सांस्कृतिक

सोलापुरातील गणेशोत्सव

 

सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा खरंच सोलापूरला प्रथम सुरू झाली. 1881 साली त्यानंतर लोकमान्य टिळक येथे येऊन गेले त्यांना ती संकल्पना खूपच आवडली समाजाशी वार्तालाप करता येण्यासाठी किंवा समाजाचे प्रबोधन करण्यासाठी एक उत्तम संधी आहे हे त्यांनी जाणले आणि त्यांनी त्यांनी पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सोलापूरच्या आजोबा गणपतीचे छायाचित्र असलेले तिकीट परवाच पोस्टाने प्रसारित केले ही सोलापूरसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

सोलापूर मध्ये बाल गणेश उत्सव मंडळ खूप होती लहान मुले एकत्र येऊन छोटा गणपती बसवायचे, चौका चौकात मोठाली मंडळी पण होती त्या त्या भागातल्या लोकांकडून वर्गणी जमा करून गणपती बसवले जायचे ही संख्या त्या काळात मर्यादित होती.

आज ही संख्या खूपच वाढली आहे. रस्त्यावरच्या गर्दीत तुम्ही चालू शकत नाही इतकी तुफान गर्दी आहे अर्ध्याहून अधिक रस्ते व्यापले गेलेले आहेत.

पूर्वी गणपतीपुढे मेळे होत असत. नृत्य छोटी नाटुकले बसवली जात असत पेटी आणि तबला या वाद्यांचा उपयोग करूनच सगळी गाणी बसवली जात. छोट्या छोट्या मुलांचा सहभाग असे छोटी नाटके तर मनाला भिडतील इतकी हृदयस्पर्शी असायची त्यांचे विषयही संस्कारक्षम असत.
गाण्यांना सुंदर चाली असत
संगीतातील जाणकार मंडळी या गीताना चाली आणि म्युझिक देत असत. त्यामध्ये दत्तू सिंग गहेरवार सरांचा उल्लेख करावाच लागेल. अप्रतिम चाली देत असत त्याशिवाय चांद मास्तर नावाचे पेटी वादक होते ते अप्रतिम पेटी वाजवीत असत. पेटीवर त्यांची बोटे इतकी लिलया फिरत कि ऐकणारा मंत्रमुग्ध होत असे. लोक अचंबित होत असत. त्यावेळी प्रसिद्ध असलेली नागिन धून ते फार सुंदर वाजवायचे या मेळ्यातील कलावंतामधूनच पूर्वीची आघाडीची नायिका शशिकला जवळकर हिने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. नृत्य आणिअभिनय सारंच खूप देखणे होते.

त्याशिवाय त्या काळात उत्तम वक्त्यांची भाषणे होत असत पुढे पुढे तर गणपती म्हणजे विचारवंतांची बौद्धिक मेजवानीच होती उद्योग बँक जनता बँक यांनी या व्याख्यानमाला पुढे सातत्याने चालू ठेवल्या होत्या आणि अनेक नामवंत विचारवंतानी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. जागा पकडण्याकरता लोक आधीच जात असत. इतकी व्याख्यानाला गर्दी असे.

सोलापुरात दोन कार्यक्रम हमखास गणपती उत्सवात असायचे ते म्हणजे नकलाकार पत्कींच्या नकला आणि फाटे पार्टी!
नकलाकार पत्की यांच्या कार्यक्रमाला लोक प्रचंड गर्दी करत असत एका चौकातून कार्यक्रम संपला कि ती मंडळी पुढच्या चौकात हजेरी लावत. बसायला आपल्या घरातूनच तरट घेऊन यायचे किंवा पोते घेऊन यायचे हे सर्व कार्यक्रम रस्त्यावरती स्टेज घालून होत. टाळ्याचा कडकडाट आणि बक्षिसाची खैरात असे बक्षीस फक्त एक रुपयाचे असे कार्यक्रम आवडला की मंडळाचे अध्यक्ष बक्षीस जाहीर करीत हे सातत्याने चालत होते. कार्यक्रम रंगून जायचा प्रेक्षक कसा दर्दी असावा याचे ते उदाहरण असे़ प्रहसनात्मक नकला चालू परिस्थितीवर भाष्य करणारी प्रबोधनात्मक प्रहसने असत शिवाय काही विनोदी नकला होत. सोलापुरातील प्रसिद्ध व्यक्तींचे आवाजही काढले जात. मला आठवते डॉक्टर वैशंपायन यांचा आवाज हुबेहूब काढत असत की डॉक्टर स्वतः सुद्धा चकित व्हायचे पॅरालिसिस झालेल्या माणसाची नक्कल हे काही खास आकर्षण होते.
फाटेंचे कार्यक्रमही फार सुंदर असत. ते स्वतः लिखाण करीत प्राध्यापक अजिज नदाफ हे उत्तम आणि पहाडी आवाजाचे लेखक त्यांच्या ग्रुपमध्ये होते मंदा आणि बाली दोन तरुणी त्यांच्या वगनाट्य मध्ये काम करीत.
फाटे स्वतः शेका पक्षाचे असल्यामुळे त्या दृष्टीने प्रबोधनात्मक अशी वगनाट्याची मांडणी असे सध्य परिस्थितीवर भाष्य करणारे लिखाण असायचे त्यांचेही कार्यक्रम जागोजागी होत असत.
तसेच काही जादूगारांचे कार्यक्रम छोट्या मोठ्या कलावंतांचे कार्यक्रम सुंदरी वादनाचे कार्यक्रम अशा कार्यक्रमाची रेलचेल असे

