Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आज निळूभाऊंचा स्मृती दिवस

Admin by Admin
July 13, 2026
in मनोरंजन
0
आज निळूभाऊंचा स्मृती दिवस
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

निळू फुले: डोंगराएवढा माणूस

ज्या काळात रविवारी संध्याकाळी दूरदर्शनवर मराठी सिनेमे दाखवले जायचे, आणि त्यांची शीर्षकं सुरू व्हायची, त्यावेळी टीव्हीपाशी जमलेल्या आयाबाया म्हणायच्या की निळू फुल्या हाय का बघ? अर्थात या निळू फुल्यावर त्यांचं प्रेम नसायचं, किंबहुना जगामध्ये सर्वात जास्त तिरस्कार ते या खलनायकाचा करत असतील. मात्र तरीही हा माणूस सिनेमामध्ये असला की तो खूप वाईट कामं करणार, नायक नायिकेची अवस्था बिकट करणार. सिनेमाच्या शेवटी नायकाला हिरोगिरी करण्याची संधी मिळणार तेव्हा या बायाबापड्यांना जास्त समाधान मिळणार. खलनायक प्रभावी असेल तरच नायकाचा प्रभाव पडणार ना! अशोक सराप, अबिता बच्चन प्रमाणे निळू फुल्या हेच नाव माझ्या लहानपणीच्या शब्दकोशात होतं. “निळकंठ कृष्णाजी फुले” हे त्यांचं नाव तसं आजही फारसं प्रसिद्ध नाही. लोकांमध्ये ते निळू फुले आणि निळूभाऊ याच नावानं प्रसिद्ध झाले.

सातारा-पुणे रस्त्यावर खंबाटकी घाटाच्या अलीकडं तुम्हाला रस्त्याच्या कडेला निळूभाऊंचा फोटो लावलेला दिसतो, ज्याच्या खाली लिहिलं आहे “मोठा माणूस!” हे संबोधन अगदी १०० टक्के खरं आहे. कलाकार म्हणून निळूभाऊ खूप मोठे होतेच, मात्र ज्याला निळूभाऊंचं सामाजिक काम माहित आहे, त्याच्यासाठी निळूभाऊ नक्कीच डोंगराएवढं व्यक्तिमत्व आहे. “मी चळवळीचा ढोलकीवाला आहे. रस्त्यावर खेळ सुरू करण्यापूर्वी गर्दी गोळा करण्यासाठी ढोलकी वाजवली जाते, त्याच पद्धतीने माझ्या चेहऱ्यामुळं गर्दी गोळा होत असेल आणि त्याचा उपयोग अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसाठी होत असेल तर ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.” निळूभाऊंचं हे वाक्य आहे. डॉ. लागू म्हणतात की निळू फुले हे एक जागतिक दर्जाचे कलावंत आहेत. मात्र आपल्या महानतेचं ओझं इतरांवर कधीही पडू न देणारा, चंदेरी पडद्यावर खलनायक साकारणारा मात्र खऱ्या आयुष्यात साधा, सरळ, सभ्य, संवेदनशील माणूस. मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेला हा कलाकार..

इंटरनेटवर ४ एप्रिल १९३० हा निळूभाऊंचा जन्मदिवस सांगितला जातो. मात्र त्यांच्या जन्माची नोंद नाही. त्यांची आई सांगायची की “तात्या बोराटे या तुझ्या मित्राच्या याच्या जन्मानंतर एक वर्षानं तुझा जन्म झाला आहे.” निळूभाऊ म्हणतात की “तात्याचा जन्म १९३० चा आहे हे नक्की, म्हणजेच माझा जन्म १९३१ चा असावा.” सात मुलगे आणि चार मुली अशा अकरा भावंडांपैकी निळकंठ हा एक.. निळकंठ हे त्याचं नाव. महात्मा फुले यांच्याप्रमाणे पुरंदर तालुक्यातील खानवडी हेच निळूभाऊंचं मुळगाव. मात्र शेकडो वर्षापूर्वी निळूभाऊंचे पूर्वज देखील पुण्यामध्ये स्थायिक झालेले. त्यांचे पणजोबा हे महात्मा फुले यांच्या भावकीमधील, महात्मा फुलेंना त्रास देणाऱ्यांपैकी एक होते. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत झाल्यावर निळूभाऊ म्हणायचे की “माझं महात्मा फुलेंशी दुरून का होईना, नातं लागतं याचा मला अभिमान आहे. मी त्यांचा वैचारिक वारसदार आहे.”

पुण्यातल्या खडकमाळ आळीत फुले कुटुंबाचं घर होतं. निळूच्या वडिलांकडं मंडईतील दोन गाळे होते. तसंच त्यासमोर एक लोखंडाचे दुकान देखील होतं. या सर्व दुकानांचं भाडं येत असलं तरी घर चालवण्याची प्रमुख जबाबदारी आजीवर होती. वडील प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी उद्योग सुरू करायचे, मात्र वर्षभरात त्यांचा उद्योग गाळात गेलेला असायचा. आजी गुजबेरीची शेती करायची. ब्रिटिश आमदनीमध्ये या गुजबेरीला खूप मागणी असायची. पुण्यातील कॅम्प भागामध्ये जेव्हा निळू ही गुजबेरी विकायला जायचा, त्यावेळी भावताव न करता ब्रिटिश मंडळी ती खरेदी करायची. तासाभरात सर्व गुजबेरी संपलेली असायची. निळूच्या खिशात दीड दोन रुपये खुळखुळत असायचे. घरात “खाऊन पिऊन सुखी” अशी परिस्थिती असली तरी सर्वांना काम केलं तरच पोटाची खळगी भरणार ही देखील वस्तुस्थिती होती.

