जम्मू येथे देशसेवा बजावताना मंगळवेढ्याच्या जवानाला वीरमरण; वैभव आवताडे यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान
मंगळवेढा – सोलापूर : –
देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथील जवान वैभव तात्यासाहेब आवताडे (वय ३१) यांना वीरमरण आले. भारतीय लष्कराच्या मराठा सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या या जवानाच्या निधनाची अधिकृत माहिती शुक्रवारी दुपारी कुटुंबीयांना देण्यात आली. या दुःखद बातमीने गणेशवाडीसह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून संघर्ष करत वैभव आवताडे यांनी सुमारे ११ वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात प्रवेश केला होता. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपल्या कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. जम्मू येथील आव्हानात्मक परिस्थितीत सेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले.
वैभव हे काही दिवसांपूर्वीच सुट्टी संपवून पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते. १३ ऑगस्टच्या रात्री सुमारे ११ वाजता त्यांनी पत्नी आणि आई-वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. कुटुंबीयांची आपुलकीने विचारपूस करणारा हा संवाद त्यांचा शेवटचा ठरेल, याची कल्पना त्यावेळी कोणालाही नव्हती.
वैभव आवताडे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, भाऊ, पत्नी दिपाली आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. अवघ्या सहा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना ३ वर्षांची मुलगी देवांशी आणि १ वर्षाचा मुलगा देवांश आहेत. त्यांच्या निधनामुळे या दोन्ही चिमुकल्यांच्या डोक्यावरील पितृछत्र कायमचे हरपले आहे.
अंत्यसंस्काराची तयारी -मिळालेल्या माहितीनुसार, वीर जवान वैभव आवताडे यांचे पार्थिव विशेष विमानाने पुणे येथे आणण्यात येणार असून, त्यानंतर लष्करी वाहनातून त्यांच्या मूळ गावी गणेशवाडी येथे नेण्यात येईल. गावात शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा काढल्यानंतर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.



