अभिनेते जलाल आगा

शोले चित्रपटातील मेहबुबा मेहबुवा हे गाणे. हेलनच्या आजूबाजूला रुबाब वाद्य वाजवत नाचणारा मस्तमौला जिप्सी आणि टी.व्ही.वर लागणारी पानपरागची जाहिरात. थोडक्या छोट्याशा भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारा कलाकार जलाल आगा. आज ११ जुलै जलाल_आगा यांचा जन्मदिवस.
६० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत ६० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या जलाल आगा यांचा जन्म ११ जुलै १९४५ रोजी मुंबई येथे झाला. जलाल आगा हे सुप्रसिद्ध विनोदी नट आगा यांचे चिरंजीव. वडील प्रसिध्द अभिनेते असले तरी शाळेत न गेल्यामुळे त्यांना लिहिता वाचता येत नव्हते, आगा यांची इच्छा होती की, आपल्या मुलांनी चित्रपटांच्या झगमगाटापासून दूर राहून शिक्षण घ्यावे. आपल्या मुलांनी, विशेषत: मुलींनी, चित्रपटात काम करण्याच्या विरोधात ते ठाम होते. या बाबतीत ते पुराणमतवादी विचारांचे होते. ते आपल्या मुलींना सांगत, तुम्हांला अभिनय करण्याची गरज नाही त्यापेक्षा स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करायला शिका. पण भविष्य घडविणे माणसाच्या हातात नसते. नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आगा यांना तीन मुली आणि जलाल हा मुलगा होता. दैवयोगाने चौघेही चित्रपटक्षेत्रातच आले. त्यापैकी मुलगा जलाल आगा आणि मुलगी शहनाज आनंद यांनी प्रसिद्धी मिळवली.
जलाल यांना बालपणीच दिलीपकुमारच्या सांगण्यावरून मुघल ए आझम चित्रपटातील दिलीपकुमारच्या बालपणातील भूमिका चालून आली होती. त्यासंदर्भात दिग्दर्शक के. आसिफशी बोलणे केले. त्यांची हरकत नव्हती. पण जलाल चित्रपटात काम करणार नाही यावर आगा ठाम होते. दिलीपकुमार कुठे आपला हेका सोडणार होते? काही दिवसांनंतर दिलीप कुमार यांनी आगा यांना सांगितले की, त्यांच्या वाढदिवसानिमितातने ते काही मुलांना तीन दिवस सहलीवर घेऊन जात आहेत. जलालने या सहलीला सोबत यावे अशी त्यांची इच्छा आहे. आगा मित्राला नकार देऊ शकले नाही आणि त्यांनी दिलीपसोबत जलालला पाठवले. जलालला सहलीला नेण्याऐवजी दिलीप कुमार मुघल-ए-आझमच्या सेटवर पोहोचले. सगळी तयारी झाली होती. जलालचे सर्व शूटिंग तीन दिवसांत पूर्ण झाले आणि चौथ्या दिवशी जलाल त्याच्या घरी होता. नंतर आगा यांना ही गोष्ट कळताच ते खूप संतापले. त्यांनी दिलीपकुमारांशी बोलणे बंद केले. पण नंतर जेव्हा त्यांनी मुघल-ए-आझम हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि त्यांनी दिलीपकुमारांना मिठी मारली. मात्र जलाल यांनी वडिलांची इच्छा पूर्ण केली. पदव्युत्तर उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्यांनी पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला
त्यानंतर १९६७ साली के.ए.अब्बास यांच्या बंबई रात की बाहो में या चित्रपटा द्वारे नायक म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर के.अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्थानी’ (१९६९). ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘दो बूद पानी’ (१९७१) या चित्रपटामध्ये त्यांनी सिमी गरेवाल सोबत मुख्य भूमिका साकारली. हा चित्रपट राजस्थानच्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला होता.
त्यानंतरच्या आपल्या कारकिर्दीत जलाल यांनी बहुतेक सहाय्यक भूमिका साकारल्या, नायकाचा मित्र किंवा नायिकेचा अयशस्वी प्रेमी या भूमिकांतून कॉमेडी टायमिंग, उत्स्फूर्त अभिनयातून विविधांगी भूमिका साकारण्याच्या क्षमतेसाठी ते प्रसिध्द झाले. हृषिकेश मुखर्जी यांचा मझंली दीदी (१९६६), बासू चॅटर्जी यांचा ‘सारा आकाश’ (१९६९), ब्रिज सदाना यांचा ‘कठपुतली’ (१९७१), एम. एस. सत्यू यांचा ‘गरम हवा’ (१९७४), मुजफ्फर अली यांचा ‘गमन’ (१९७८), श्याम बेनेगल यांचा ‘जुनून’ (१९७९) आणि सुभाष घई यांचा ‘कर्ज’ (१९८०) हे त्यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय चित्रपट होते.
