माढा (प्रतिनिधी) भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ नागपूर येथे संविधानाची प्रत हातात घेवून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर नागपूर पोलिसांनी केलेल्या कथित अमानुष व, निषेधार्ह कारवाईचा सोलापूर जिल्हा ग्रामीण (पश्चिम) युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शाहुराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली माढा येथे तीव्र निषेध व्यक्त केला गेला.
संविधानाच्या मूल्यांचे रक्षण आणि, लोकशाही अधिकारांसाठी आंदोलन करणाऱ्या युवकांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न महाराष्ट्रातील नागरिक सहन करणार नाहीत. लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर बळाचा वापर करणे ही गंभीर बाब असून सदर घटनेची निष्पक्ष व, उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात इथे आली आहे.
शिवराज मोरे यांच्यावर कारवाई करताना संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन केले असल्यास त्यांची जबाबदारी निश्चित करून दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कायदेशीर व, प्रशासकीय कारवाई करावी अशीही मागणी सोलापूर ग्रामीण (पश्चिम) जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
संविधानाचा सन्मान आणि, लोकशाहीचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. संविधानिक अधिकारांसाठी आवाज उठविणाऱ्या युवकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे सदर संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी काँग्रेस नेते जहीर मणेर, सोशल मीडिया राज्य समन्वयक सचिन खैरे-पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव समाधान लटके, जमीर सय्यद, नितीन शिंदे, परवेझ पठाण, संदीप मोरे, बालाजी मुजमुले, सुर्यकांत लोंढे यांच्यासह युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित राहिले होते.