निळूचा बालपणीचा काही काळ मध्यप्रदेश मध्ये गेला. तिसरीपर्यंत तो तिकडं शिकला. निळूचे चुलते मध्यप्रदेशमध्ये रेल्वेचे स्टेशनमास्तर होते. पुण्याला, घरात एवढ्या मोठ्या संख्येनं मुलं असल्यामुळं एक अलिखित नियम होता की. मुलाला थोडसं कळायला लागलं की त्याला चुलत्याच्या घरी, मध्यप्रदेशमध्ये पाठवायचं. तिसरी चौथीपर्यंत मुलानं तिकडंच राहायचे, मात्र पुणे हे विद्येचं माहेरघर असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्यानं पुन्हा पुण्यात यायचं. निळूदेखील तिसरीपर्यंत तिकडंच राहिला. निळूचे चुलते नास्तिक होते तसंच रसिक देखील. त्यांना कवितांची तसेच शास्त्रीय संगीताची आवड होती. त्या काळात प्रतिष्ठेची वस्तू समजला जाणारा ग्रामोफोन आणि त्याच्या रेकॉर्ड्स त्यांच्याकडे होत्या. आत ग्रामोफोन सुरू आहे आणि स्टेशनबाहेर व्हरांड्यामध्ये गर्दी जमली आहे असं चित्र तेव्हा असायचं. आठ नऊ वर्षाच्या मुलाच्या मनावर नकळत नास्तिकतेचे आणि रसिकतेचे संस्कार होत होते. याशिवाय तिकडे त्याला मनसोक्त फूटबॉल आणि हॉकी खेळायला मिळायचं.

मोठा झाल्यावर साहजिकच त्याला पुण्याला परत पाठवण्यात आलं आणि शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये त्याचं नाव नोंदवलं गेलं. शिक्षणामध्ये निळू कधीच रमला नाही, त्यामुळं वर्गात सर्वात कच्चा विद्यार्थी म्हणून त्याचं नाव येऊ लागलं. या शाळेमध्ये अभ्यास कच्चा असलेल्या मुलांसाठी शाळा सुटल्यानंतर विशेष वर्ग घेतले जायचे. ही तर निळूसाठी डबल शिक्षा होती. कारण जेव्हा बाकीची मुलं घरी खेळत असतील, तेव्हा देखील निळू या एक्सट्रा शिकवणीमध्ये अडकलेला असायचा. निळूला मराठी वगळता सर्व विषय कंटाळवाणे वाटायचे. मात्र जेव्हा एखाद्या शिक्षक गैरहजर असेल, तेव्हा त्याचा ऑफ तास घेण्यासाठी शांताबाई शेळके यायच्या. तो तास निळूसाठी सर्वात जास्त आनंददायक असायचा. शांताबाई या तासात छान छान कविता शिकवायच्या तसेच जागतिक कादंबरी आणि सिनेमे यांची मुलांना ओळख करून द्यायच्या. सध्या पुण्यात कोणता चांगला इंग्रजी सिनेमा चालू आहे याची देखील माहिती द्यायच्या.

या काळात निळूला इंग्रजी सिनेमा पाहायचा वेड लागलं. मित्राचे वडील सिनेमा थिएटरमध्ये कामाला असल्यामुळे तिकिटाला पैसे कुठून आणायचे हा प्रश्न नव्हता, फुकट पास मिळून जायचे. मात्र तरीही निळू प्रत्येक सिनेमा दोन-तीन वेळा पाहायचा. कारण पहिल्यांदा पाहताना इंग्रजी सिनेमातील सर्व संवाद डोक्यावरून गेलेले असायचे, मग या सिनेमाचं कथानक कोणत्या पुस्तकावर आधारित आहे का, या पुस्तकाचं किंवा या सिनेमाचं कुठं परीक्षण छापून आलं आहे का? याचा शोध घेतला जायचा. दुसऱ्यांदा जेव्हा निळू तोच सिनेमा पाहायला जायचा, तेव्हा त्याचा होमवर्क झालेला असायचा. निळूला तमाशा पहायला देखील खूप आवडायचं. त्यांच्या लहानपणी किश्या नावाचा सोंगाड्या प्रसिद्ध होता, विशेष काही शारीरिक हावभाव न करता केवळ आपल्या संवादामधून तो लोकांना पोट धरून हसवत असे. निळू त्याचं निरीक्षण बारकाईने करत होता. हॉलीवुडपासून लोककलावंतापर्यंत.. कळत नकळत निळूचं अभिनय प्रशिक्षण सुरू होतं. त्या काळात अभिनयाचं प्रशिक्षण देणाऱ्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा किंवा फिल्म इन्स्टिट्यूट सारख्या संस्था नव्हत्या. केवळ निरीक्षणांमधून निळूमधील लोककलावंत आणि अभिनेता तयार होत होता.

बाबूराव जगतापांनी स्थापन केलेली शिवाजी मराठा हायस्कूल ही “बहुजनांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन महत्त्वाची पदं मिळवली पाहिजेत” असा आग्रह धरणारी ब्राह्मण्यमुक्त शाळा होती. शाळेत बहुतेक मुलं बहुजन जातीतील तसेच मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्माची असायची. शिक्षक जरी ब्राह्मण जातीतील असले तरी ते ब्राह्मण्यमुक्त झालेले असायचे. गुणवत्ता, तळमळ पाहून त्यांची निवड झालेली असायची. ते विद्यार्थ्यांना आधुनिक दृष्टी देऊ पाहायचे. कुठल्याही समाजामध्ये एखादा विशिष्टच घटक हा धर्माचा आधार घेऊन पूर्ण सiमाजावर आपलं वर्चस्व ठेवत असतो हे त्या शाळेमध्ये सांगितलं जायचं. मात्र आपले शिक्षक तेव्हा शाळेमध्ये काय शिकवायचे, हे तेव्हा उनाडक्या करण्यात गुंग असलेल्या निळूला सामाजिक चळवळीमध्ये आल्यानंतर समजलं.

