ब्राह्मण समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘श्री भगवान परशुराम पतसंस्था’ उभारण्याचा निर्धार

समाजाने एकजुटीने पुढे यावे : धनंजय तांबेकर
नायगाव / नांदेड (अजिम नरसीकर ) : ब्राह्मण समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वतंत्र पतसंस्था उभारणे ही काळाची गरज असून, तिच्या यशासाठी समाजातील परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि सामूहिक सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने पतसंस्थेच्या उभारणीत सहभागी व्हावे, असे आवाहन गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक धनंजय तांबेकर यांनी केले.
ब्राह्मण समाजाच्या स्वतंत्र पतसंस्थेच्या स्थापनेसंदर्भात आयोजित बैठकीत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुदखेडचे माजी नगराध्यक्ष रामराव चौधरी होते. सगरोळीचे प्रमोदराव देशमुख यांनी उद्घाटक म्हणून उपस्थिती लावली. यावेळी विश्वास देशमुख, विक्रम राजे, बालासाहेब पांडे, ॲड. महेश कनकदंडे, निखिल लातूरकर, ॲड. यदुपथ अर्धापूरकर, शांभवी साले यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर मान्यवरांचा शाल व ‘दासबोध’ ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
धनंजय तांबेकर यांनी सहकार क्षेत्रातील अनुभव मांडताना सांगितले की, पतसंस्थेची विश्वासार्हता ही पारदर्शक कारभार, आर्थिक शिस्त आणि जबाबदार कर्जवाटपावर अवलंबून असते. गरजू आणि परतफेडीची क्षमता असलेल्या सभासदांना प्राधान्य दिल्यास संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम राहते. थकबाकी वाढू नये, यासाठी नियोजनबद्ध कामकाज आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात धनंजय देशमुख राहेरकर यांनी समाजाची स्वतंत्र पतसंस्था स्थापन करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ॲड. महेश कनकदंडे यांनी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन या उपक्रमाला बळ द्यावे, असे आवाहन केले.
उद्घाटक प्रमोदराव देशमुख यांनी नव्या संस्थेचे नाव ‘श्री भगवान परशुराम पतसंस्था’ असे सर्वानुमते निश्चित झाल्याची घोषणा केली. यावेळी पत्रकार कृष्णा शेवडीकर, ॲड. आशिष गोधमगावकर आणि ॲड. मेगदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय समारोपात रामराव चौधरी यांनी समाजहिताच्या उपक्रमांना भविष्यातही सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या उपक्रमासाठी धनंजय देशमुख राहेरकर, बंडोपंत कुंटूरकर, ॲड. डॉ. प्रकाश जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. बैठकीला ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाच्या आर्थिक स्वावलंबनासाठी स्वतंत्र पतसंस्था उभारण्याच्या दिशेने ही बैठक महत्त्वाची ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



