शैक्षणिक

यशाची परंपरा कायम! इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे दोन विद्यार्थी पात्र

 

करमाळा ( प्रतिनिधी ) पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव या शाळेने शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत स्पर्धा परीक्षांमध्ये आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता सातवी) परीक्षेत शाळेचे अभिजीत पप्पू बरडे व शिवश्री संतोष जाधव हे दोन्ही विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण करून त्यांना दर्जेदार मार्गदर्शन देण्याचा शाळेचा सातत्यपूर्ण प्रयत्न या यशामागे आहे. विद्यार्थ्यांचा नियमित सराव, शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि पालकांचे मोलाचे सहकार्य यामुळे हे यश संपादन करता आले.

यापूर्वीही शाळेने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत ११ पैकी ९ विद्यार्थी पात्र, इयत्ता दहावीचा १०० टक्के निकाल, इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत एका विद्यार्थ्याची पात्रता, तसेच डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश यामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अधिक अधोरेखित झाली आहे.

अल्पावधीतच स्पर्धा परीक्षांमध्ये मिळत असलेल्या या सातत्यपूर्ण यशामुळे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाची शैक्षणिक वाटचाल अधिक भक्कम होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे विश्वासार्ह केंद्र म्हणून उदयास येत आहे.

यशस्वी विद्यार्थी अभिजीत पप्पू बरडे व शिवश्री संतोष जाधव यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे तसेच सहकार्य करणाऱ्या पालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. आगामी काळात शिष्यवृत्ती, NMMS आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यापेक्षाही अधिक उज्ज्वल यश संपादन करण्याचा शाळेचा निर्धार असल्याचे मुख्याध्यापक विजय कोळेकर यांनी सांगितले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष एकनाथराव काकडे, सचिव भैय्यासाहेब काकडे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, रावगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button