त्याच्या इतर काही संस्मरणीय भूमिकांमध्ये ‘ज्युली’ (१९७५) मधील ज्युलीचा मूक प्रेमी रिचर्ड, ‘घर घर की कहानी’ (१९७०) मधील ‘समा है सुहाना सुहाना’ मधील गायक, ‘थोड़ी सी बेवफाई’ (१९८०) मधील शबाना आझमीचा भाऊ, ‘घरोंदा’ (१९७७) मधील अमोल पालेकरचा मित्र आणि रूममेट आणि ‘दिल आखीर दिल है’ (१९८२) मधील नसीरुद्दीन शाह यांचा मित्र यांचा समावेश आहे.’बॉम्बे टॉकीज’ (१९७०), ‘गांधी’ (१९८२), ‘किम’ (१९८३) आणि ‘द डिसिव्हर्स’ (१९८८) यासारख्या काही इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्येही जलाल यांनी भूमिका केल्या आहेत.
याशिवाय ‘आया सावन झूम के “(१९६९),’ ‘गोमती के किनारे “(१९७२),’ जिंदगी जिंदगी” (१९७२), ‘कॉल गर्ल “(१९७४),’ उस पार” (१९७४), ‘मृग तृष्णा “(१९७५),’ टॅक्सी टॅक्सी” (१९७७), ‘शंकर हुसेन “(१९७७),’ आधा दिन आधी रात” (१९७७), ‘हम किसीसे कम नहीं “(१९७७),’ हमारा संसार” (१९७८), ‘घाटा “(१९७८),’ नौकर” (१९७९), ‘मन पसंद “(१९८०),’ द नक्सलाईट्स” (१९८०), ‘दिल… आखीर दिल है “(१९८२),’ बाजी” (१९८४), ‘तरंग “(१९८४),’ जट्ट वालेटी” (१९९२) या चित्रपटांसह जलाल समांतर सिनेमामध्येही कार्यरत होते. अखेरच्या काळात त्यांनी पहला नशा (१९९३), झुमका (१९९५), रॉक डान्सर (१९९५), पुलिसवाला गुंडा (१९९५), बदमाश (१९९८), यार मेरी जिंदगी (२००८) या चित्रपटातून त्यांनी अभिनय केला होता. यापैकी बदमाश आणि यार मेरी जिंदगी हे दोन चित्रपट त्यांच्या मृत्यूनंतर बर्याच कालावधीने प्रदर्शित झाले.
जलाल यांनी लेखन दिग्दर्शनातही आपले नशीब आजमावले होते. कुमार गौरव, जुही चावला आणि टीनू आनंद अभिनीत गूंज (१९८९) या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. तरुणांमधील वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यसनाधीतेवर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यानंतर त्यांनी अमोल पालेकर, नसिरुद्दीन शाह, सारिका आणि टीनू आनंद यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘निर्वाण “हा चित्रपट दिग्दर्शित केला, परंतु हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
अली सरदार जाफरी यांनी निर्मिती, संशोधन करुन पटकथा लिहिलेली दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिका ‘कहकशान’ (१९९१ – १९९२) जलाल यांनी दिग्दर्शित केली होती. ही मालिका हसरत मोहनी, जिगर मोरादाबादी, जोश मलिहाबादी, माजाज लखनवी, फिराक गोरखपुरी आणि मखदूम मोहिउद्दीन यांसारख्या प्रसिद्ध कवींच्या काव्यकथांवर आधारित होती. तसेच जाहिरातीमध्येही जलाल काम करत असत. त्यांची पान परागकरिता केलेल्या जाहिरातीतून ते घराघरात पोहचले होते. तसेच डेबोनेअर मॅगझिनसाठी केलेल्या अप्रतिम छायाचित्रणासाठीही त्याचे स्मरण केले जाते.
वैयक्तिक आयुष्यात जलाल यांनी १९७३ मध्ये मॉडेल व्हॅलेरी परेराशी लग्न केले; त्यांना सलीम क्रिस्टोफर आगा आणि व्हॅनेसा बी फ्युअरस्टीन ही दोन अपत्ये होती. दुर्दैवाने त्यांचे लग्न यशस्वी झाले नाही आणि १९८२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. काही काळ मुले त्यांच्यासोबत राहिली, परंतु नंतर त्यांची पत्नी त्यांना जर्मनीला घेऊन गेली, त्यांच्या पत्नीने जर्मनीत दुसरा विवाह केला. जलाल आगा यांचा जुहू येथील फ्लॅट पत्नीच्या नावे केल्यानंतरच तिने जलाल यांना मुलांना भेटू दिले. वैयक्तिक आयुष्यातील अपयशामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. जलाल यांचे ५ मार्च १९९५ रोजी वयाच्या ४९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची मुलगी व्हॅनेसा शिकागो, इलिनॉय येथे स्थायिक झाली असून तिने पॉल फ्युएर्स्टीनशी लग्न केले आहे. त्यांचा मुलगा सलीम गोव्यात शेफ म्हणून काम करतो.



