खासदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीला यश; भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश

सोलापूर : भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक वेळ वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी खासदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाने महावितरणला भीमा नदीकाठच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करून दररोज ८ तास वीजपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.
वीर धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आल्याने सध्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे नदीकाठच्या तसेच परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध असून, खरीप हंगामातील पिकांना नियमित पाणी देणे आवश्यक आहे. मात्र, कृषी पंपांना केवळ ५ तास वीजपुरवठा मिळत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन करण्यात अडचणी येत होत्या.
या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी सध्या देण्यात येणारा ५ तासांचा कृषी वीजपुरवठा तातडीने वाढवून दररोज ८ तास करण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. अधिक वेळ वीजपुरवठा मिळाल्यास शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा फायदा होऊन पिकांच्या उत्पादनातही वाढ होण्यास मदत होईल, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने महावितरणला भीमा नदीकाठच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महावितरणकडून संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तासांचा कृषी वीजपुरवठा पूर्ववत करण्याची कार्यवाही सुरू आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या मागणीला यश आले आहे.