याशिवाय गणेश हॉल येथे रेल्वे चा गणपती प्रसिद्ध होता तेथील कार्यक्रम खूपच सुंदर असं उत्तम नाटकाचे सादरीकरण तेथे होत असे, त्यामुळे नाटके पाहण्यासाठी लोक धडपडून तेथे जात असत महानगरपालिकेतर्फे सुद्धा गणपती उत्सव होत असे उत्तम गाणाऱ्या कलावंतांची हाजरी लागलेली असायची त्यामध्ये आदरणीय सुलोचनाबाई चव्हाण यांचा लावण्याचा कार्यक्रम बहारदार व्हायचा.बाई कितीही ठसक्याची लावणी म्हणू दे नजर कधी वर उचलली जात नव्हती इतक्या शालिनीतेने दोन्ही खांद्यावर पदर घेऊन त्या लावणी सादर करीत आणि त्याच रीतीने समोरचा प्रेक्षकही त्याचा आस्वाद घेत. उत्तम उत्तम गायकांचे त्या ठिकाणी कार्यक्रम होत असत.

गल्लीतल्या मुलांचे वाड्याचाळीतले लोकांचे छोटे छोटे कार्यक्रम सादर केले जात. लेझीम हा सोलापुरातला एक आणखीन एक खेळ प्रकार गणपती मिरवणुकीच्या वेळेला लेझीमचा चा ताफा निघत असे लहान मुले मोठी तरुण मुले मोठी माणसे यात सहभागी होऊन महिनाभर आधी तयारी करीत असत आणि लेझीम चे विविध हात आजही उत्तम पद्धतीने सादर होतात हे सोलापूरचे वैशिष्ट्य आहे.

तसेच S.T महामंडळाचा कार्यक्रम चा गणपती सुद्धा जोरात असे. तेथील मंडळी खूप उत्साही होती राजा सलगर सायखेडकर ही दिग्गजाची नावे त्यांच्याकडे होती…. त्यातील सायखेडकर हे उत्तम दिग्दर्शक नट होते.. स्त्रीपात्राची वाणवा असे पुणे मुंबई वरून अभिनेत्रींना बोलवले जाई पण त्यांनीही प्रेमा तुझा रंग कसा वाहतो ही दुर्वांची जुडी यासारखी उत्तम नाटके सादर केली.

शाहीर परदेशी. शाहीर बाबासाहेब देशमुख ही शाहीर मंडळी वीर रसाने भरलेले पोवाडे सादर करीत तसेच दारूबंदी… शाळेत जा…कर्ज काढू नका.. सावकारी पाश चांगला नाही असा संदेश देणारे पोवाड्यात एक माझ्या अजून लक्षात आहे… “शिकला नाही शाळा तो अडाणी रे गोळा” हा पोवाडा त्यांचा खूप गाजला होता. हे सारं बाळबोध पद्धतीने गोंगाटा शिवाय आनंददायी पर्यावरणपूर्वक गणपती उत्सव चालू होता पण…काळ बदलत चालला आणि एके वर्षी…….
कार्यक्रमांमध्ये एक झंझावात सुरू झाला तो म्हणजे बत्तूल डान्सिंग पार्टी….. या कार्यक्रमाने लोकांना इतके आकर्षित करून घेतले कि अन्य कलावंतांना मोठे कार्यक्रम मिळत नसत….बत्तूल डान्सिंग पार्टी…. म्हणजे रेकॉर्डवर सिनेमातील नट नट्यांसारखा तसाच मेकअप केलेला मुलगा किंवा मुलगी सफाईदार नृत्य करीत उदाहरणार्थ जिस देश मे गंगा बहती है या चित्रपटातील मेरा नाम राजू… हे गीत तो मुलगा राज कपूर सारखा पेहराव काठीला कंदील एक गाठोडे हातात डफ हे घेऊन नृत्य करीत असे या चित्रपटातील दृश्य नृत्य यानी प्रेक्षकांना वेड लावले आणि त्यानंतर मात्र सिनेमातली गाणी म्हणणे. म्हणजे थोडक्यात आरकेस्ट्रा, श्री राम प्रसाद दुबे आणि शितल यांनी सोलापूरकरांना ऑर्केस्ट्राची ओळख करून दिली नवनवीन वाद्य लोकांना याच्या माध्यमातून ऐकायला मिळाली आर्केस्ट्रा मध्ये मिमिक्री असे तोही प्रकार फार पॉप्युलर झाला ऑर्केस्ट्रा मधील काही उत्तम गायक होते काही उत्तम सूत्रसंचालक होते ते अमिन सायानी यांची नक्कल करीत अशोक सुरतगावकर हा सर्वोत्तम मिमिक्री आर्टिस्ट संपूर्ण महाराष्ट्राला त्यातून मिळाला. सतीश वैद्य गिरीश पंचवाडकर संतोष कुलकर्णी असे अनेक दर्जेदार गायक कलावंत सोलापूरला लाभले ज्यांना चांगला शास्त्रीय बेस होता.
हळूहळू काळ बदलल्याचे लक्षात आले . लोकांना वेगळे काही हवे होते प्रेक्षक आता शिट्टी वाजवू लागले,पैसे फेकायला लागले आणि काही काही ठिकाणी कार्यक्रमाचा दर्जा हळूहळू वेगळाच नजरेस येऊ लागला बदलाची सुरुवात झाली. हे गतिमान झालेले चक्र कोणीही थांबवू शकत नव्हते… गणपतीचे साधेपण संपायला इथेच सुरुवात झाली…..!

