सामाजिक

कविवर्य नारायण सुर्वे स्मृतीदिन

“ऎसा गा मी ब्रह्म । विश्वासाचा आधार
खोलीस लाचार । हक्काचिया ॥”
ह्या ओळी लिहिणारे मराठीतील एक लोकप्रिय कवी कविवर्य नारायण सुर्वे यांचे आज पुण्यस्मरण.
नारायण सुर्वे यांचे संपूर्ण नाव नारायण गंगाराम सुर्वे. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर इ.स. १९२६ मध्ये झाला. त्यांचे संपूर्ण आयुष्य मुंबईच्या कामगार वस्तीत गेले. मुंबईच्या एका कापड गिरणीत साधा कामगार म्हणून त्यांनी काम केले. आपल्या मुंबई या कवितेत ते म्हणतात-
“कळू लागले तेव्हापासून डबा घेऊन साच्यावर गेलो,
घडवतो लोहार हातोडयाला तसाच घडवत गेलो.”
जन्म झाल्यावर जन्मदात्रीने त्यावेळी नवजात अर्भक असलेल्या आपल्या
पोटच्या गोळ्यास सोडून दिले व तेच बालक म्हणजे गिरणी कामगार गंगाराम सुर्वे ह्यांनी त्यांच्या जन्मापासून त्यांचा सांभाळ केला म्हणून नारायण गंगाराम सुर्वे असे नाव त्यांनी लावले. सुर्वे ह्यांचे बालपण अत्यंत प्रतिकूल अवस्थेत गेले. हॉटेलमध्ये पोऱ्या, कापड गिरणीत बिगारी, अक्षरओळख झाल्यानंतर प्राथमिक शाळेत शिपाई अशा नोकऱ्या त्यांनी केल्या. इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण ते घेऊ शकले. पुढे प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून त्यांना नोकरी मिळाली. त्यांचे वाचन चौफेर आणि चौकस होते. हिंदी आणि उर्दू ह्या भाषा त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत करुन घेतल्या होत्या. कृष्णा साळुंके यांच्याशी १९४८ मध्ये त्यांनी विवाह केला.
विपन्नावस्था आणि दारिद्र्याचे चटके ह्यांमुळे सखोल अनुभवसंपन्न असे लेखन त्यांच्याकडून सहजस्फूर्तीने घडले. ऐसा गा मी ब्रह्‌म (१९६२) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर माझे विद्यापीठ (१९६६), जाहीरनामा (१९७५) आणि नव्या माणसाचे आगमन (१९९५) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. सनद (१९८२) आणि निवडक नारायण सुर्वे (१९९४) ह्या त्यांच्या निवडक कवितांचे संपादित संग्रह. उर्दू साहित्यिक कृष्ण चंदर ह्यांच्या उर्दू कथांचा सुर्वे ह्यांनी केलेला अनुवाद तीन गुंड आणि सात कथा (१९६६) ह्या नावाने प्रसिद्घ झाला. दादर पुलाकडील मुले (१९७५) ही त्यांची अनुवादित कादंबरी. त्यांच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद ऑन द पेव्ह्‌मेंट्‌स ऑफ लाइफ (१९७३) ह्या शीर्षकाने प्रसिद्घ झाला आहे.
श्रमिकांच्या दैनंदिन आयुष्याची व श्रमशक्तीच्या चढउतारांची स्पंदने सुर्वे ह्यांच्या कवितेत अनोख्या ढंगाने प्रकट होतात. माणूस आणि मेहनत ह्यांचे अतुट नाते, हा त्यांच्या कवितेचा कणा आहे. कवीची आत्मनिष्ठा त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येते. संवादमय शैली हा त्यांच्या कवितेचा एक लक्षणीय विशेष. रोजच्या भाकरीसाठी तसेच आपले हक्क आणि अस्तित्व ह्यांसाठी झगडणारा माणूस सुर्वे ह्यांच्या कवितेतील अनुभवसृष्टीच्या केंद्रस्थानी आहे. विचारांची वीज मनात वागवीत तो वावरतो आहे. लॉस अँजेल्सचा निग्रो, आफ्रिकन चाचा, टांगेवाला, शीग कबाबवाला, याकूब नालबंदवाला, संपकरी, जथ्यात वावरणारा, पोस्टर्स चिकटवणारा हमाल, शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया ह्यांच्यासंबंधीचे तपशील त्यांच्या कवितेत विलक्षण चैतन्यमयतेने येतात. ह्या साऱ्यांच्या आयुष्याशी कवी म्हणून असलेले त्यांचे जिवंत नाते त्यांतून प्रकट होते. मराठी काव्यविश्वाला त्यांनी हे नवेच परिमाण दिले आहे.
