सोलापूर
पावसाने पाठ फिरवली, पिके करपली; सोलापूर जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या — खासदार प्रणिती शिंदे

खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडीसह विविध गावांमध्ये शेतांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडीसह विविध गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि व्यथा जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापूर जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनच्या सुरुवातीला झालेल्या काही पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र, पीक वाढीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील उभी पिके करपून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी, तूर, कांदा तसेच ऊस यांसारख्या पिकांवर पावसाअभावी मोठे संकट ओढवले आहे. विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत चिंताजनक असून, अनेक शेतांमध्ये वाळलेली ताटे आणि करपलेली रोपे उभी असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. पिकांवर केलेला पेरणीचा खर्चही निघण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पेरणीचा खर्चही निघण्याची शक्यता नाही. लेकरांचं शिक्षण कसं करायचं आणि कुटुंब कसं चालवायचं, या प्रश्नाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आज होरपळून निघत आहे अशी व्यथा खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.
अनेक शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन पेरण्या केल्या आहेत. आता उत्पादनच हातातून गेल्यास त्यांच्यावर पुन्हा कर्जाचा डोंगर उभा राहण्याची भीती आहे. त्यामुळे ही केवळ पिकांची हानी नसून शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीसोबतच त्यांच्या कुटुंबाच्या भवितव्यावर आलेले गंभीर संकट आहे, असे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा. केवळ घोषणा न करता युद्धपातळीवर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट आणि भरीव आर्थिक मदत द्यावी. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.
यावेळी दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भीमाशंकर जमादार, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पाटील, सुदीप लांडे, किरण कापसे, प्रशांत येले, संतोष गायकवाड, नागनाथ गायकवाड, रविकिरण मेहता, सुधीर पाटोळे, नागनाथ भडंगे, नागू गायकवाड यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



