राज्यात दुहेरी हवामानाचा इशारा; कुठे उष्णतेची लाट, तर कुठे वादळी पावसाची शक्यता

मुंबई -: राज्यात सध्या हवामानाचा अनोखा दुहेरी प्रभाव दिसून येत आहे. एका बाजूला प्रखर उन्हामुळे उष्णतेची लाट जाणवत असताना, दुसऱ्या बाजूला पूर्वमोसमी पावसाच्या सरी आणि मेघगर्जनेसह वादळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, विदर्भ आणि काही किनारपट्टी भागात उष्ण व दमट हवामान कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी येथे उकाडा वाढण्याची शक्यता असून दुपारच्या वेळेत बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा येथे उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वातावरणातील अस्थिरतेमुळे वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच परभणी, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे.
मागील २४ तासांत तापमानातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. अमरावतीमध्ये ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ येथेही उष्णतेचा पारा ४३ अंशांच्या पुढे गेला आहे. तर महाबळेश्वरमध्ये १६.३ अंश सेल्सिअस नीचांकी तापमान नोंदवले गेले. एकाच वेळी उष्णतेचा तडाखा आणि पावसाचा इशारा अशा दुहेरी हवामानामुळे नागरिकांनी आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.