महात्मा फुले यांचा भर लग्नाच्या मिरवणुकीत अपमान झाला होता, जो वार तरुण जोतीला खूप जिव्हारी लागला आणि त्याचं यावर चिंतन, मनन सुरू झालं. अशी एक घटना निळूभाऊंच्या आयुष्यात देखील घडली. त्यांचा मित्र तात्या बोराटे याच्या कुटुंबियांनी नातूबागेतील एका ब्राह्मण माणसाची जमीन कसायला घेतली होती. एकदा तात्यासोबत निळूभाऊ काही कामानिमित या माणसाच्या घरी गेले. त्या माणसानं दोघा मित्रांना चहा दिला खरा.. पण त्यांना कपबशी बाहेर ठेवायला आणि तिच्यात पाणी ओतून ठेवायला सांगितलं. दोघांनी पाणी ओतलं नि मग ते कप आत गेले. तात्या आणि निळूभाऊंना हा मोठा अपमान वाटला. घरी परत येताना दोघं मित्र हलके उच्च या जातीच्या उतरंडीवर चर्चा करत आले. आपल्याला ब्राह्मण जातीविरोधी नाही तर ब्राह्मण्य वृत्तीविरोधी लढायचं आहे, हे देखील दोन्ही मित्रांचं ठरलं.

निळूचा मामा आणि मोठा भाऊ स्वातंत्र चळवळीत कार्यरत होते, त्यासाठी त्यांनी कारावास देखील भोगला होता. मात्र ते नक्की कोणत्या तत्त्वासाठी लढत होते हे निळूला राष्ट्रसेवादलात आल्यावर समजलं. सेवादलात आल्यावर त्यांच्या आयुष्याला कायमची कलाटणी मिळाली आणि निळूचा निळूभाऊ झाला. गंमत अशी की सेवादलामध्ये सहभागी होण्यापूर्वी निळूभाऊ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेले होते. इथं खेळायला मिळतं हे शाखेत जाण्यासाठी एकमेव कारण होतं. ते त्यांची सर्व टोळी घेऊन जायचे. मात्र तीनच दिवसात निळूभाऊंना सांगण्यात आलं की “तुला यायचं तर ये, पण मुस्लिम इब्राहिम आणि ख्रिस्ती आव्हाड यांना सोबत नको आणूस.” का आणू नको हे तेव्हा निळूभाऊंना समजलं नाही, एवढं समजलं की इथं यायचं तर मित्रांना तोडायला लागणार. जाऊ दे, शाखेला काय सोनं लागलं आहे असा विचार करून निळूभाऊंनी शाखेला रामराम ठोकला. स्वातंत्र्यसैनिक भावाचा त्याचवेळी निरोप आला की, “तुझ्या शाळेजवळ सेवादलाची शाखा सुरू झाली आहे, तिथं जॉइन हो.”

अप्पा मायदेव आणि लालजी कुलकर्णी यांनी सेवादलाची शाखा सुरू केली होती, आनंदराव पाटील, मोहन धारिया, गोपाळ अवस्थी, भाई वैद्य, प्रधान सर, बाबा आढाव असे दिग्गज इथं जमायचे. सेवादलात आल्यावर निळूभाऊंनी सर्वात पहिला प्रश्न विचारला की इथं माझे मुस्लिम आणि ख्रिस्ती मित्र चालतील का? जेव्हा त्यांना समजलं की इथं तशी काही अडचण नाही, तेव्हा त्यांना आनंद झाला. सेवादलाला एक हिरा मिळून गेला. त्या काळात सानेगुरुजी, महात्मा गांधी अशा अनेक दिग्गजांचा सहवास निळूभाऊंना लाभला. गांधीजी पहाटे पाच वाजता फिरायला बाहेर पडतात, त्यांच्यासोबत फिरायला मिळावं म्हणून निळूभाऊ पहाटे साडे तीन वाजता उठून तयार राहत असत. निळूभाऊ सेवादलामध्ये शाळेतल्या गुरुजींपासून थेट सानेगुरुजींपर्यंत सर्वांच्या नकला करायचे. त्यामुळे सेवादलाच्या मंडळींना वाटलं की याचा कलापथकात वापर झाला पाहिजे. शाळेच्या स्नेहसंमेलनात देखील कधी भाग न घेतलेला हा गडी कलापथकात मात्र खुलला. भाषेतील ग्रामीण बाज हा त्यांची कमजोरी न बनता शक्तिस्थान ठरलं. रंगमंचावर त्यांचा वावर असा बिनधास्त होता, जणू काही त्यांचा जन्मच यासाठी झाला होता. कलापथकात सर्वात जास्त ॲक्टिव्ह असल्यामुळं कलापथकप्रमुख हे पद देखील निळूभाऊंना मिळालं. पथकाचे प्रयोग सुरू झाले.

शिक्षणात रस नसल्यामुळं निळूभाऊंनी नववीमध्ये शाळा सोडली आणि माळीकामाचा एक डिप्लोमा पूर्ण केला. याच्या आधारे त्यांना वानवडी मधील आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी देखील लागली. तिथं कर्नल वाबळे हे बालगंधर्वांचे जावई निळूभाऊंचे वरिष्ठ म्हणून आले, ज्यांनी निळूभाऊंना नाटकात काम करताना पाहिलं होतं. मग काय! हेड माळी म्हणून निळूभाऊंची बढती देखील झाली आणि प्रयोग करायला जायचं असेल तर सुट्टी देखील मिळू लागली. राहण्यासाठी निळूभाऊंना एक स्वतंत्र खोली देण्यात आली. पुस्तकांचं वाचन करायला भरपूर वेळ मिळत होता. त्यामुळेच अवघा ८० रुपये पगार असताना देखील निळूभाऊ इथं तब्बल अकरा वर्ष टिकले. या काळात त्यांनी नाट्यप्रयोगातून जे पैसे कमावले, ते सर्व सेवादलात देऊन टाकले. १९६२ मध्ये निळूभाऊ सेवादलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले. पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून पंचवीस रुपये मानधन सुरू झालं.

