उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले; खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर ( प्रतिनिधी )पिण्याच्या पाण्यासह शेती व जनावरांच्या पाण्याच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला असून आज रात्रीपासून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देत मंगळवेढा, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यांतील गंभीर पाणीटंचाईची परिस्थिती मांडली होती. भीमा नदीचे पात्र अनेक ठिकाणी कोरडे पडल्यामुळे पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाला होता, तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला होता. खासदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीचा विचार करून प्रशासनाने तातडीने निर्णय घेत उजनी धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. आज रात्रीपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयामुळे शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