पूर्वी गणपतीपुढे देखाव्याचे बोर्ड लावलेले असत व त्याच्यापुढे गणपती असायचा त्यामध्ये माणसाच्या मृत्यूनंतर….. मग स्वर्गातील उत्तम चित्र काढलेली पोस्टर एका बाजूला लागली जात तर दुसऱ्या बाजूला वाईट कर्म केल्यास नरकात जावे लागेल. त्यासाठी खिळ्यावर झोपवले तेलात टाकले पट्ट्याने मारले यासारखे दृश्य साकार करीत लोक ते पाहायला ही गर्दी करत सिद्धेश्वर कथेचे सारं सांगणारे पोस्टर असे
त्यानंतर विविध देखावे सादर करण्याची पद्धती सुरू झाली कैलास पर्वत,विविध देवस्थान मधील गणपती, वैष्णव देवी, हिमालयातील दृश्य, तिरुपती बालाजी मंदिर, असे देखावे सुरू झाले त्यानंतर काही चलत देखावे सुरू झाले त्यांच्यातील मोटारीच्या मदतीने हालचाल करणारे देखावे लोकांना आवडू लागले त्यामध्ये रावणाने सीतेला हरण केल्याचा देखावा. भक्त प्रल्हादाचा देखावा त्याला कड्यावरून फेकल्यानंतर पुन्हा तो जिवंत झाल्याचा देखावा असे देखावे पाहण्यासाठी लोक गर्दी करू लागले. मला आठवतंय लकी चौकात असलेल्या गणेशा समोर जिवंत माणसे पात्र म्हणून उभे करून देखावा तयार केला होता एक छोटे नाट्यच सादर करीत डायलॉग सगळे माईकवर असत. त्यांनीही लोकांच्या मनाची पकड घेतली यातील सीता झालेली पुरुष पार्टी मधून मधून स्टेज च्या मागे बिडीचा झुरका घेत असे हे खूप मजेदार असायचे किंबहुना स्टेज मागचे दृश्य.. नवख्या कलावंतांची धडपड खूप छान असे . याशिवाय लाईट आणि म्युझिक हा प्रकार खूप गाजला दिव्यांचा झगमगाट आणि म्युझिक वर होणारी त्यांची उघडझाप डोळे दिपवून टाकत असे. अशा देखाव्यांचे प्रदर्शन शेवटच्या दोन-चार दिवसात होत असे आणि लोक गणपती बघायला बाहेर पडत. इथंपावेतो गणपती साधाच होता आपण बुद्धीची देवता म्हणून त्याचे पूजन करतोयाची साक्ष देणार होता सामाजिकतेचे भान ठेवणारा होता.

काळ बदलला, डॉल्बीचा सुरू झाला . अश्लील हावभाव करणारी नृत्य सुरू झाली. विकृत नाचणे सुरू झाले. गणपतीच्या स्टेज मागे जुगार सुरू झाले मंडळाचे कार्यकर्ते या गोंडस नावाखाली गुंडांच्या हाती गणपती गेले अर्थात हे विधान सरसकट नाही सोलापुरात कित्येक मंडळी अतिशय चांगले उपक्रम राबवित आहेत यामध्ये ज्येष्ठांची तपासणी, डोळ्यांची ऑपरेशन्स वह्या यांचे वाटप अशा अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा घडत आहेत खरंतर सोलापूरकर फार विवेकी आहेत त्यांना एका चांगल्या नेत्याची गरज आहे पुढाऱ्याची नव्हे स्थानिक कार्यकर्ते आणि पुढारी यांच्या हाती गणपतीची सूत्रे गेली.
पण सुदैवानं सोलापूरची जनता डॉल्बी बंद करण्यामध्ये समंजस ठरली हे मात्र कौतुकास्पद आहे
गणेश विद्येची देवता आहे याची जाणीव लोकांना, कार्यकर्त्यांना पुढार्‍यांना होईल… हे चक्र पालटेल… गणपतीलाही बरे दिवस येतील याची खात्रीच आहे. आणि बाप्पा तसेच घडू दे गणपती बाप्पा मोरया.

शीला पतकी सोलापूर 8805850279

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button