देश स्वतंत्र झाला तेव्हा निळूभाऊ आणि त्यांचं कलापथक आपल्या लोकनाट्यमधून जनतेला स्वातंत्र्य म्हणजे काय? नागरिकांचे हक्क काय? हे समजून सांगत होते. पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून झालेली चळवळ तसेच गोवा मुक्तिसंग्रामामध्ये देखील निळूभाऊंनी सक्रिय सहभाग घेतला होता. गनिमी काव्याचा वापर करून पोलिसांना गुंगारा देत, तब्बल १०० किलोमीटर पायी चालत जाऊन निळूभाऊ सावंतवाडीला पोहोचले होते. मात्र वरिष्ठांनी ठरवलं की केवळ मधु दंडवते आणि भाई वैद्य हेच सत्याग्रह करतील. मग सत्याग्रहांना मदत करणं, त्यांच्यासाठी अन्नधान्य जमवणं अशी भूमिका निळूभाऊंनी बजावली. या काळात निळूभाऊंवर सानेगुरुजी आणि लोहियांचा खूप प्रभाव पडला. सानेगुरुजींसारखा दिसायला अगदी सामान्य दिसणारा माणूस.. मात्र भाषणाला उभे राहिले की श्रोत्यांना दीड दोन तास खिळवून ठेवत असे. निळूभाऊंना याचं खूप आश्चर्य वाटायचं.

तेव्हा हिंदू मुस्लिम ऐक्य हा प्रश्न सेवादलामध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जायचा. मात्र दलित किंवा स्त्रियांच्या प्रश्नांवर इतर कोणी बोलत नव्हतं. निळूभाऊ म्हणतात की तेव्हा राष्ट्र सेवादलाचं देखील ब्राह्मणीकरण झालं होतं, जिथं महात्मा फुले आणि बाबासाहेब यांना आजच्या इतकं जास्त महत्व दिलं जात नव्हतं. कम्युनिस्ट असोत की समाजवादी असोत, सर्वच पक्षांचं नेतृत्व ब्राम्हणी असल्यामुळं त्यांना इतर प्रश्न तितक्या पोटतिडकीनं जाणवत नसावेत. मात्र “पिछड़ा पावे सौ में साठ” म्हणजेच मागासांना ६० टक्के आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी लोहिया करायचे. लोहियांप्रमाणे आपण देखील राजकारणात गेलं पाहिजे असे निळूभाऊंच्या मनात येऊ लागलं. मात्र सन १९५५ मध्ये समाजवादी पक्षामध्ये उभी फूट पडली. जयप्रकाश नारायण यांनी प्रजासमाजवादी नावाने स्वतंत्र पक्ष स्थापन केला. सेवादलावर याच पक्षाचा वरचष्मा होता. त्यामुळे काही काळ निळूभाऊंनी सेवादलातून बाजूला होत “आंदोलन” नावाचं स्वतंत्र कलापथक स्थापन केलं. त्याचेही महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रयोग झाले.

जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली तेव्हा निळूभाऊ सेवादलाच्या कलापथकात पुन्हा सहभागी झाले. अत्रे, डांगे, एसेम यांसारख्या दिग्गजांच्या भाषणापूर्वी गर्दी जमवणं आणि मुख्य वक्ते येईपर्यंत जमलेली गर्दी टिकवणं हे काम कलापथक करत असे. आंदोलनामध्ये निळूभाऊंनी रस्त्यात झोपून इंदिरा गांधींची गाडी अडवली होती, सुपरकॉप म्हणून नंतर प्रसिद्ध झालेले पोलीस अधिकारी, ज्युलियस रिबेरो यांनी तेव्हा निळूभाऊंच्या पाठीवर छडी मारली होती.‌ निळूभाऊ म्हणतात की पोलिसांसमोर मार खाण्याचे धैर्य मी दाखवू शकलो याचं मला आयुष्यभर समाधान राहिलं आहे. चळवळीसोबतच कला क्षेत्रामध्ये देखील निळूभाऊंची घोडदौड सुरू होती. लीलाधर हेगडे, राम नगरकर, वसंत बापट यांसारखे साथीदार त्यांच्यासोबत होते. निळूभाऊंनी स्वतः ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’ हा वग लिहिला आणि सादर केला. त्यानंतर पु. ल. देशपांडे यांच्या पुढारी पाहिजे नाटकात रोंगेची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या वगनाट्यामधून त्यांना कलाकार म्हणून प्रचंड प्रसिद्धी मिळाली. बिन बियांचं झाड, कुणाचा कोणाला मेळ नाही, मास्तर एके मास्तर, भलताच बैदा झाला, माझी मेहुणी.. माझी बायको, लवंगी मिरची मी कोल्हापुरची अश्या अनेक लोकनाट्यातून निळुभाऊंनी जनतेशी संवाद साधला आहे.

