क्राईम

पैशांच्या वादातून तिघांचा दुर्दैवी अंत सोलापूर हादरले , मुख्य आरोपी अटकेत

सोलापूर – जिल्ह्यातील बोरामणी गावात २ मे रोजी घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणाऱ्या घटनेतील मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. संपत्तीच्या वादातून एकाच घरातील तीन सदस्यांना जीव गमवावा लागल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या प्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने वेगाने तपास करत गुन्ह्यातील प्रमुख संशयित शंकर उर्फ पप्पू मस्के याला पश्चिम बंगाल राज्यामधून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे.

या दुर्दैवी घटनेत गायत्री मस्के , त्यांची मुलगी प्रिया मस्के आणि मुलगा शिवराज मस्के यांचा दुर्दैवी अंत झाला होता. प्राप्त माहितीनुसार, मस्के कुटुंबात गेल्या काही काळापासून मालमत्तेच्या वाटणीवरून सतत तणावाचे वातावरण होते. विशेषतः दीड एकर जमिनीचा वाद कुटुंबात धुमसत होता. यासोबतच, गायत्री मस्के यांनी संशयित आरोपी असलेला दीर शंकर उर्फ पप्पू मस्के याला काही काळापूर्वी २५ लाख रुपये इतकी मोठी रक्कम उसनवार म्हणून दिली होती.या पैशांच्या परतफेडीवरून दोन्ही बाजूने सातत्याने वाद आणि तगादा सुरू होता. याच आर्थिक आणि मालमत्तेच्या वादातून २ मे रोजी रात्रीच्या सुमारास घरातील तीन निष्पाप सदस्यांवर एका शस्त्राने गंभीर हल्ला करण्यात आला. यात तिघांनीही जागीच जीव गमावला.

या घटनेमुळे बोरमणी गाव आणि संपूर्ण सोलापूर जिल्हा पूर्णपणे हादरून गेला. घटनेनंतर आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के तिथून तातडीने फरार झाला होता. मागील पाच दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवली. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे आरोपी पश्चिम बंगाल मध्ये लपून बसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांच्या एका विशेष पथकाने तिथे सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. सध्या त्याला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी सोलापूर येथे आणण्याची कार्यवाही सुरू आहे.

विशेष म्हणजे, या प्रकरणात केवळ एकाच व्यक्तीचा हात नसून इतरही काही जण सामील असल्याची बाब तपासात उघड झाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी यापूर्वीच अन्य ५ संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. आता मुख्य सूत्रधाराला अटक झाल्याने या घटनेमागचे सर्व कंगोरे आणि अनेक नवनवीन खुलासे उघडकीस येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पैशांच्या आणि जमिनीच्या हव्यासापोटी रक्ताची नाती कशी संपुष्टात येतात, हे या मन हेलावणाऱ्या घटनेतून समोर आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button