सोलापूर

काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण दादा निकाळजे यांचे दुःखद निधन; खासदार प्रणिती शिंदे अंत्ययात्रेत सहभागी

 

सोलापूर – काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक तथा आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाज म्हणून परिचित असलेले प्रवीणदादा निकाळजे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकस्मात निधनाने काँग्रेस पक्षासह सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

आज कुमठा नाका येथील त्यांच्या निवासस्थानातून निघालेल्या अंत्ययात्रेत खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी प्रवीणदादांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तसेच निकाळजे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

प्रवीण निकाळजे हे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांचे अत्यंत निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जात होते. काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि आंबेडकरी चळवळीतील सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक वर्षे जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला.

प्रवीणदादांचे हे अनपेक्षित जाणे काँग्रेस पक्षासाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. निःस्वार्थपणे जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, सेवाभावी, मनमिळावू आणि समाजाभिमुख नेता आपण गमावल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

प्रवीण  निकाळजे यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने नागरिक, मित्रपरिवार, नातलग, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button