्तोत्र, तथागत बुद्ध आणि संत तुकाराम, बुद्धांचे मंगलसुत्त आणि विवेकस्वातंत्र्याचा उद्घोष करणारे बुद्धांचे कालामसुत्त यांसारख्या ग्रंथांचीही नोंद आहे. बुद्धांचा अभ्यास करताना डॉ. साळुंखे केवळ बुद्धांच्या जीवनकथेचा मागोवा घेत नाहीत; ते बुद्धविचारातील विवेक, मानवी दुःख, करुणा, स्वातंत्र्य आणि नैतिकता यांचा शोध घेतात. त्यामुळे बुद्ध त्यांच्या लेखनात केवळ एका धर्माचे प्रवर्तक म्हणून नव्हे, तर मानवी अनुभवाला समजून घेण्याचा प्रयत्न करणारे विचारवंत म्हणून समोर येतात.
चार्वाकाच्या विचारभूमीतून एक प्रश्न उगवतो की आपण जे मानतो, ते का मानतो? परंपरेच्या सावलीत उभे राहूनही विवेकाचा दिवा विझू नये, अशी जाणीव तो देतो. बुद्धांच्या वाटेवर हा प्रश्न आणखी अंतर्मनात उतरतो. बाहेरच्या जगाला विचारलेला प्रश्न हळूहळू स्वतःच्या मनापर्यंत पोहोचतो आणि दुःख कुठून जन्मते, माणूस त्याच्या पाशातून मुक्त कसा होईल आणि करुणेने जगण्याचा मार्ग कोणता? हे प्रश्न आपण स्वतःला विचारतो. चार्वाक विचारांना जागे करतो; बुद्ध त्या जाग्या विचारांना माणुसकीची ऊब देतात. आणि मग हीच विचारांची ज्योत महाराष्ट्राच्या मातीवर येते. लोकभाषेच्या साधेपणात, अनुभवाच्या ओलाव्यात आणि अभंगांच्या शब्दांत ती तुकोबांच्या कंठातून बोलू लागते.
तुकाराम महाराजांकडे पाहण्याची डॉ. आ. ह. साळुंखे यांची दृष्टी त्यांच्या वैचारिक प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरते. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि केवळ भक्तीच्या चौकटीत बंदिस्त झालेल्या तुकोबांना त्या चौकटीबाहेर आणत, त्यांच्या शब्दांमधील चिकित्सक बुद्धी, विज्ञाननिष्ठ वृत्ती आणि समाजप्रबोधनाची ताकद त्यांनी अधोरेखित केली. ‘विद्रोही तुकाराम’ हा या दृष्टीचा महत्त्वपूर्ण आविष्कार आहे. तुकोबांच्या अभंगांमधून केवळ आध्यात्मिक अनुभूती नव्हे, तर आपल्या भोवतालच्या समाजजीवनाकडे डोळसपणे पाहणारा, दांभिकतेला प्रश्न विचारणारा आणि माणसाच्या जगण्यातील विसंगतींना भिडणारा विचार डॉ. साळुंखे यांनी समोर आणला. पुढे विद्रोही तुकाराम : समीक्षेची समीक्षा, तथागत बुद्ध आणि संत तुकाराम, संत तुकारामांचे अभंगशतक आणि न सरे ऐसे तुकोबांचे दान! या ग्रंथांतून हा अभ्यास अधिक विस्तारत गेला. त्यामुळे त्यांच्या लेखनातील तुकाराम हे केवळ भक्तीपरंपरेतील संत म्हणून न राहता विवेक जागवणारे, रूढींना छेद देणारे आणि माणसाला आपल्या जगण्याकडे नव्या नजरेने पाहायला लावणारे समाजप्रबोधक म्हणून समोर येतात.
आणि इथेच चार्वाक, बुद्ध आणि तुकाराम हे तीन वेगळे अध्याय न राहता एका मोठ्या विचारप्रवासातील तीन महत्त्वाचे टप्पे बनतात. चार्वाक विवेकाचा प्रश्न उभा करतो, बुद्ध त्या विवेकाला करुणेची दिशा देतात आणि तुकाराम तोच विचार लोकभाषेत, अनुभवाच्या आणि जगण्याच्या भाषेत व्यक्त करतात. तर्क, करुणा आणि माणूसपण यांना एका वैचारिक चौकटीत समजून घेण्याचा हा प्रयत्न डॉ. साळुंखे यांच्या लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरते.
