नरसीतील दोन लॉजवर एलसीबी व रामतीर्थ पोलिसांची एकाचवेळी कारवाई; कथित देहव्यापाराचे रॅकेट उद्ध्वस्त

रामतीर्थ पोलिसांची नियोजनबद्ध कारवाई; सात महिलांची सुटका, दहा जणांवर गुन्हा दाखल
नायगाव / नांदेड ( प्रतिनिधी )नायगाव तालुक्यातील नरसी येथील बसस्थानकासमोरील अर्शीवाद व आनंद लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित देहव्यापारावर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), रामतीर्थ पोलीस ठाणे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या (AHTU) संयुक्त पथकाने शनिवारी (दि. २५) एकाचवेळी धडक छापे टाकत मोठा पर्दाफाश केला. या कारवाईत सात महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज मालकासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच २ लाख ४ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या स्पष्ट निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगांवकर, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले. रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी स्थानिक माहितीच्या आधारे अचूक सापळा रचत संपूर्ण कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, दोन्ही लॉजमध्ये महाराष्ट्रासह परराज्यातील महिलांना आणून त्यांच्याकडून कथितरीत्या देहव्यापार करून घेतला जात होता. माहितीची शहानिशा करण्यासाठी दोन सामाजिक कार्यकर्त्यांना बोगस ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. व्यवहार निश्चित झाल्याचा इशारा मिळताच एलसीबी, रामतीर्थ पोलीस आणि AHTUच्या पथकाने एकाचवेळी दोन्ही लॉजवर छापे टाकून संशयितांना रंगेहात ताब्यात घेतले.
या प्रकरणात राहलू यशवंता कोलते, विश्वंभर व्यंकटी गाडे, बालाजी आनंदा सूर्यवंशी, खाकीबा शिवाजी सूर्यवंशी, नरसिंग बाबुसिंग ठाकूर ऊर्फ परदेशी, प्रवीण दत्तू वारनलवार, कृष्णा बालाजी देशपिठवार, व्यंकट माधव नारे, विक्की विनोद इंदुरकर तसेच संबंधित लॉज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या सात महिलांना संरक्षण व पुनर्वसनासाठी संबंधित यंत्रणेकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ४, ५ व ६ तसेच भारतीय न्याय संहिता कलम १४३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास रामतीर्थ पोलीस करीत आहेत.
नरसीसारख्या वर्दळीच्या ठिकाणी सुरू असलेल्या कथित अवैध देहव्यापारावर झालेल्या या धडक कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अवैध धंद्यांविरोधात जिल्हा पोलिसांनी ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका स्वीकारल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून गेला असून, अचूक नियोजन करून कारवाई यशस्वी करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे आणि संयुक्त पथकाच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.



