सामाजिक

अक्कलकोटमध्ये अत्याधुनिक क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीचे उद्या उद्घाटन

अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३९ वर्षांपासून विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमध्ये आता क्रीडा क्षेत्राचीही भर पडत असून, गुरुपौर्णिमेच्या औचित्याने अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीचे उद्घाटन बुधवारी (दि. २९ जुलै) दुपारी १२.३० वाजता होणार आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळालगत असलेल्या एस.टी. बस वाहनतळाच्या जागेत उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक क्रिकेट अकॅडमीचा उद्घाटन सोहळा केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार शेखर निकम, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, सीए महेश गावस्कर, जनार्दन (अण्णा) गणपत थोरात यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले राहणार असून, माजी भारतीय क्रिकेटपटू व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक चंद्रकांत पंडित, माजी भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक समीर दिघे, रणजी ट्रॉफी व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे निवडकर्ता संजय पाटील, सिंग्स स्पोर्ट्सचे धर्मराज गोपाल सिंग, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. नितीन हबीब, ॲड. संतोष खोबरे, चार्टर्ड अकाउंटंट ओंकारेश्वर उटगे, आर्किटेक्ट योगेश अहंकारी, अरविंद शिंदे, बालाजी सलगर, किरण पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील महिला व पुरुष क्रिकेटपटूंना आधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही अकॅडमी उभारण्यात आली आहे. येथे अत्याधुनिक टर्फ विकेट, चेंजिंग रूम, कॅफे, ओपन जिमसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, खेळाडूंना माफक दरात टर्फचा लाभ घेता येणार आहे.
या अकॅडमीच्या उभारणीत सोलापूर क्रिकेट असोसिएशनचे सुनील मालप, चंद्रकांत रेम्बोर्सो, किशोर बोरामणी, उदय डोके, राजेंद्र गोटे, संतोष बडवे आणि अभिजित गुंड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तर अत्याधुनिक टर्फची उभारणी सिंग्स स्पोर्ट्स, मुंबईचे धर्मराज सिंग यांनी केली आहे.
     या उपक्रमामुळे अक्कलकोट तालुक्यातील होतकरू क्रिकेटपटूंना दर्जेदार प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध होऊन ग्रामीण भागातील क्रीडा विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button