सामाजिक

अक्कलकोटात कारहुणवी  सणानिमित्त साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग !

अक्कलकोट ( प्रतिनिधी )महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागात साजरा होणाऱ्या कारहुणवी ( बैलपोळा ) सणाच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत लगबग सुरू आहे .दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि महागाईमुळे बाजारपेठेत गर्दी नसल्याचे व्यापारी वर्गातून बोलले जात आहे.
 अक्कलकोट शहर व तालुक्यात कारहुणवी म्हणजेच कर्नाटकी बैलपोळा सण हा दिनांक २९ जून रोजी साजरा होणार आहे. या दिवशी बैलांना विश्रांती देऊन आंघोळ घालून त्यांना रंग लावून सजविण्यात येते. तसेच बैलाला गोड पुरणपोळीचा नैवेद्य  दाखवून पूजा करून औक्षण करण्यात येते. तसेच अनेक गावांमध्ये बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. कृषी संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा कारहुणवी  म्हणजेच बैलपोळा सण महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागात वाजत गाजत साजरा केला जातो. कारहुणवी सणाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरातील बाजारपेठेत विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांसह पशुपालकांची लगबग सुरू आहे. विविध दुकानातून बैलांना सजविण्यासाठी लागणारे मोरकी , कंडे , कंडे दोरी , घुंगरमाळ , फॅन्सी माळ , पैंजण , शिंगोटे , नागीण मोरकी , पितळेच्या घंट्या , पितळ घाटीसह विविध रंग-रंगोटी साहित्य खरेदी करण्यात येत आहे. शहरातील मेन रोड सह स्टेशन रोडवरील दुकानातून बैलपोळ्यासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे आणि महागाईमुळे बाजारपेठेवर परिणाम झाला असून कारहुणवीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी कमी प्रमाणात होत असल्याची माहिती व्यापारी बांधवांनी दिली.
 चौकट – कारहुणवीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तसेच सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने शेतकरी बांधवात म्हणावा तसा उत्साह दिसत नाही. दुष्काळी परिस्थितीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच बैलांचे व पशुधनाचे प्रमाण कमी झाले आहे.
 भीमाशंकर कुंभार ( व्यापारी ).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button