निळूभाऊंची दादा कोंडकेंशी ओळख सेवादलामध्येच झाली. या शाहीराला मुंबईमधून पुण्यामध्ये बोलवण्यासाठी निळूभाऊंनीच शब्द टाकला होता. त्या दोघांच्या दोस्तीमधील एक भन्नाट किस्सा दादा कोंडके यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिला आहे. एकदा दादा ढाराढूर झोपले असताना निळूभाऊंनी बिडी पिऊन तिचा धूर दादांच्या चादरीमध्ये सोडला. दादांना अर्थातच समजलं नाही. सेवादलाच्या शिस्तीमध्ये बिडी पिणं अजिबात बसत नव्हतं. बिडीचा वास कुठून येतो आहे याचा शोध घेत सेवादलाचे प्रमुख भाऊसाहेब रानडे जेव्हा दादांपाशी आले आणि त्यांनी चादर बाजूला केली. चादरीमध्ये लपून दादा बिडी ओढत होते, मात्र आता झोपेचे सोंग घेत आहेत असा सीन तेव्हा क्रिएट झाला. मग काय पंधरा दिवस सगळ्या मुलांचे कपडे धुण्याची शिक्षा दादांना सुनावण्यात आली. असो… हे सर्व गंमतीच्या पातळीवर झालं. दादा कोंडके यांनी जेव्हा स्वतःचा सोंगाड्या सिनेमा काढला, त्यावेळेस बत्ताशाच्या भूमिकेत निळूभाऊंना संधी दिली होती. अर्थात त्या आधीच निळू फुले हा ब्रँड तयार झाला होता. एक गाव बारा भानगडी मधल्या झेले अण्णा या भूमिकेनं पूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं.

चित्रपट शौकीन असल्यामुळं निळूभाऊंना कॅमेऱ्याचं खूप आकर्षण होतं. आपण देखील कॅमेरा शिकला पाहिजे असं त्यांना वाटायचं. म्हणून त्यांनी शांतारामबापूंच्या राजकमल स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या मित्राशी संपर्क साधून कॅमेरा शिकायला मिळेल का? अशी विचारणा केली. पण मुंबईत राहणार कुठं? हा प्रश्न होताच, जो लीलाधर हेगडे यांनी मिटवला. एकत्र राहू आणि घासातला घास खाऊ असं त्यांनी कळवल्यावर निळूभाऊ निर्धास्तपणे मुंबईला गेले. आधी काही फुटकळ, कामचलाऊ भूमिका केल्या, मात्र एक गाव बारा भानगडी, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी आणि सोंगाड्या हे चित्रपट एकामागून एक प्रदर्शित झाले आणि निळू फुले यांची लोकप्रियता गगनाला गवसणी घालू लागली. अर्थात अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळत असली तरी निळूभाऊंचे कॅमेऱ्याचे तंत्र समजून घेणं चालू राहिलं. शॉट नसला की जेव्हा इतर लोक पत्ते खेळत बसायचे, तेव्हा भाऊ मात्र कॅमेर्‍यामन जवळ बसलेले असायचे.

१९७२ मध्ये जेव्हा विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं सखाराम बाईंडर हे नाटक रंगमंचावर आलं तेव्हा महाराष्ट्रात गदारोळ उठला. “कसलाही विधिनिषेध नसलेला एक व्यक्ती वाक्यागणिक शिव्या देत जणू “सैतानाचे तत्वज्ञान” जस्टीफाय करून सांगत आहे, असं नाटक आपल्या संस्कृतीच्या दृष्टीनं अतिशय हानिकारक आहे” असं म्हणत हे नाटक बंद पाडण्याची मोहीम काही “सो कॉल्ड” संस्कृतीरक्षकांनी सुरू केली. निळूभाऊ आणि सारंग दाम्पत्य यांनी या प्रसंगाला अतिशय धीरानं तोंड दिलं. या नाटकात निळूभाऊंच्या अभिनयाचा कस लागला. शहरी ब्राम्हण असलेलं सखाराम हे मुख्य पात्र साकारताना निळूभाऊंना त्यांच्या बोलण्याच्या शैलीवर खूप काम करावं लागलं. नाटकाचे दिग्दर्शक कमलाकर सारंग यांनी निळूभाऊंकडून ब्राम्हणी भाषा घोटून घेतली होती.

निळू फुले यांना वाचनाची आवड होतीच, मात्र आपल्या सहकलाकारांनी देखील वाचन केले पाहिजे यासाठी ते आग्रह करायचे. अशोक सराफ एक आठवण सांगतात की “निळूभाऊंनी मला अनेक वेळा लोहिया वाचण्याचा सल्ला दिला, मात्र मी गंभीर वाचन कधी केलंच नाही. शेवटी सांगून सांगून निळूभाऊ वैतागले आणि त्यांनी माझा नाद सोडून दिला.” अशोक सराफ आणि निळू फुले या जोडीनं अनेक चित्रपटात धमाल उडवून दिली आहे. सन १९७२ याच वर्षी आलेला पिंजरा सिनेमा निळूभाऊंना यश मिळवून देणारा आणि त्यासोबत डॉ. लागू यांच्यासारखा मित्र भेटवणारा ठरला. दोघांचं वाचनप्रेम आणि जागतिक सिनेमा पहायची आवड देखील सारखीच. त्यामुळे भूमिका साकारताना दोघंही खोलवर घुसलेले असायचे. या जोडीनं पुढं सामना आणि सिंहासन चित्रपटातून अभिनयाची जुगलबंदी करत मराठी सिनेमा साता समुद्रापार पोचवला. सामना चित्रपटानं २५व्या बर्लिन चित्रपट महोत्सवात नामांकन मिळवलं होतं.

