सामाजिक

अक्कलकोटची २०० वर्षांची परंपरा: मौलाली गल्लीतील मोहरम, श्रद्धा आणि एकतेचा संगम

अक्कलकोट ( प्रतिनिधी ): इस्लाम धर्मातील पवित्र मोहरम महिन्याला अक्कलकोट शहरात मोठ्या श्रद्धेने प्रारंभ झाला आहे. शहरातील मौलाली गल्ली येथील मौलाली पंजांची परंपरा तब्बल २०० वर्षांहून अधिक काळापासून अखंडपणे सुरू आहे.सर्वच समाजातील भाविक एकत्र येऊन हा मोहरम सण साजरा करतात, हीच या परंपरेची खरी ताकद आहे. ही परंपरा केवळ धार्मिक विधी नसून, अक्कलकोटच्या सामाजिक एकतेचे आणि श्रद्धेचे प्रतीक बनली आहे. 
तीन पंजे, एकच श्रद्धास्थान –
मौलाली गल्ली येथे एकाच ठिकाणी तीन पवित्र पंजे बसवण्याची अनोखी परंपरा आहे. यामध्ये मौलाली साहेब पंजे, गैबीसाहेब पंजे आणि नाले हैदर साहेब पंजे यांचा समावेश आहे. चंद्रदर्शनानंतर मोहरमला सुरुवात होताच खुदाळी मारून पर्वाची सुरुवात होते. पहिल्या दिवशी मौलाली साहेब व गैबीसाहेब पंजे बसवले जातात, तर पाचव्या दिवशी नालेहैदर साहेब पंजे विराजमान होतात. 
नैवेद्य, गलफ-शेरे व नवसपूर्ती: भक्तीचा ओघ
पाचव्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत, म्हणजेच योमे आशुरा पर्यंत, भाविक भक्त मोठ्या प्रमाणात नैवेद्य घेऊन दर्शनासाठी येतात. तसेच पंज्यांना गलफ, शेरे अर्थात फुलांचे हार अर्पण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
नवसपूर्तीची अनोखी परंपरा:
विशेष म्हणजे, मागील वर्षी ज्या भाविकांनी नवस बोलून नैवेद्य मागितले होते, त्यांचे नवस पूर्ण झाल्यावर अनेक भाविक पंज्यांना चांदीचे घोडे अर्पण करतात. तसेच नवस फेडण्यासाठी नियाज म्हणजेच कंदुरीचा कार्यक्रम भाविकांकडून मोठ्या भक्तीभावाने केला जातो.
अनेक वर्षांपासूनची ही श्रद्धा आहे की, एखाद्या घरात जन्मलेल्या बाळाची तब्येत सतत बिघडत असल्यास आणि अनेक दवाखान्यांत उपचार करूनही गुण न आल्यास, मौलाली पंज्यांना नवस केला जातो. बाळ सुखरूप झाल्यावर व आजारातून पूर्ण बरे झाल्यावर त्या बाळाला ‘बाग’ म्हणून रंगवून, पंज्यांच्या दारी आणून नवस पूर्ण करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. या श्रद्धेतूनच पंज्यांवरील भाविकांचा दृढ विश्वास दिसून येतो. 
पिढ्यानपिढ्या जपलेली सेवा: परंपरेची अखंड साखळी – 
२०० वर्षांची ही परंपरा जपण्यात अनेक सेवेकऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. मौलाली पंजाची सवारी घेण्याची सुरुवात भोई समाजातील गोपाळ भाई यांनी केली. त्यानंतर ही सेवा इमाम मन्यार, मग जॉनी शेख दारूवाले, मुसा शेख,त्यानंतर सत्तार फरास यांनी निष्ठेने पार पाडली. मागील ४५ वर्षांपासून ही सवारी युसुफ बागलकोटे हे घेत असून, परंपरेची ही अखंड साखळी त्यांनी जपली आहे. 
तसेच सोलापूरच्या समाधान नगर येथील महिबूब मुल्ला हे मागील ६५ वर्षांहून अधिक काळ मौलाली पंजे सवारीचे सेवेकरी (छडीदार) म्हणून निस्वार्थ सेवा करत आहेत. या सर्व सेवेकऱ्यांची निष्ठा हाच या २०० वर्षांच्या परंपरेचा कणा आहे. 
तसेच या परंपरेतील पवित्र विधी ‘उदान भरण्याचा’ मान मागील १०० वर्षांहून अधिक काळापासून ताची कुटुंबाकडे आहे.पिढ्यानपिढ्या हे कुटुंब ही सेवा श्रद्धेने पार पाडत आहे. 
आगी तुडवण्याची २०० वर्षांची परंपरा
मोहरमच्या आठव्या दिवशी ‘आगी तुडवणे’ हा मुख्य कार्यक्रम असतो. सुरुवातीला २० मण लाकडापासून सुरू झालेला हा विधी ८५ मण लाकडांपर्यंत पोहोचला होता. सध्या २० ते २५ मण लाकूड वापरून हा कार्यक्रम पार पाडला जातो.विशेष म्हणजे, २०० वर्षांच्या या परंपरेला आजपर्यंत कधीही गालबोट लागलेले नाही.
या आगी तुडवण्याच्या पवित्र विधीसाठी लागणारे संपूर्ण लाकूड मागील साठ वर्षांहून अधिक काळापासून स्वर्गवासी नूरुद्दीन खिस्तके(कारभारी)परिवार –  हे श्रद्धेने देत आले आहेत. त्यांच्या या निस्वार्थ त्यागामुळे ही परंपरा अखंड सुरू आहे. विशेष म्हणजे, २०० वर्षांच्या या परंपरेला आजपर्यंत कधीही गालबोट लागलेले नाही. 
रात्री दीड-दोन वाजता आगी तुडवल्यानंतर, सवारीमध्ये असलेले पंजे गाजावाजा न करता मौलाली गल्ली ते नाईकवाड गल्लीपर्यंत नेले जातात. परंपरेनुसार नाईकवाड गल्ली येथील भाविक पंजांना पाणी घालतात, उदानात उद-लोभान घालतात व नारळ फोडतात व दर्शन घेतात. त्यानंतर पंजे पुन्हा मौलाली गल्लीतील स्थानावर विराजमान होतात. शहरासह तालुक्यातील हजारो भाविक श्रद्धेने हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहतात. 
योमे अशुरा: भक्तीचा कळस
दहाव्या दिवशी, योमे अशुरा रोजी, सायंकाळी 4 वाजता मौलाली गल्लीतून भव्य मिरवणुकीला प्रारंभ होतो. मौलाली साहेब, गैबीसाहेब आणि नाले हैदर साहेब यांचे पंजे कारंजा चौक, मेन रोड, फुलारी चौक, फतेहसिंह चौक मार्गे नाईकवाड गल्लीतून हत्ती तलावाजवळील साखर विहीर येथे पोहोचतात. येथेच पंजांच्या विसर्जनाने १० दिवसांच्या पर्वाची सांगता होते. 
सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांनी “मौलाली गल्लीतील मोहरम ही केवळ अक्कलकोटची नाही, तर संपूर्ण परिसराच्या श्रद्धेची आणि बंधुत्वाची ओळख आहे असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button