सोलापूर

यशकल्याणी सेवाभवनात २७ वा कारगिल विजय दिवस उत्साहात; कारगिल योद्ध्यांसह शिक्षक, युवा अभियंते आणि एनसीसी कॅडेट्सचा गौरव

शहीदांच्या बलिदानाचे ऋण फुलांनी नव्हे, जबाबदार नागरिकत्वाने फेडावे…!” जीवनगौरव पुरस्कार विजेते कविवर्य प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे
करमाळा ( प्रतिनिधी )
“कारगिलच्या रणभूमीवर भारतीय जवानांनी केवळ शत्रूच्या चौक्या जिंकल्या नाहीत, तर त्यांनी भारताच्या स्वाभिमानाची उंची जगाला दाखवून दिली. शहीदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणे ही श्रद्धा आहे; मात्र त्यांनी जपलेल्या राष्ट्रासाठी प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि जबाबदार नागरिक म्हणून जगणे हीच खरी कृतज्ञता आहे. शहीदांच्या बलिदानाचे ऋण फुलांनी नव्हे, तर जबाबदार नागरिकत्वाने फेडले पाहिजे,” असे भावपूर्ण प्रतिपादन जीवनगौरव पुरस्कार विजेते, महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी-साहित्यिक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष कविवर्य डॉ. सुरेश शिंदे यांनी केले.
आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ, करमाळा आणि यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यशकल्याणी सेवाभवन, करमाळा येथे २७ वा कारगिल विजय दिवस देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात शहीद जवानांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले तसेच सैनिकी, शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक आणि युवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत करताना प्रा.करे-पाटील म्हणाले की कारगिलचा इतिहास हा केवळ युद्धाचा इतिहास नाही; तो हिमालयाएवढ्या धैर्याचा, मातृभूमीवरील निष्ठेचा आणि मृत्यूलाही पराभूत करणाऱ्या सैनिकांच्या राष्ट्रप्रेमाचा अमर अध्याय आहे. सीमारेषेवर उभा असलेला जवान आपल्या सुरक्षित आयुष्याचा अदृश्य पहारेकरी आहे. त्यामुळे सैनिकांचा सन्मान एखाद्या दिवसापुरता मर्यादित न राहता तो समाजाच्या विचारांचा आणि नव्या पिढीच्या संस्कारांचा अविभाज्य भाग झाला पाहिजे.
यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाबद्दल ‘कारगिल योद्धा जीवनगौरव पुरस्कार२०२६’ प्रदान करून मानपत्र स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष .अक्रूर शंकरराव शिंदे यांनी प्रास्ताविकात कारगिल युद्धातील सैनिकांच्या पराक्रमाचा आढावा घेतला. देशाच्या संरक्षणासाठी आपले तारुण्य आणि संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांप्रती समाजाने संवेदनशील राहण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ देवस्थानचे विश्वस्त ज्येष्ठ नेते .भारतभाऊ शिंदे, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष अॅड. बाबुराव हिरडे,स्वातंत्र्यसैनिक परिवाराचे प्रतिनिधी तथा पत्रकार . विवेक येवले, सहाय्यक कामगार आयुक्त . रेवणनाथ भिसले, सोलापूर जिल्हा इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष . बाळकृष्ण लावंड यांची मनोगते संपन्न झाली. यावेळेस व्यासपीठावर, शहीद मेजर अमोल निलंगे यांचे वीर पिता अरविंद निलंगे, शहीद जवान नवनाथ गात यांच्या वीर माता गुंफाबाई गात, वारे ताई, शहीद मेजर आप्पासाहेब काटे यांच्या मातोश्री काटे आजी,यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशनचे प्रा. कल्याणराव साळुंके, ॲड.दत्तात्रय सोनावणे, प्रा.जयेश पवार, अभियंते अतुल दाभाडे व्यासपीठावर उपस्थित होते.
सोहळ्यात विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांचा विशेष सन्मान करण्यात आला. करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी .सचिन तपसे आणि टीव्ही-९ चे पत्रकार .शितल कुमार मोटे, प्रसिद्ध गायक प्रवीण अवचर, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव येथील . प्रताप बरडे  यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग नोंदविणारे माजी सैनिक . पांडुरंग साळवे आणि . बाळासाहेब काकडे यांचा ‘कारगिल योद्धा’ म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या सन्मानावेळी सभागृहाने टाळ्यांच्या गजरात उभे राहून भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
अमेरिकेत अभियंता म्हणून कार्यरत असलेले  हर्षद शिंदे तसेच एमईएसबीचे अभियंता . अमृत महामुनी यांना विशेष युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिस्त, नेतृत्व, साहस आणि देशसेवेची प्रेरणा आत्मसात करणाऱ्या युवा पिढीचे प्रतिनिधी म्हणून. गौरव आकाश पवार,  शुभम भरतरी वळेकर,  संकेत संभाजी गरड आणि अभिषेक गणेश करकुटे यांना ‘बेस्ट एनसीसी कॅडेट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी . प्रवीण अवचर आणि त्यांच्या म्युझिक कंपनीच्या वतीने देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण केले. भारतीय जवानांचा पराक्रम, मातृभूमीची महती आणि तिरंग्याचा अभिमान व्यक्त करणाऱ्या गीतांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला राष्ट्रभक्तीच्या जागराचा स्वर प्राप्त झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विष्णु शिंदे, सचिन नवले आणि किरण ढेरे यांनी केले तर आभार योद्धा करिअर अकॅडमीचे अध्यक्ष सुभेदार मेजर विलासराव नाईकनवरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button