निळूभाऊंना आपल्या अभिनयाची पोच जनतेकडून भरभरून मिळाली. एकदा निळूभाऊंना रात्री प्रवास करून पुण्यातून कोल्हापूरला सकाळपर्यंत पोहचायचं होतं. हायवे नाक्यावर येऊन त्यांनी एका ट्रकला हात केला. ट्रक ड्रायव्हर बोलला की “फक्त कराडपर्यंत आहे.” भाऊ बोलले “ठीक, कराड तर कराड!” भाऊ मागं गाडीत बसले, मात्र क्लिनर त्यांच्याकडे टॉर्च मारून पुन्हा पुन्हा पाहत होता. अखेरीस तो ड्रायव्हरला बोलला की गाडीत झेले अण्णा बसला आहे. ड्रायव्हरनं गाडी थांबवून कन्फर्म केलं. मग त्यानं वाटेत निळूभाऊंना जेवण खाऊ घातलं. त्यानंतर भाऊ गाडीत मस्त झोपले. सकाळी उठून पाहतात तर ते कोल्हापूरला पोचले होते. भाऊंनी विचारले की “तुम्हाला कराडला जायचं होतं ना?” ड्रायव्हर बोलला की “एवढा मोठा माणूस गाडीत झोपलेला असताना आपण त्याची झोपमोड करायची व्हय? कराडला जाता यील की परत.” त्यांना भाऊंनी सर्व शूटिंग दाखवली, त्यांचा पाहुणचार केला.

मात्र भाऊंना एकदा असाही अनुभव आला की निमंत्रित पाहुणा असताना त्यांचा पाहुणचार झाला नाही. एका तंत्रज्ञ मित्रानं सिनेमाच्या पूर्ण टीमला जेवायला बोलावलं होतं. मात्र निळूभाऊंना पाहून मित्राच्या आईचा पारा चढला. आई म्हणाली की “चांगलं चपलेनं हाणायचं सोडून या माणसाला घरी जेवायला बोलवतूस व्हय?’ या नीच माणसाला माझ्या घरात जेवण मिळायचं नाही.” बिचारा तंत्रज्ञ सांगून सांगून दमला की “अगं ते कथानक असतं, खोटी खोटी ॲक्टिंग केलेली असते. डायरेक्टर सांगेल तसं करावं लागतं सर्वांना.” मात्र आई काहीच ऐकायला नाही. शेवटी तंत्रज्ञानं भाऊंपुढे हात जोडले. तेव्हा भाऊ म्हणाले की “अरे ही तर माझ्या अभिनयाला मिळालेली सर्वोत्तम दाद आहे.” खलनायकाचे पात्र वठवणाऱ्या कलाकाराला त्यादिवशी बाहेरच जेवायला लागलं.

ज्या काळामध्ये सिनेमातील खलनायक आपली छाप पाडण्यासाठी मोठ्या आवाजात, ऑलमोस्ट किंचाळत संवाद फेकत असे, त्याकाळात आपल्या शांत एन्ट्रीनं आणि नजरेतील धाकानं “निळू फुल्या” हा कलाकार भीती निर्माण करायचा. त्यांच्या आवाजाबद्दल काय बोलणार? महाराष्ट्रातील असा एकही मिमिक्री कलाकार नाही, ज्यान निळूभाऊंची नक्कल केली नसेल. मात्र तरीही आपली जरब बसवण्यासाठी त्यांना डायलॉग बोललाच पाहिजे असं नव्हतं, फ्रेममध्ये केवळ त्यांचं असणं पुरेसं असायचं. अर्थात त्यांची खलनायकी प्रतिमा जास्त प्रसिद्ध असली तरी त्यांनी मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये विविध रंगाच्या भूमिका केल्या आहेत. त्यामुळेच सामनामधील त्यांचा हिंदुराव जेवढा ओरिजनल वाटतो, तेवढाच वो सात दिन मधील म्हातारा बापदेखील… धूर्त राजकारणी, रगेल पाटील/ जमीनदार, बेरकी तमाशा कलावंत, तत्वनिष्ठ पत्रकार, वृद्ध आजोबा, गरीब शेतकरी असा त्यांचा भूमिकेचा आवाका प्रचंड मोठा आहे. सहकार चळवळीतून उदयाला आलेल्या पुढाऱ्याचं, अमर्यादित सत्तेमधून माजलेल्या नेत्याचं पात्र सादर करावं ते निळूभाऊंनीच!!

निळूभाऊंनी नाटक आणि चित्रपटात सादर केलेल्या भूमिकांवर खूप काही बोलता येईल. मात्र तो आजच्या लेखाचा विषय नाही. यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना देखील जमिनीवर पाय असणं, कमावत असलेला पैसा गरजुंपर्यंत कसा पोहचेल याची काळजी घेणं, स्वतःच्या प्रसिद्धीचा वापर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीसाठी करणं याबाबींमुळे निळूभाऊ ग्रेट ठरतात. “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” ही सानेगुरुजींची प्रार्थना निळूभाऊंनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर जगली. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांनी ना कधी सेटवर नखरे केले, ना चळवळीच्या कार्यक्रमात! सेटवर किंवा चळवळीमध्ये काम करताना त्यांची कसलीच मागणी नसायची. इथं त्यांच्या गरजा किमान असायच्या. आपल्याला काय खायला आवडतं, ते स्वतःच्या पैशाने खायचं. चळवळीसाठी दौरे करताना देखील हा एवढा मोठा कलावंत दोन सीटच्या मधल्या जागेत वळकटी टाकून झोपायचा. ज्याची एक झलक पाहायला हजारो लोकं तासनतास ताटकळत थांबायचे, त्याची राहणी एवढी साधी होती.

सामना, सिंहासन असे मोजके चित्रपट “क्लास”साठी होते. इतर गल्लाभरू चित्रपट “मास”साठी बनवले जायचे. साहजिकच प्रेक्षकांना आवडणारी बेरकी पुढाऱ्याची प्रतिमा निळूभाऊंना पुन्हा पुन्हा साकारावी लागली. म्हणूनच निळूभाऊ चित्रपटापेक्षा नाटक या माध्यमांवर अधिक प्रेम करत होते. ते म्हणतात की मी १५० पेक्षा जास्त सिनेमे केले. नाटकांची संख्या त्या तुलनेत काहीच नाही. मात्र जंगली कबूतर, सखाराम बाईंडर, बेबी, सूर्यास्त या नाटकांनी जे समाधान दिलं, हिंदुराव, पत्रकार दिगू यांच्या भूमिका साकारताना जे समाधान मिळालं, ते इतर सिनेमात नाही. त्यांनी कुली, सारांश, मशाल, नरम गरमसारखे प्रसिद्ध हिंदी चित्रपट केले असले तरी ते बॉलिवूडमध्ये रमले नाहीत. निर्मात्याकडे जाताना जेवढी मोठी गाडी घेऊन जाल, तेवढं मानधन वाढवून मिळायचं! मात्र निळूभाऊ कसल्याच शोबाजी मध्ये कधीच अडकले नाहीत.