ज्ञान, मान आणि सुख ह्यांना दुरावलेल्या असंख्य सामान्यांचे प्रतिनिधित्व त्यांची कविता करते. पोलिसांच्या दंडुक्यांनी उठवेपर्यंत फूटपाथ-खाचरांत संसार चालवणारे व कारखान्याची आणि स्मशानाची ह्या दोन वाटांच्याच कात्रीत जगणारे श्रमिक रंगवीत असताना सुर्व्यांच्या कवितेची भाषा अभिव्यक्तीची स्वतंत्र पद्घती निर्मिण्यात यशस्वी झालेली आहे. परिचयाचे शब्द त्यांच्या कवितेत नवतेच्या रंगाने उजळून निघतात. ‘कढ आलेल्या भातासारख्या व्यथा’, ‘चुलाण्यात फटफटावे लाकूड तसा आत्मा’ ही ह्याचीच उदाहरणे होत. ही माणसे प्रतिकूलतेत वावरणारी असली, तरी आशावादी आहेत. समूहशक्तींचा, झेंड्यांच्या झुलणाऱ्या सागराचा, लुमुंबा-मार्क्स ह्यांचा त्यांना जिव्हाळा आणि दिलासा वाटतो; पण त्यामुळेच काही टीकाकारांना त्यांची कविता प्रचारकी आणि बटबटीतही वाटते. बाजूने आणि विरोधात लिहिणारे खूप टीकाकार सुर्वे ह्यांना भेटलेले आहेत, परंतु त्यांची कविता विद्यापीठीय अभ्यासासाठीही स्वीकृत केली गेली, हे त्यांच्या कवितेचे महत्त्व सिद्घ करणारे एक गमक होय. गुजराती, हिंदी तसेच जगातील अनेक भाषांत त्यांच्या कवितेची भाषांतरे झालेली आहेत; मर्ढेकरांनंतर मराठी कवितेने गाठलेला एक महत्त्वाचा टप्पा म्हणून त्यांच्या कवितेकडे पाहता येते.
महाराष्ट्र शासनाचे दोन प्रथम पुरस्कार त्यांच्या कवितेला मिळाले. (ऐसा गा मी ब्रह्‌म; माझे विद्यापीठ ). नेहरु पारितोषिकाचेही ते दोनदा मानकरी ठरले. परदेश प्रवास करण्याचा योगही त्यांना आला. अमेरिकेतील ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ चा पुरस्कारही त्यांना देण्यात आलेला आहे. नारायण गंगाराम सुर्वे ह्या त्यांच्यावर निघालेल्या माहितीपटाला राष्ट्रीय पातळीवरचा प्रथम पुरस्कार मिळाला. सनद साठी भारत सरकारचा साहित्य पुरस्कार; ‘पद्श्री पुरस्कार’ (१९९८); मध्य प्रदेश सरकारचा ‘कबीर पुरस्कार’ (१९९९); कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान पुरस्कार’ हे त्यांना मिळालेले आणखी काही महत्त्वपूर्ण पुरस्कार. १९७३ व १९७६ साली सोव्हिएट युनियनचा तसेच १९८५ साली मॉरिशसचा प्रवास त्यांना घडला.
दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले (१९८९). परभणी येथे झालेल्या १९९५ च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले. उत्तुंग, अलौकिक प्रतिभेच्या या सूर्यनारायणाचा 16 ऑगस्ट 2010 ला अस्त झाला. पण त्यांच्या कवितेची विभा आजही वंचितांच्या वेदना प्रकाशमान करताना दिसते.(साभार आतरजाला वरुन)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button