कदाचित म्हणूनच त्यांच्या लेखनात ‘परंपरा’ हा शब्द आला की त्याच्यासोबत ‘चिकित्सा’ही येते आणि ‘श्रद्धा’ आली की तिच्यासोबत ‘विवेक’ही उभा राहतो. त्यांनी परंपरेला नाकारण्यासाठी तिचा अभ्यास केला नाही; उलट तिच्या अनेक थरांमध्ये दडलेले आवाज शोधण्यासाठी तिच्याकडे पुन्हा पाहिले. त्यांच्या ग्रंथसूचीत हिंदू संस्कृती आणि स्त्री, महाभारतातील स्त्रिया, महात्मा फुले आणि धर्म, वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी, एकलव्य, शंबूक आणि झलकारीबाई, महात्मा फुले आणि शिक्षण, शिवराय : संस्कार आणि शिक्षण यांसारख्या अनेक पुस्तकांचा समावेश आहे. या विविध विषयांकडे पाहिले, तर त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी सतत एक मोठा प्रश्न दिसतो—इतिहास, धर्म, परंपरा आणि समाज यांचा विचार करताना माणूस कुठे उभा आहे?
हीच बाब त्यांच्या विद्वत्तेला केवळ ग्रंथालयीन विद्वत्ता राहू देत नाही. त्यांनी ३२ वर्षे अध्यापन केले. शिवाजी विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, कला शाखेचे अधिष्ठाता, अभ्यास मंडळांवरील सदस्य व अध्यक्ष म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आणि बालभारतीच्या इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवीच्या इतिहासाच्या पुस्तकांच्या संपादकीय समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी योगदान दिले. त्यांचा विचार केवळ पुस्तकांच्या पानांवर न राहता वर्गखोलीत गेला, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला, पाठ्यपुस्तकांमध्ये उतरला आणि सार्वजनिक चर्चेचा भाग झाला.
त्यांच्या ६५ प्रकाशित पुस्तकांची यादी पाहिली, तरी हा प्रवास किती व्यापक आहे याची जाणीव होते. पण या संख्येपेक्षा महत्त्वाचे आहे ते या ग्रंथांमधून सतत बदलत जाणारे प्रश्न आणि त्यांना भिडण्याची त्यांची तयारी. कधी चार्वाकाच्या माध्यमातून, कधी बुद्धांच्या माध्यमातून, कधी तुकोबांच्या अभंगातून, तर कधी फुले, शाहू, आंबेडकर, स्त्रिया किंवा बहुजनांच्या इतिहासातून त्यांनी समाजासमोर एक वैचारिक आरसा ठेवण्याचा प्रयत्न केला.
म्हणूनच एमजीएम विद्यापीठाकडून दिला जाणारा शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच सन्मान मानद डी.लिट्. हा त्यांच्या अनेक दशकांच्या अध्ययन, संशोधन, लेखन आणि सार्वजनिक वैचारिक सहभागाचा गौरव आहे. हा त्या शिक्षकाचा सन्मान आहे, ज्याने वर्गखोलीच्या पलीकडे जाऊन समाजाशी संवाद साधला; त्या संशोधकाचा सन्मान आहे, ज्याने रूढ चौकटींमध्ये न अडकता प्रश्न विचारले; आणि त्या लेखकाचा सन्मान आहे, ज्याने कठीण वैचारिक विषय सामान्य वाचकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हा महाराष्ट्राच्या प्रबोधनपरंपरेतील एका प्रदीर्घ वैचारिक प्रवासाची नोंद आहे.
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या कार्याकडे मागे वळून पाहताना एक सुंदर वैचारिक वर्तुळ पूर्ण होताना दिसते. चार्वाकाकडून त्यांनी प्रश्नांची शिस्त घेतली; बुद्धांकडून माणूस आणि विवेक यांचा संबंध शोधला; आणि तुकारामांकडून तो विचार लोकांच्या जगण्याच्या भाषेत ऐकला. या तिन्ही प्रवाहांना जोडणारा केंद्रबिंदू आहे—स्वतंत्र विचार करणारा माणूस.
कदाचित त्यांच्या संपूर्ण लेखनाचा अर्थ एका वाक्यात सांगायचा झाला, तर तो असा असेल की, परंपरेचा स्वीकार करण्यापूर्वी तिची चिकित्सा करा, श्रद्धेला विवेकाची साथ द्या आणि कोणत्याही विचाराच्या केंद्रस्थानी माणसाला विसरू नका. म्हणूनच या सन्मानाकडे पाहताना आपल्यालाही एक प्रश्न स्वतःला विचारावा लागेल की आपण त्यांच्या पुस्तकांमधून किती उत्तरे घेतली? आणि त्यांनी आपल्याला किती प्रश्न विचारायला शिकवले?
एमजीएम विद्यापीठाची मानद डी.लिट्. ही डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या प्रश्न विचारण्याच्या, तपासण्याच्या, समजून घेण्याच्या आणि शेवटी माणसाला माणूस म्हणून पाहण्याच्या वैचारिक वारशाला दिलेली आदरांजली आहे.
एका निर्भय विचारयात्रेला आणि एका अखंड जाग्या विवेकाला कृतज्ञतापूर्वक सलाम!
– आशुतोष पाटील.
विशेष कार्यकारी अधिकारी,
मा. कुलपती,
एमजीएम विद्यापीठ,
छत्रपती संभाजीनगर