आपल्या कमाईतील किमान दहा टक्के रक्कम समाजाला परत केली पाहिजे हे व्रत त्यांनी आयुष्यभर जपलं. कुठंही वाच्यता न करता निळूभाऊ व्यक्तिगत पातळीवर आयुष्यभर गरजूंना मदत आले. मात्र त्यांचे एक स्नेही राम बापट त्यांना म्हणाले की “तू एकटा करशील त्याला मर्यादा आहेत त्यापेक्षा असं काहीतरी कर की ज्यातून नियमित उत्पन्न सुरू होईल आणि ते तुला सामाजिक कामासाठी वापरता येईल.” यातूनच सामाजिक कृतज्ञता निधीची कल्पना पुढे आली. बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर, डॉ. लागू यांनी या कल्पनेला आकार दिला आणि रूपरेषा ठरली. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन परिवर्तनाचं काम करणाऱ्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांना नियमित उत्पन्न देता येईल यासाठी निधी जमवणं सुरू झालं. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे प्रयोग झाले. या प्रयोगांमध्ये तनुजा, सदाशिव अमरापूरकर, सुहास जोशी, भारती आचरेकर यांसारख्या कलाकारांनी भाग घेतला. दाभोलकरांनी या दौऱ्याचं अगदी नीटनेटकं व्यवस्थापन केलं. यातून तब्बल एक कोटी रुपयांचा निधी उभा झाला, ज्याच्या व्याजातून मेधा पाटकर यांच्यासारख्या चळवळीत पूर्ण आयुष्य वाहून देणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना अल्पस्वरूपात मानधन सुरू झालं.

वाचन हा त्यांचा अतिशय आवडता विषय. दिवसभर चहा सिगारेट आणि वाचायला पुस्तक असेल तर मग त्यांना जेवण नाही मिळाले तरी चालेल अशी परिस्थिती असायची. कितीही मोठे पुस्तक असले तरी एका बैठकीत पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असे. चाहत्यांच्या पत्रांना उत्तर देणं हा देखील निळूभाऊंसाठी एक जिव्हाळ्याचा विषय होता. हजारो चाहत्यांनी त्यांना पत्र पाठवलेला असायचं. ज्या दिवशी शूटिंग किंवा नाटक असं काहीच नसेल, त्या दिवशी ही सर्व पत्र वाचणं आणि त्यांना उत्तर देणं हा कार्यक्रम असायचा. महिन्यातले चार-पाच दिवस या कामासाठी मिळून जायचे. श्रीमंती आणि प्रसिद्धी आली तरीदेखील पांढरा पायजमा आणि वर झब्बा, खांद्यावर कापडी झोळी हाच त्यांचा “कार्यकर्ता” वेश कायम राहिला. मात्र कदाचित या अशा साध्या राहणीमुळे, समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना, दोघांमधील अंतर कमी होत असावे.

स्त्री-पुरुष संबंधाबाबत निळूभाऊंचे विचार काळाच्या खूप पुढचे होते. त्यांच्या मैत्रिणींपैकी अनेकजणी त्यांच्या “खास” असल्या, तरी त्या नात्याकडं पाहण्याचा निळूभाऊंचा दृष्टिकोन खूप आधुनिक होता. शारीरिक संबंधांतून येणारी मालकी भावना त्यांना मान्य नव्हती. तुम्ही आकर्षण किंवा प्रेमापोटी एकत्र येत असाल, मात्र त्यामुळे तुम्ही एकमेकांचे मालक किंवा गुलाम होऊ शकत नाही. प्रत्येकाने स्वतःची स्पेस सांभाळली पाहिजे, दुसऱ्याच्या स्पेसचा आदर केला पाहिजे अशी त्यांची सरळसोपी मांडणी आजच्या जेन झी किंवा अल्फा बीटा मंडळींच्या विचारांना जास्त जवळ जाणारी होती. त्या काळातील बहुतेक मंडळींना ही मते अर्थातच पटली नसतील. मात्र प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची निळूभाऊंना सवय होतीच!

निळूभाऊ म्हणतात की “मी एक आदर्श फॅमिलीमॅन होऊ शकलो नाही.” मात्र त्यांचं वेळापत्रक कितीही बिझी असलं, तरी त्यांनी आपली मुलगी गार्गी हिचा वाढदिवस कधी चुकवला नाही. याशिवाय उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये कुटुंबासोबत फिरण्यासाठी दहा दिवस राखून ठेवलेले असायचे. निळूभाऊ नास्तिक असले तरी त्यांनी आपली मते घरच्यांवर लादली नाहीत. त्यामुळेच आस्तिक असलेल्या गार्गी फुले म्हणतात की मला असा बाबा मिळणं ही देवाची कृपा आहे. निळूभाऊंच्या पत्नी रजनीताई या उर्दू आणि हिंदीच्या अभ्यासक होत्या. वेळ मिळेल तेव्हा हे जोडपं बेगम अख्तर, गुलाम अली, मेहदी हसन ऐकत त्यावर चर्चा करायचं. निळूभाऊ खाण्यापिण्याबाबत अतिशय शौकीन होते. कुठं काय भारी खाद्यपदार्थ मिळतात हे त्यांना ठाऊक असायचं. मात्र घरी किंवा सेटवर असताना समोर ताटामध्ये जे अन्न येईल, त्याचा त्यांनी आयुष्यभर मान ठेवला. तिखट मीठ कमी झाले तरी त्यावर काही बोलून स्वयंपाक करणाऱ्याला त्यांनी कधी खजील केलं नाही. स्वयंपाक बिघडला असला, नावडीचा मेनू असला तरी ते आनंदाने जेवायचे. इथे त्यांचं अभिनय कौशल्य कामी येत असावं.

अभिनयासाठी त्यांना १९७२ ते१९७४ या सलग तीन वर्षी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांना संगीत नाटक अकादमी, अनंतराव भालेराव पुरस्कार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेेचा जयवंतराव टिळक स्मृती गौरव पुरस्कार देखील मिळाला आहे. महाराष्ट्र शासनानं जेव्हा त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊ केला, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सांगितलं की, “मी आजवर जे सिनेमात काम केलं आहे, ते भरपूर पैसे घेऊन केलं आहे. महाराष्ट्र भूषण नावाचा पुरस्कार अशा व्यक्तीला गेला पाहिजे, जी निरपेक्षपणे काम करते.” अर्थात निळूभाऊंनी देखील निरपेक्षपणे भरपूर सामाजिक काम केलं होतं. मात्र असा पुरस्कार ताज्या दमाच्या कार्यकर्त्यांना मिळाला तर त्यांचा उत्साह अधिक वाढेल, त्यांच्या कामाला बळ मिळेल अशी निळूभाऊंची भूमिका होती. त्यावर्षी भाऊंच्या शिफारसीवरून अभय बंग आणि राणी बंग यांना महाराष्ट्र भूषण मिळाला.

पुरस्कार आणि पदाचा मोह निळूभाऊंना नव्हताच. नव्वदीच्या सुमारास अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम सुरू झालं, तेव्हा समितीचं अध्यक्षपद निळूभाऊंनी स्वीकारावं अशी विनंती डॉ. दाभोळकांनी केली होती. निळूभाऊ म्हणाले की “मी अध्यक्षपद स्वीकारणार नाही, मात्र या कामासाठी दर महिन्याला दोन दिवस देईल.” हा शब्द त्यांनी कसोशीनं पाळला. निळूभाऊंच्या मागे असलेलं ग्लॅमर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम वाढण्यासाठी खूप उपयोगी पडलं. या कामासाठी त्यांनी शासन दरबारी आपलं वजन वेळोवेळी खर्ची केलं. बुवाबाजीविरोधाचा लढा, जट निर्मूलन आणि कोकणातील ‘शोध भुताचा : शोध मनाचा या मोहिमांमध्ये त्यांनी अगदी कार्यकर्त्यासारखा सहभाग घेतला.

१९९६ मध्ये निळूभाऊंनी निर्णय घेतला की आता अभिनय करायचा नाही. कुटुंबाला आणि वाचनाला इथून पुढचा वेळ द्यायचा. मात्र त्यानंतरही त्यांनी निवडक सिनेमा आणि नाटकं केली. राजदत्त यांच्या दिग्दर्शनाखाली खैरलांजी सिनेमामध्ये भैयालाल भोतमांगे यांची भूमिका निळूभाऊंना करायची होती. मात्र प्रकृती अस्वस्थामुळं त्यांना ती करता आली नाही, ज्याची खंत भाऊंना शेवटपर्यंत वाटत राहिली. २००९ मध्ये आलेला “गोष्ट छोटी डोंगराएवढी” हा त्यांचा हा शेवटचा चित्रपट ठरला. या सिनेमामध्ये आपल्याला त्यांचं थकलेलं रुप पाहायला मिळतं. आयुष्याच्या अखेरच्या अंकात त्यांना अन्ननलिकेचा कर्करोग झाला. दोन महिने आजारपणामध्ये गेले. १३ जुलै २००९ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.‌ समृद्ध आयुष्य जगून एक डोंगराएवढा माणूस अनंतामध्ये विलीन झाला.

अभिनय करताना चेहऱ्याला रंग लावणाऱ्या या माणसाला कधी खोटा मुखवटा धारण करण्याची गरज पडली नाही.‌ कार्यकर्ता कसा असावा, अभिनेता कसा असावा आणि एक विचारवंत कसा असावा याचं आदर्श उदाहरण म्हणजे निळूभाऊ!! निळूभाऊंना जेव्हा विचारलं गेलं होतं की “आत्मचरित्र लिहिणार का?” तेव्हा ते म्हणाले होते, “मी एक अतिशय सामान्य माणूस असून माझ्याकडून आयुष्यात अनेक चुका झाल्या आहेत. मी प्रसंगी शिव्याही दिल्या आहेत. खरं बोलण्याची माझी अद्याप हिम्मत नाही आणि खोटं बोलणं हा माझा स्वभाव नाही म्हणूनच आत्मचरित्र लिहिण्याचा मी विचार करू शकत नाही.” सचोटी आणि तत्त्वनिष्ठता यातून आलेली पारदर्शकता. निळूभाऊ म्हणजे पाण्याच्या निर्मळ झरा.‌ मराठी मातीला लाभलेला एक छोटा माणूस… डोंगराएवढा!!!

 फेसबुक वॉलवरून

Previous Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

Next Post

विश्वगुरूचा जप थांबवा किंवा हा मूर्खपणा बंद करा – गायिका अनुराधा पौडवाल 

Admin

Admin

Next Post
विश्वगुरूचा जप थांबवा किंवा हा मूर्खपणा बंद करा – गायिका अनुराधा पौडवाल 

विश्वगुरूचा जप थांबवा किंवा हा मूर्खपणा बंद करा - गायिका अनुराधा पौडवाल 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157235
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697